वसई: यंदाच्या वर्षी समुद्रात निर्माण झालेल्या मत्स्य दुष्काळामुळे वसई अर्नाळा या परिसरातील मच्छीमारांवर स्वतःहून ४० दिवस बोटी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या बंदीनंतर काही बोटी बंदरातून मासेमारीसाठी रवाना होऊ लागल्या आहेत. तर वसई येथील मच्छीमारांनी ५ मार्च पर्यंत बोटी बंद ठेवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरारच्या किनारपट्टीच्या भागात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे मासेमारीचा व्यवसाय करतात. एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येत असून मच्छिमार पूर्ण क्षमतेने मासेमारी करू शकत नाहीत. दुसरीकडे पारंपारिक पद्धत सोडून नियमबाह्य पद्धतीने अनिर्बंध मासेमारी होऊ लागली आहे. विशेषतः माश्यांच्या प्रजनन काळ व वाढीचा काळ यातही होत असलेल्या मासेमारीमुळे मासळीचे साठेही नष्ट होऊ लागले आहे.

हेही वाचा – मिरा भाईंदर महापालिकेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी जाहीर

यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून हव्या त्या प्रमाणात मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात आली नसल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.
लाखो रुपये खर्च करीत मैल न मैल प्रवास करूनही मासळीच जाळ्यात येत नसल्याने मोठा फटका बसला आहे. मत्स्य दुष्काळ असल्याने अनेक मच्छिमार बांधवांची कुटुंब संकटात सापडली आहेत. या मत्स्य दुष्काळावर मात करण्यासाठी वसई व अर्नाळा येथील मच्छिमार बांधवांनी एकत्रित येत सुमारे चाळीस दिवस मासेमारी बंद ठेवली होती. जेणेकरून समुद्रातील मत्स्य प्रजातींची वाढ होण्यास मोठी मदत होईल व चांगल्या दर्जाचे मासे जाळ्यात येतील अशी आशा आहे. परंतु अडचणी वाढतच असल्याने काही मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी पुन्हा मासेमारीसाठी रवाना केल्या आहेत. तर वसई पाचूबंदर येथील मच्छिमार अजून काही दिवस बोटी बंद ठेवणार असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.

या वर्षी समुद्रात मिळणारी मासळी कमी झाली आहे. त्यामुळे आता आम्हीच एकत्र येत बोटी बंद ठेवल्या होत्या. आता पुन्हा एकदा या बोटी मासेमारीसाठी सोडत आहोत. शासनानेसुद्धा आमच्या मच्छिमार बांधवांची दखल घेऊन योग्य ती मदत करावी. – थॉमस कोतवाल, मच्छिमार व्यावसायिक अर्नाळा

हेही वाचा – मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ९४५ नवीन पोलीस रूजू

मत्स्य दुष्काळ जाहीर करा 

यंदाच्या वर्षी समुद्रात मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मच्छिमारांना अपेक्षित मत्स्य उत्पादन न झाल्याने मच्छीमार कर्जबाजारी होऊ लागले असून त्यांच्यासमोर भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मच्छिमारांवर ओढवलेल्या या अत्यंत बिकट स्थितीचा विचार करून राज्यात मासळीचा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai time to shut down boats due to fish drought some boats leave after ban ssb