आळंदी ते पंढरपूर चालत केवळ ५८ तासांत

आळंदी ते पंढरपूर हे २४५ किलोमीटरचे अंतर पालखी सोहळ्यातील वारकरी १८ दिवसात पूर्ण करतात.

दोघा युवकांची अनोखी वारी

आळंदी ते पंढरपूर हे २४५ किलोमीटरचे अंतर पालखी सोहळ्यातील वारकरी १८ दिवसात पूर्ण करतात. पण हेच अंतर दोन विठ्ठल भक्तांनी चक्क ५८ तासांमध्ये चालत जाऊन पूर्ण केले आहे. या अवलिया तरुणांच्या या पायी वारीची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये केली जाणार आहे. या पूर्वी ७१ तासात आळंदी ते पंढरपूर चालत येण्याची नोंद आहे.

सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना असते. पायी तीर्थयात्रा घडो असे म्हणत शेकडो वर्षांपासून पायी वारी करण्याची परंपरा आहे. आळंदी ते पंढरपूर हे अंतर जवळपास २४५ किलोमीटर आहे. हे अंतर माउलीची पालखी १८ दिवसात पूर्ण केले जाते . मात्र याही पेक्षा कमी दिवसात हे अंतर पूर्ण करून एक आगळी वेगळी पायी वारी पूर्ण केलीय पुण्यातील विठ्ठल भक्तांनी.  प्रजीत परदेशी (रा.लोणंद), धनाजी पन्हाळे (रा.उस्मानाबाद), पारस पांचाळ (रा. गुजरात) आणि जयप्रकाश गुप्ता (रा.यवतमाळ)  या चार युवकांनी ५० तासांत आळंदी ते पंढरपूर हे २४५ कि.मी.चे अंतर पार करण्याचा संकल्प आळंदीत केला.

मात्र या पायी वारीतून लोणंदनजीक आल्यानंतर पारस पांचाळ (गुजरात) व जयप्रकाश गुप्ता (रा.यवतमाळ) या दोघांनी शारीरिक त्रासामुळे संकल्पातून माघार घेतली. प्रसित परदेशी (रा.लोणंद) आणि धनाजी पन्हाळे (रा.उस्मानाबाद) या दोन अवलियांनी मात्र आळंदी ते पंढरपूर हे २४५ किलोमीटरचे अंतर ५८ तासांमध्ये पार केले.

या दोघांच्या विक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद केली जाणार असून त्यांना भारतीय वायुदलाचे निवृत्त जवान जयंत डोफे यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वीचे रेकॉर्ड ७१ तासाचे आहे. या दोन भाविकांची नोंद जरी लिम्का बुक मध्ये  होणार  असली  तरी

विठुरायाच्या भेटीची आस होती म्हणूनच हे पूर्ण झाले, असे या भाविकांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra 2017 alandi pandharpur wari in 58 hours

ताज्या बातम्या