नोकरी-व्यवसायाच्या बाजारपेठेत असलेल्या मागणीनुसार विद्यार्थ्यांनी विद्याशाखेची आणि घटकविषयांची निवड करू नये तर विषयातील स्वारस्य, गती आणि त्या विषयाच्या निवडीने खुल्या होणाऱ्या संधींचाही विचार करायला हवा. त्याविषयी..
दहावीनंतर महाविद्यालयीन प्रवेश घेताना मुलांची बौद्धिक क्षमता किती आहे, याचा प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करायला हवा.
पाल्य दहावीत जाईपर्यंत मुलाला विविध विषयांत कितपत गती आहे याची जाणीव पालकांना निश्चितच व्हायला हवी. यासाठी त्याला आतापर्यंत मिळत असलेले गुण हे एक प्रमाण ठरू शकतं. मात्र सध्याच्या शिक्षणप्रक्रियेत हे गुण फसवे ठरू शकतात. सुलभ शिक्षणपद्धतीमुळे जरा सढळ हाताने गुण देण्याकडे शाळांचा कल असतो.  आपल्या मुलाची गती कोणत्या विषयात आहे हे  समजून घेण्यासाठी शिक्षकांची मदत घेता येईल.   
मुलाला गणित आणि विज्ञान विषयात गती नसतानाही  अकरावीत विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याचा अनेक पालकांचा अट्टहास असतो. आपला मुलगा अभियंता वा डॉक्टर व्हावा,असं त्यांचं स्वप्न असतं. मात्र मुलाला गणितात रस नसेल तर अभियांत्रिकीसाठी गणित हा विषय पक्का नसेल तर मुलाची पुढे  पंचाईत होते. त्याच्या यासंबंधीच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. या विषयात उत्तीर्ण होणंसुद्धा त्याला अवघड होऊन बसतं.  यामुळे संबंधित विद्यार्थी हा निराश होऊ शकतो.  
त्यामुळेच अकरावीमध्ये प्रवेश घेताना मुलांनी कोणत्या विषयात रस आहे हे विचारात घेणं आवश्यकच ठरतं. अकरावी-बारावीमध्ये लाखो रुपये खर्चून शिकवणी लावण्यानं वा पुढे लाखो रुपये देऊनच खासगी संस्थेत प्रवेश मिळवण्यानं उत्तम करिअर घडू शकते हा पालकांचा केवळ गैरसमज आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्दच धोक्यात येऊ शकते, याचे भान पालकांनी ठेवायला हवे.
विद्याशाखा निवडताना.
आपल्या मुलाने वैद्यकीय शाखेतच प्रवेश घ्यावा, असे पालकांना कितीही वाटत असले तरी जर रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांमध्ये त्या विद्यार्थ्यांला रस नसेल आणि त्याची अनिच्छा त्याच्या गुणांवरूनही दिसून येत असेल  तर पालकांनी त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी भरीस पाडू नये. असे विद्यार्थी मग बारावी, सीईटीमध्ये उत्तम कामगिरी करू शकत नाहीत. पण अशा वेळी, आíथकदृष्टय़ा सक्षम पालक आपल्या या आर्थिक शक्तीच्या बळावर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र, अशा पद्धतीने प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे  संबंधित ज्ञान  कच्चे राहते आणि हे व्यक्तिगत त्याच्यासाठी आणि समाजासाठीही घातकच ठरू शकते. या बाबी लक्षात घेतल्या तर दहावीनंतर विद्याशाखा निवडताना केवळ विज्ञान शाखेला प्राधान्य देण्यात काहीच अर्थ नाही.
कला शाखा
कला शाखेत भाषा, साहित्य यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करतोच, शिवाय पत्रकारिता, जनसंपर्क, संपादन, निवेदन, वक्तृत्व, लेखन, अनुवाद, दुभाषा अशी विविध क्षेत्रे करिअरसाठी उपलब्ध होतात. राज्य आणि केंद्र सरकारच्या राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी अधिकाधिक वेळ देता येणं शक्य होतं. त्याशिवाय इतर विविध कलागुणांचा विकास साधण्यासाठीही वेळ उपलब्ध होऊ शकतो. विधी शाखेत प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमाच्या काळात इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवता आलं तर ‘सोने पे सुहागा’ ठरू शकतं. मानसशास्त्र या विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी घेतली तर समुपदेशनाचं मोठं क्षेत्र उपलब्ध होऊ शकतं. पर्यटनाच्या क्षेत्रातलं करिअर करता येऊ शकतं. डिझायिनग, अध्यापन, ललित कला, हॉटेल मॅनेजमेंट अशी करिअरसुद्धा करता येऊ शकतात.
वाणिज्य आणि अर्थशास्त्र
वाणिज्य शाखेची निवड केलेली मुलं तर वित्तीय क्षेत्रात उंच भरारी मारू शकतात. बँकिंग, स्टॉक मार्केट, विमा क्षेत्र, गुंतवणूक सल्लागार, म्युच्युअल फंड विक्रेते, फायनान्स प्लानर, फायनान्स कंट्रोलर, लेखापाल, कॉस्ट अकौंटंट, व्यवसाय व्यवस्थापन, अर्थशास्त्रज्ञ, ई-कॉमर्स, मार्केटिंग अशा कितीतरी संधी त्यांना मिळू शकतात.
अर्थशास्त्र हा विषय पदवी स्तरावर घेतलेले विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक सíव्हस ही परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या अर्थ विभागात उच्च दर्जाची पदे भूषवू शकतात. स्टॉक ब्रोकर, इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फायनान्स मॅनेजर, बिझनेस अ‍ॅनालिस्ट, मार्केट अ‍ॅनालिस्ट, बुक कीपर, ऑडिटर, अकौंटंट, कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क अकौंटन्ट अशा सारखा अनेक पदांवर काम करण्याची संधी वाणिज्य विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांला मिळू शकते.
गणित की जीवशास्त्र की दोन्ही..
विज्ञान शाखेत प्रवेश घेताना पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की या शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे चारही विषय घ्यावे की जीवशास्त्र वा गणितापकी एक विषय निवडावा. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचंच पक्क मनात ठरवलेलं असेल त्यांनी जीवशास्त्र हा पर्याय निवडायला हरकत नाही. ज्यांना अभियंता व्हायचं पक्कं ठरवलं असेल त्यांनी गणित हा पर्याय निवडायला हरकत नाही. पण हे पर्याय निवडण्याचे जसे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. फायदा असा की, एका विषयाचा अभ्यास करावा लागत नाही. त्याऐवजी भरपूर गुण मिळवून देण्याची हमीच देणारा  पर्यायी विषय निवडता येतो. पण तोटा हा की, विद्यार्थ्यांचा एक मार्ग संपूर्ण बंद होतो. गणित पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांला वैद्यकीय शाखा निवडता येत नाही. या शाखेमध्ये केवळ एमबीबीएस याच ज्ञानशाखेचा समावेश होत नाही तर बीएएमएस, बीएचएमएस, डेन्टल, फिजिओथेरपी, फार्मसी, ऑक्युपेशनल थेरपी, मेडिकल लेबॉरेटेरी टेक्नॉलॉजी आणि गेल्या काही वर्षांत सुरू झालेले वैद्यक क्षेत्रास उपयुक्त ठरतील असे पदवी स्तरावरील कौशल्य निर्मितीच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश होतो. त्यामुळे या सर्व अभ्यासक्रमांपासून गणित पर्याय घेतलेल्या विद्यार्थ्यांला मुकावं लागतं. हीच बाब वैद्यकीय पर्याय घेतलेल्या विद्यार्थ्यांसही लागू पडते. अभियांत्रिकी शाखेच्या विविध विद्याशाखांना त्याला प्रवेश घेता येत नाही. दोन्ही पर्यायांचा अभ्यास केल्यास इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च- पुणे/ भोपाळ तसेच नॅशनल एन्ट्रन्स स्क्रििनग टेस्टद्वारे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च- भुवनेश्वर आणि डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी- सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स या संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेला फायदा होऊ शकतो. कारण या परीक्षेतील एक पेपर जीवशास्त्रावर आधारित असतो. बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी, बीटेक इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, बीटेक इन बायोइन्र्फमेटिक्स या विषयातील प्रवेशासाठी जीवशास्त्र हा विषय बारावीमध्ये घेणे आवश्यक आहे.
गणिताचा अभ्यास हा स्पर्धापरीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूनच पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय निवडावा. आपला आवाका, बुद्धिमत्ता, आजूबाजूची परिस्थिती अशा बाबींचा विचार करून निवडलेला पर्याय करिअरच्या यशाची पायरी चढण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतो.

नया है यह!
एम.ए. इन क्रिमिनॉलॉजी- हा अभ्यासक्रम गुरू गोिवदसिंघ विद्यापीठाने सुरू केला आहे. या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. पत्ता- सेक्टर- १६ सी, द्वारका, न्यू दिल्ली- ११००७८. वेबसाइट- http://www.ipu.ac.in
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?