उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षामध्ये उफाळळेली ‘यादवी’ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका आणि जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवपाल यादवांनी निवडणूक अर्ज भरल्यानंतर अखिलेश यादव यांच्यावर नाव न घेता तोफ डागली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक चिन्ह ‘सायकल’ आणि पक्षासाठीची लढाई निवडणूक आयोगाच्या दारी गमावल्यानंतर शिवपाल यांनी पहिल्यांदाच उघडपणे हल्ला चढवला.

शिवपाल यादव यांनी निवडणूक अर्ज भरल्यानंतर आपल्या समर्थकांशी संवाद साधला. निवडणूक निकालानंतर अखिलेश यांनी सरकार स्थापन करावे आणि मी ११ मार्चला नवा पक्ष स्थापन करणार आहे, असे शिवपाल यांनी सांगितले. ११ मार्च रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवपाल यांनी आपण नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. आमच्या पक्षाचे अनेक चांगले नेते इतर पक्षांशी लढत आहेत. ते निवडणूक जिंकणारे आहेत. मी त्यांच्यासाठी प्रचार करीन, असे सांगत शिवपाल यांनी अप्रत्यक्षपणे अखिलेश यादव यांनाच लक्ष्य केले. निवडणूक चिन्हाची लढाई हरल्यानंतर शिवपाल यादव एकाकी पडल्याचे चित्र होते. ते आता लोकदलाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची अफवा सोमवारी पसरली होती. शिवपाल यांनी त्याचे खंडन केले. समाजवादी पक्षाचे मार्गदर्शक मुलायमसिंह यादव यांचे समर्थक ज्या ठिकाणी उभे आहेत, त्याठिकाणी जाऊन प्रचार करीन, असेही त्यांनी सांगितले.

चुकीच्या कामांना रोखल्यामुळेच आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुलायमसिंह यादव यांनी आमचे समर्थन केले. त्यांच्यावरही टीका करण्यात आली. ज्यांना मुलायमसिंहांनी सर्व काही दिले. तेच आता मुलायमसिंहांवर टीका करू लागले. त्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी मी आमचे सर्व अधिकार घ्या, असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सांगितले. मुलायमसिंहांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहू दे. आमचे तिकीटही कापा. उमेदवारीही देऊ नका, असेही त्यांना सांगितल्याचे शिवपाल यांनी सांगितले. यावेळी शिवपाल यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही हल्ला चढवला. काँग्रेससोबत आघाडी करून अखिलेश यांनी समाजवादी पक्षाला कमजोर बनवले आहे. मुलायमसिंहांचा अपमान सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.