वसई : महिला तिकिट तपासनिसाबरोबर झालेल्या वादातून एका महिला प्रवाशाने चक्क तिकिट तपासनिसाच्या हाताचा जोरात चावा घेतला आहे. गुरूवारी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी ३२ वर्षीय महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अथीरा सुरेंद्रनाथ केपी (२६) या महिला तिकीट तपासनीस गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेन मध्ये तिकिट तपासण्याचे काम करत होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या बोरीवली रेल्वे स्थानकातून विरार स्लो ट्रेन मध्ये चढल्या आणि प्रवाशांचे तिकिट चपासू लागल्या. यावेळी आरती सुखदेव सिंग (३२) ही महिला प्रवाशी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. अथीरा यांनी तिला ३०० रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी आरती सिंगने अथीरा यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

हेही वाचा…वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा

त्यानंतर दोघांमधील वाद वाढला. त्यामुळे अथीरा यांनी आरती सिंगला पुढील कारवाईसाठी वसई स्थानकात उतरण्यास सांगितले. मात्र वसई स्थानक येताच आरती सिंगने संधी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ती धावू लागल्यावर अथीरा यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. यावेळी आरती सिंगने अथीरा यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. जखमी झालेल्या अथीरा यांनी मदतीसाठी पोलिसांना बोलावले. फलाट क्रमांक दोनवरील गस्ती कर्मचाऱ्यांनी आरती सिंगचा पाठलाग करून तिला पकडले.

हेही वाचा…वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू

महिला प्रवाशांनी आरती सिंगवर वसई रेल्वे पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना लोकसेवकाला स्वेच्छेने दुखापत करणे ( कलम ३३२) आणि लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला कऱणे (कलम ३५३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला प्रवासी नायगाव येथे राहणारी आहे. आम्ही तिला कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. तिकिट तपासनिस अथीरा यांची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले.