वसई/भाईंदर- आमदार गीता जैन यांच्या नारी सशक्तीकऱण या संस्थेच्या संचालिकेच्या मोबाईल मधून छायाचित्रे चोरून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी संस्थेचे सल्लागारासह तिघांवर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार रिया म्हात्रे या आमदार गीता जैन यांच्या नारी सशक्तीकरण फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेत संचालिका म्हणून काम करतात. त्यांना १३ एप्रिल रोजी कुरियरने एक धमकीचे पत्र आले. आझाद खान नामक व्यक्तीने हे पत्र पाठवून धमकी दिली होती. तुमची छायाचित्रे व्हायरल करू आणि तुम्हाला बदनाम करू. त्यामुळे तुम्ही राजकारण सोडा अशी मजूकर त्या धमकीच्या पत्रात होता. मागे प्रकारामागे संस्थेचे सल्लागार राजन नायर असल्याचा संशय म्हात्रे यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. १८ मार्च रोजी रोजी संस्थेचे सल्लागार राजन नायर यांनी माझा मोबाईल फोन एक ॲप डाऊनलोड करण्यासाठी घेतला होता. राजन नायर यांच्या सांगण्यावरून संस्थेचे दर्शिल शर्मा याने माझ्या मोबाईल मधील छायाचित्रे चोरून काढले, असे म्हात्रे यांनी नवघर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी संस्थेच सल्लागार राजन नायर, दर्शिल शर्मा तसेच धमकीचे पत्र पाठविणारा आझाद खान या तिघांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनयमच्या कलम ४३, ६६, १२० ब तसेच भारतीय दंड विधानसंहितेच्या कलम ५०० आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही

याबाबत संस्थेचे सल्लागार राजन नायर यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर तक्रारदार रिया म्हात्रे यांनी पोलिसात प्रकरण असल्याने भाष्य करण्याचे टाळले. तक्रारदार महिलेच्या संमतीशिवाय त्यांच्या मोबाईल मधून डेटा चोरणे आणि त्याआधारे ब्लॅकमेल करणे या तक्रारीवरून आम्ही तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.

संस्थेचा संबंध नाही- आमदार गीता जैन

ही गोष्ट माझ्यासाठी देखील धक्कादायक आहे. या प्रकरणात तपासासाठी जे सहकार्य आणि जी काही कायदेशीर मदत लागेल ती मी करेन. मात्र या प्रकरणात नारी सशक्तीकऱण या संस्थेचा काही संबंध नाही, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.