भाईंदर : मिरा रोड येथे पोलीस आयुक्तांना आणि राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या वारीस पठाण यांना पोलिसांनी शहराच्या वेशीवरच रोखून परत पाठवले आहे.शहरातील शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून यास पठाण यांनी देखील सहकार्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी(२१ जानेवारी २०२४) मिरा रोड येथे रामभक्ताच्या मिरवणूकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील दोन समुदायातील वातावरणात पेटून उठले होते. यात नागरिकांना मारहाण, दुकानाची तोडफोड अशा दंगे स्वरूप घटना घडल्या होत्या.त्यामुळे संपूर्ण फौजफाटा तैनात करून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान घटनेचे पडसाद देशभर उमटू लागल्यानंतर विविध पक्षातील नेत्यांनी मिरा रोड येथे येण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा…वसई भाईंदर रो रो सेवा मंगळवारपासून सुरू होणार, प्रवाशांना दिलासा

यात तेलंगणाचे आमदार राजा ठाकुर सिंह उर्फ टी-राजा यांनी १९ तारखेला शिवजयंती निमित्त मिरा रोड मध्ये सभा व मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केले होते. तर याच वेळी एमआयएम पक्षाचे नेते वारीस पठाण देखील शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. टी राजा यांनी आपला दौरा पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. मात्र वारीस पठाण येणार असल्यामुळे पोलीस आयुक्तालयाने सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त दहिसर टोल नाक्याजवळ तैनात ठेवला होता. त्यानुसार दुपारी १ च्या सुमारास पठाण यांना उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी ताब्यात घेऊन दहिसर पोलीस ठाणे गाठले.

‘आपल्या येण्याने शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवेश नाकारत असल्याचे पोलिसांनी पठाण यांना सांगितले.’यावर पठाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा मुंबईची वाट धरली असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा…मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात तक्रार

टी-राजाच्या सभेसाठी परवानगीची मागणी

तेलंगणाचे आमदार राजा ठाकुर सिंह उर्फ टी राजा यांनी १९ तारखेचा आपला मिरा रोड येथील दौरा रद्द केल्यानंतर आता पुन्हा २५ फेब्रुवारीला शहरात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत बजरंग दलाकडून पोलिसांकडे सभा व मिरवणुकीस परवानगी देण्याचे पत्र देण्यात आले आहे.’आपण शांततेत सभा घेणार असल्याने पोलिसांनी त्यास परवानगी द्यावी अशी विनंती टी-राजा यांनी चित्रफीत प्रसिद्ध करून केली आहे. तर अदयापही यास मंजुरी देण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waris pathan stopped by police in dahisar while traveling to mira road psg
First published on: 19-02-2024 at 18:33 IST