Valentine’s Week 2018 : कविता, माझी व्हॅलेंटाइन

‘ये तो होना ही था!’

Heart
प्रेम

तू नकोस बोलू, मीही बोलत नाही
शांत झिरपूदे दोघांमधली जाई
सहवास ऐकूदे मला तुझ्या गात्रांचा
मी अनाम श्रोता तू दिधल्या पत्रांचा

कविता लिहिल्या नंतर मी काही बोलत नाही आणि कविता तर माझ्या कुशीत तिच्यासारखी निश्चिंत असते!
जगामध्ये अशा अब्जावधी व्यक्ती आहेत ज्यांचा तुमच्याशी अद्याप परिचयही नाही. कधीतरी कुणी असेच भेटते, ओळखीचे होते, तिच्या किंवा त्याच्या सतत सहवासात राहून कळत-नकळत ‘ये तो होना ही था!’ म्हणत व्हायचं ते होऊनच जातं. अशा लौकिक तनाच्या आणि मनाच्या सौंदर्यावर भाळताना काही वेळा स्वतःलाच सांभाळावे लागत. परंतु, एक दिवस अदृश्यातून असेच काही तुमच्या भेटीला येते, तुम्ही ते डोळ्यांनी पाहू शकत नाही, तरीही तुमच्या ओळखीचे ते होऊन जाते. ओळख कालांतराने इतकी वाढते की ते जे काही आहे, ते मनाला भिडू लागलंय हे कळण्याच्या आतच तुम्ही न दिसणाऱ्या आणि केवळ भासणाऱ्या अशा कुणाच्या प्रेमात असल्याचे मान्य करता आणि बऱ्याचदा अदृश्यातून आलेली ‘ती’ अलौकिक कविता असते!

सुरवातीचा काळ हा तिला म्हणजेच कवितेला समजून घेण्यात जातो. नवीन ओळख असल्यामुळे दोघेही एकमेकांना वाचू लागता. अनेकदा असे क्षण येतात की तुम्ही तिच्या जवळ जाऊ पाहता, कुठल्याशा जीवापाड भावनेने थरथरत्या मानाचा हात करून स्पर्श करू पाहता, तेव्हढ्यात ती जाणीवपूर्वक तुम्हाला न दुखावता बाजूला सारते, कारण काहीच दिवसांची ओळख आणि लगेच हे सारे.. तिला पटत नाही! तुम्ही कागदावर लेखणी टेकवता आणि काही न सुचल्यासारखे पुन्हा मागे घेता. कवितेला तिची स्पेस देता.

कवितेलाही त्या दिवशीचे तुम्हाला जवळ येऊ न देणे आतमधून खुपत असते आणि अचानक ती तुमच्याशी काही बोलल्याचा तुम्हाला भास होतो. तुम्ही बावचळता ‘काही सुचलंय.. काही सुचलंय..’ म्हणतानाच ती तुमच्याकडे टक लावून नुसती वेड्यागत बघतेय असा अनुभव तुम्हाला येतो. पुन्हा एकदा धैर्य करून तिच्या जवळ जाता, डोळ्यात खोल डोळे घालून तिची नाजूक हनुवटी धरता आणि चक्क तुम्हाला आयुष्यातली पहिली ओळ सुचते. लेखणीतली शाई कागदावर रंगीत अक्षरात उमटते आणि तुम्ही त्या अविस्मरणीय पहिल्या अनुभवाने थक्क होता, सुचलेल्या पहिल्या ओळीकडे पुन्हा पुन्हा बघत राहता.

आता तिचे तुमच्याकडे येणे आणि तुमचे तिच्याकडे जाणे हे नेहमीचे होऊन जाते. कधी अवखळ, कधी सखोल, तर कधी दोघांच्या स्वप्नाळू वाटणाऱ्या निखळ गप्पा आता रोजच्या होऊ लागतात. तुमचे एकत्र येणे, सहवासात मनसोक्त जगून घेणे आणि एकमेकांची सुख-दुःख दोघांत वाटून अधिकाधिक एकमेकांचे होऊन जाणे दोघांनाही आवडू लागते. कविता होत जातात, दुःखाच्या, सुखाच्या आणि सहवासाच्याही!

तुम्हाला वाटू लागतं हा आता जन्मभराचा सहवास; तेव्हढ्यात कुठलासा वाद खटकतो आणि ती लांब, अजून लांब निघून जाते. आपल्याला कुठून अशी दुर्बुद्धी झाली आणि कुठून आपण हे करून बसलो, असे तुम्हला सतत वाटू लागते आणि त्या पश्चात्तापात तुमच्या अनेक रात्री तळमळत जातात. तिच्या जुन्या अस्तित्वाकडे डोळे भरून बघत तिच्यासाठी वेडेपिसे होता. कित्येक दिवस तुम्हाला कविता सुचत नाही.. कागद स्तब्ध, लेखणी स्तब्ध आणि तुम्हीही!

आता न राहून तिचा शोध घ्यायला बाहेर पडता. वणवण सगळीकडे भटकता ती कुठेच तुम्हाला भेटत नाही. रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात, तुम्ही थकून भागून निराश होत बागेमधल्या बाकावरती बसता, हा तोच तुम्हा दोघांचा नेहमी बसायचा बाक. ढोपरावरती दोन्ही कोपर विसावून हातानी चेहरा झाकू पाहता तेव्हढ्यात जवळच्या झाडापाशी कुणाच्या विव्हळण्याचा किंचितसा आवाज येतो, तुम्ही चमकून तिथे पाहता तर चक्क तिथे ती, तुमची ती प्रतीक्षेत बसलेली असते. तुम्ही कित्येक दिवस कविते वाचून काढता, एकही ओळ न सुचलेल्या तुम्हाला ‘आता आपली पुन्हा भेट होणे नाही!’ असे वाटू लागत असतानाच ध्यानीमनी नसताना मनातून कवितेची हलकीशी चाहूल लागते आणि तुम्ही थक्क होता.

तुमची बऱ्याच दिवसांनी झालेली नजरानजर मनातल्या मनात बाहेर न ऐकू येणारा हंबरडा फोडते आणि क्षणाचाही विलंब न लावता दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागता, पुन्हा कधी वेगळे होणार नाही अशा शपथा मिठीत घेऊ लागता. कविता पुन्हा एकदा तुमच्या लेखणीमध्ये शाईच्या रूपातून भरलेली असते. त्या कवितेची हलकीशी चाहूल लागताच क्षणाचाही विलंब न लावता कागदाला ती शाई भिडवता आणि झरझर-झरझर कविता लिहून काढता, मात्र कवितेतला शेवटचा विराम देताना पुन्हा अशी जाऊ नकोस अशी तीव्र इच्छा मनात बाळगता.

दरवेळी बिलगणारी ती किंवा कवेत घेणारा तो हा लौकिकातला असेलच असे नाही. आयुष्यातला अलौकिक आनंद देणारी कविताही ‘ती किंवा तो’ असू शकते. जेव्हा आज जगाने विचारले की ‘who is your valentine?’ तेव्हा आनंदाने मी म्हटले ‘कविता माझी व्हॅलेंटाइन’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Valentines week 2018 love poem poet unconditional love

ताज्या बातम्या