Summer Hacks : आता उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीराला पाण्याची कमतरता जाणवणे, स्ट्रोक, खूप जास्त घाम येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांचा त्रास होतो. अशात भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे आणि नीट योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आहे.
इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.
आहाराकडे लक्ष द्या
तु्म्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर दिसून येतो. उन्हाळ्यात पचायला हलक्या असणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करणे कधीही चांगले असते. उष्ण वातावरणात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हलका पोषक आहार घ्यावा. उदा. दही, पांढरा भात, सॅल्मन मासा तुम्ही खाऊ शकता. आंबट व तिखट पदार्थ खाणे टाळा.
भरपूर फळे आणि भाजीपाला खा
फळे आणि भाजीपाल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फोलिक अॅसिड व मिनरल्स असतात. हे घटक शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये चांगले फॅट्स असतात; जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
हेही वाचा : तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
उदा.
काकडी
बेरी
टरबूज
सायट्रिक अॅसिड समृद्ध फळे
अॅव्होकॅडो
जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा
उन्हाळ्यात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ग्रीन टी हे द्रव पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि त्याचे अनेक फायदेही दिसून येतात.
व्यायामामध्ये बदल करा
उन्हाळ्यात शरीरावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यानुसार व्यायामप्रकार निवडा. खूप जास्त तास व्यायाम करणे आणि खूप जास्त धावणे टाळा. त्याऐवजी प्राणायाम करा.
शीतली प्राणायाम – या प्राणायामामध्ये तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
शीतकारी प्राणायाम – या प्राणायामामध्ये तोंडाद्वारे श्वास घेतला जातो. आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
सदांता प्राणायाम – या प्राणायामामध्ये दातांद्वारे हवा आत घेऊन नाकावाटे बाहेर सोडली जाते.
त्याशिवाय तुम्ही वृक्षासन, अर्धकटी चक्रासन, कोनासन, त्रिकोणासन, मार्जारासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, चक्रासन, नवासन, योग निद्रा इत्यादी आसन प्रकार तुम्ही करू शकता.
जीवनशैलीमध्ये बदल करा
उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता. त्याशिवाय फिकट रंगाचे सुती कपडे, चंदन, फुलांपासून बनविलेले अत्तर यांचा वापर करा. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान ५० एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. जर कडाक्याचे ऊन असेल तर सनकोट, तसेच छत्री वा टोपीचा वापर करा.