सुहास बिऱ्हाडे

वसईतील मच्छिमार सध्या भीषण मत्स्यदुष्काळाचा सामाना करत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ २५ टक्केच मत्स्य उत्पादन झाले आहे. यामुळे मच्छिमारांना ऐन हंगामात ४० दिवस मासेमारी बंद ठेवून बोटी किनाऱ्यावर ठेवाव्या लागल्या होत्या. प्रथमच असा प्रकार घडला आहे. यामुळे मच्छिमार हवालदील झाले असून भविष्यातील मोठ्या संकटाची ही चाहूल मानली जात आहे.

वसईतील मासळी बाजार पूर्वीसारखा गजबजलेला नसतो.. माशांची आवक होत नसल्याने बाजार असूनही ओसाड असतो. माशांची चव बदलल्याची तक्रार तर गेल्या अनेक वर्षांपासून ची आहे. आकारही कमी होत चालला आहे. अनेक मासे दुर्मीळ होत आहेत. मत्स्यदुष्काळ गेल्या काही वर्षांपासून होता परंतु यंदा त्याचे भीषण स्वरूप पहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारात मासे पूर्वीसारखे मुबलक प्रमाणात मिळत नाही. जे मिळतात ते महाग असतात. त्यामुळे सर्वसामान्य खव्वयांची देखील निराशा होत आहे.

हेही वाचा >>>वसई भाईंदर रोरो बोट जेट्टीला धडकली, बोट अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा

महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. या व्यवसायातून देशाच्या गंगाजळीत परदेशी चलनाची लक्षणीय भर पडते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रात मासळीचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. प्रत्येक वर्षी एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नाहीत. एकीकडे असा नैसर्गिक संकटांचा सामना मच्छिमार करत असताना दुसरीकडे यांत्रिक मासेमरी बेसुमार सुरू आहे.

या विनाशकारी मासेमारी पद्धतींमुळे समुद्रातील मासळीचे साठेही नष्ट होऊ लागले असून मत्स्योत्पादन प्रचंड प्रमाणात खालावले आहे. मत्स्योत्पादनातील घटीबाबत यापूर्वीही शासनाला अवगत करून मासळीचा दुष्काळ जाहीर करण्याची तथा मच्छिमारांना दिलासा देण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे करण्यात आली होती. तथापि, मत्स्यदुर्भीक्ष्याकडे शासनाकडून आजपर्यंत गांभीर्याने पाहिले गेल्याचे दिसत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून हे संकट हळू हळू वाढू लागले आहे. त्यामुळे समुद्रात मासळीचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नैसर्गिक संकट आणि विनाशकारी मासेमारी पद्धतींमुळे समुद्रातील मासळीचे साठेही नष्ट होऊन मत्स्योत्पादन प्रचंड प्रमाणात खालावले आहे. यंदाही राज्याच्या किनारपट्टीवर मासळीचा प्रचंड दुष्काळ हे मच्छिमारांवरील मोठे संकट आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळच्या ऑगस्ट महिन्यातही मच्छिमारांनी मोठ्या अपेक्षेने नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात केली होती. तथापि, लागोपाठ आलेल्या वादळांच्या तडाख्यांनी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे मासेमारी करता आली नव्हती. त्यामुळे यंदा मत्स्योत्पादनाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असून ते केवळ २५ टक्क्यांवर आले आहे. परिणामी, पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. खलाशांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्यामुळे जवळपास ४० टक्के मच्छिमारांनी मासेमारी बंद केली आहे. ज्या बोटी समुद्राता जातात त्यांनाही समुद्रातील दहा-बारा दिवसांच्या वास्तव्यानंतर नैराश्यग्रस्त मनस्थितीत किनार्‍यावर माघारी यावे लागत आहे. जी काही मासळी मिळते, ती संमिश्र स्वरुपाची असून उत्पादित मासळीच्या विक्रीतून मासेमारीच्या एका फेरीवर होणारा खर्चही वसूल होत नाही.

हेही वाचा >>>वित्तिय अधिकार नसल्याने अतिरिक्त आयुक्तांपुढे पेच, आयुक्त प्रशिक्षणासाठी रवाना

मासेमारी बंद ठेवण्याची वेळ

एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार आता पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नाहीत. माशांचा प्रजनन काळ व वाढीचा काळ यातही होत असलेल्या मासेमारीमुळे मासळीचे साठेही नष्ट होऊ लागले आहे. यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून हव्या त्या प्रमाणात मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात आली नाही. लाखो रुपये खर्च करीत मैल न मैल प्रवास करूनही मासळीच जाळ्यात येत नसल्याने मोठा फटका बसला आहे. मत्स्य दुष्काळ असल्याने अनेक मच्छिमार बांधवांची कुटुंब संकटात सापडली आहेत. या मत्स्य दुष्काळावर मात करण्यासाठी वसई व अर्नाळा येथील मच्छिमार बांधवांनी एकत्रित येत सुमारे चाळीस दिवस मासेमारी बंद ठेवली होती. जेणेकरून समुद्रातील मत्स्य प्रजातींची वाढ होण्यास मोठी मदत होईल व चांगल्या दर्जाचे मासे जाळ्यात येतील अशी आशा आहे. परंतु अडचणी वाढतच असल्याने काही मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी पुन्हा मासेमारी साठी रवाना केल्या आहेत. तर वसई पाचूबंदर येथील मच्छिमार अजून काही दिवस बोटी बंद ठेवल्या आहेत. मच्छिमारांना खलाशांचे वेतन, बँकांच्या कर्जाचे हप्ते, व्यापार्‍यांकडून घेतलेली उचल तसेच आठवड्याचा खर्चही भागवता येत नसल्याने मच्छिमार आर्थिक दुष्टचक्रात सापडले आहेत. दुसरीकडे, बँका, पतपेढ्या, खासगी मत्स्यव्यापारी यांच्याकडून अनेक लहान पारंपरिक मच्छिमारांनी कर्जउचल केली आहे. त्यासाठी या वित्तिय संस्था तगादा लावत आहेत. त्यामुळे मच्चिमार दुहेरी संकटात सापडला आहे.

पर्यावरणाच्या बदलाचा ज्या प्रमाणे शेतीला फटका बसला आहे तसाच तो मत्सव्यवसायाला देखील बसला आहे. यंदा आलेले संकट भीषण असून शासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भूमीपुत्र असलेला मच्छिमार उध्दवस्त झाल्याशिवार राहणार नाही