विरार : केवळ मोटारसायकलच्या चाकाच्या रंगावरून वालीव पोलिसांनी चोरांच्या टोळीला अटक केली आहे. मोबाइल मनोऱ्यात ४ जी आणि ५ जी नेटवर्कसाठी वापरले जाणारे एबी, बीटीएस व व्हीआयएलचे कार्ड चोरणाऱ्या या टोळीविरोधात पाच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
वसईतील एका खासगी मोबाइल टॉवर कंपनीच्या मनोऱ्यातील कार्ड चोरीला गेल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांकडे याविषयी कोणतीच माहिती नव्हती. सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकल दिसत होती. मात्र त्यावरील वाहन क्रमांक बनावट होता. त्यामुळे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान होते. या आरोपींच्या मोटारसायकलच्या चाकांना लाल रंगांचे मॅकव्हील लावलेले दिसले. अशा पद्धतीच्या मोटारसायकल कमी असल्याने पोलिसांनी त्यावरून तपासाला सुरुवात केली. संशयितांची मोटारसायकल ज्या ज्या परिसरातून गेली तेथून माहिती गोळा करून आरोपी रामजनम यादव याला वसई पूर्व येथून ताब्यात घेतले. तपासणीत त्याने इतर साथीदारांची नावे पोलिसांना दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्जुन यादव (वसई), अनिस मलिक (मुंबई), रामसुरत वर्मा (मुंबई) यांना सापळा रचून अटक केली आहे.
वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून १२ एबी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींवर वालीव, पेल्हार, डहाणू, सफाळे, मनोर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.