वसई : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याची एक चित्रफीत व्हॉटसअप समूहात प्रसारित केल्याने वसईतील वकील अॅड. आदेश बनसोडे यांच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना प्रभावित करून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> अर्नाळा येथे वाळू उपश्यासाठी निघालेली बोट उलटली, ११ मजूर सुखरूप; एक मजूर अजूनही बेपत्ता

ध्रुव राठी हा युट्यूबर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाच्या धोरणांवर टीका करणाऱ्या चित्रफितींमुळे तो सध्या चर्चेत आहे. २० मे रोजी मतदानाच्या दिवशी वसईतील वकील अॅड आदेश बनसोडे यांनी ध्रुव राठीची ही चित्रफीत ‘बार असोसिएशन ऑफ वसई’ या व्हॉटसअप समूहावर टाकली होती. मतदानाला जाण्यापूर्वी ही चित्रफीत जरूर पहा असा संदेश चित्रफितीखाली लिहिला होता. त्याविरोधात या समूहातील एक सदस्य अॅड. नारायण वाळींजकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. उमेदवाराबाबत खोटे कथन करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी अॅड बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> वसईच्या शार्वी महंतेला १०० टक्के गुण

मतदानाच्या दिवशी ध्रुव राठीची चित्रफीत टाकून मतदारांना प्रभावित केले असून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही हा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांच्या या कृतीविरोधात विविध सामाजिक संघटनांनी निषेध केला असून येत्या रविवारी अनेक संघटना आंदोलन करणार आहेत.

मी मतदारांना प्रभावीत केले नाही तर सजग केले. जी चित्रफित २ कोटी लोकांनी पाहिली, ५० लाख लोकांनी शेअर केली ती मी एका व्हॉटसअप समूहात प्रसारित केली होती. मग ही चित्रफीत बनविणाऱ्या आणि बघणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करणार का? मुळात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायलायाची परवानगी आवश्यक असते. मात्र बेकायदा माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – ॲड. आदेश बनसोडे