वसई- मागील वर्षी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीने तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला घरात घुसून बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी मिरा रोड येथील नया नगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मिरा रोडच्या शांती नगर येथे राहणार्‍या एका अल्ववयीन मुलीला मागील वर्षी आरोपी समिर सिंग (२८) याने फूस लावून पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने नया नगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, ही मुलगी आणि आरोपी सिंग हे पंजाब मध्ये लपून असल्याचे आढळले होते. पोलिसांनी पंजाब येथे जाऊन आरोपीला अटक करून मुलीची सुटका केली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीचे आरोपीशी असलेले संबंध तोडून टाकले होते. यामुळे तुरुंगातून सुटून आल्यानंतर जाब विचारण्यासाठी आरोपी समीर सिंग आणि त्याचा साथीदार राम तिरूवा (२७) हे सोमवारी पुन्हा मुलीच्या घरी गेले. मात्र यावेळी मुलीचे वडील आणि आई यांनी विरोध केला. यावेळी आरोपी समिर आणि राम या दोघांनी मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी वडिलाने नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी आरोपी समीर सिंग आणि राम तिरूवा या दोघांविरोधात कलम ४५२, ३९३ तसेच ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा – ईद सणानिमित्त रस्त्यावरील नमाज पठण बंद, मिरा रोड मधील मुस्लिम समाजाचा निर्णय

हेही वाचा – वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू

आरोपीने मागील वर्षी मुलीला पळवून नेल्याने त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटून आल्यानंतर मुलीशी संपर्क करण्यासाठी घरी गेला होता. यावेळी त्याने मुलीच्या पालकांना मारहाण केली, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. ही मुलगी सध्या सज्ञान आहे. आरोपी समिर सिंग हा नेपाळी असून किरकोळ कामे करतो.