मैत्रेयी केळकर

खरं तर बाग प्रत्येकालाच करावीशी वाटते. हौस आणि आवड कित्येकांना असते. पण वेळ, देखभाल, जागा आणि उन्हाचं गणित मात्र प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. अशा वेळी काही इन्डोर (सावलीत  वाढणारी) रोपं आपण लावू शकतो. तसेच निवडक भाज्या, फुलझाडं लावून आपली हौस पुरवता येते. पण हे सगळं जमवायचं कसं? कोणती रोपं निवडायची? असे अनेक प्रश्न तुम्हाला आता पडतील. त्याच सगळ्याची माहिती करून देण्यासाठी हा लेख.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?

मूळ सिंचने सहजे ‘शाखापल्लव संतोषिती’.. पावसाच्या हिरव्या सिंचनाने पल्लवीत झालेली अवघी बाग म्हणजे एक नितांत सुंदर निसर्गचित्रच झालंय. गच्च पाऊस भरून आलाय. लांबवर दिशा काजळून गेल्यात. अगदी वाशीच्या खाडीपर्यंतचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात साठवत अडतिसाव्या मजल्यावरून मी पावसाच्या रंगविभ्रमाचा आनंद घेतेय. माझी जुन्या घरातील बाग आता इथे थोडी  रुळू लागलेय. ज्ञानेश्वरीत उल्लेखिलेल्या चंद्र विकसनी कमलीनींची तीन रोपं नुकतीच मिळाली आहेत. रात्री उमलणारी त्यांची सुगंधी फुले पाहण्याची मनाला घाई झाली आहे. कमळांमध्ये अलीकडे शतपाकळ्यांच्या आणि पांढऱ्या शुभ्र पुंडरीक कमळाची भर पडलेय. संथगतीने त्यांची वाढ सुरू आहे. हळद, अळू आणि कापूर, मींट, कृष्ण अशा सगळ्या प्रकारच्या तुळशींनी चांगली उभारी धरली आहे. गोकर्ण, देशी गुलाब, सदाफुली यांना अप्रतिम बहर आलाय.

या सगळ्या झाडांना ऊन मानवतं, त्यामुळे नवीन घरातल्या भल्यामोठय़ा डेकवर ती चटकन रुळलीत. याशिवाय घराच्या दिवाणखान्याला लागून असलेल्या मोठय़ा बाल्कनीत एक रसाळ बाग उमलली आहे. गंमत वाटली ना ‘रसाळ’ असा शब्द वापरला म्हणून. पण अहो, खरंच ती रसाळांचीच बाग आहे.

इंग्रजीत ज्या झाडांना succulents म्हणतात त्यांनाच मराठीत मोठं गोड नाव आहे ‘रसाळ’. या रसाळांची दुनिया खरंच खूप अद्भुत आहे. माझ्या किचन गार्डिनगच्या वर्कशॉपमध्ये मला एक प्रश्न अगदी हमखास विचारला जातो तो म्हणजे, ‘‘जर घरी फार ऊन येत नसेल तर कोणती झाडे लावावीत?’

या प्रश्नाला उत्तर म्हणजे अशा ठिकाणी रसाळांची बाग करावी. खरं तर बाग प्रत्येकालाच करावीशी वाटते. हौस आणि आवड कित्येकांना असते. पण वेळ, देखभाल, जागा आणि उन्हाचं गणित मात्र प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. अशा वेळी काही इन्डोर (सावलीत  वाढणारी) रोपं आणि succulents आपण लावू शकतो. तसेच निवडक भाज्या, फुलझाडं लावून आपली हौस पुरवता येते. पण हे सगळं जमवायचं कसं? कोणती रोपं निवडायची? असे अनेक प्रश्न तुम्हाला आता पडतील. त्याच सगळ्याची माहिती करून देण्यासाठी हा लेख. पहिल्यांदा सक्युलंट्सविषयी बोलू या. सक्युलंट्स म्हणजे अशी झाडं जी आपल्या पानांमध्ये पाणी साठवून ठेवतात, म्हणजेच त्यांची पानं ही काहीशी फुगीर असतात. यामुळेच यांना मराठीत अगदी समर्पक नाव आहे रसाळ.

कोरफड, पानफुटी, ब्रह्मकमळ, झेन तत्त्वज्ञानात महत्त्व प्राप्त झालेलं जेड ही सगळी सक्युलंट्स आहेत. ही सगळी आपल्या परिचयातली आणि उपयुक्त आहेत. कोरफड, पानफुटी यांचे औषधी उपयोग तर सर्वानाच माहिती आहेत. सहज आठवलं म्हणून सांगते. मध्यंतरी मी एका शिबिराला गेले होते. तज्ज्ञांचं व्याख्यान चालू होतं. एवढय़ात माझ्या शेजारचे एक गृहस्थ अचानक उठून गेले. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत म्हणून मी उठून बाहेर गेले. ते गृहस्थ पानफुटीचं झाड हुडकत होते. त्यांना मुतखडय़ाचा त्रास होता आणि पानफुटीचं पान खाल्लं तर आराम मिळतो हा त्यांचा स्वानुभव होता. पानफुटी, भुई आवळा, शतावरी अशी कितीतरी बहुगुणी झाडं आपण केवळ अज्ञानाने दूर सारली आहेत. कोरफडीचंही तसंच आहे. कोरफड जेल विकत आणण्यापेक्षा ताज्या कोरफडीच्या गराचा उपयोग करणं केव्हाही श्रेयस्करच, नव्हे का? बरं या झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते का? तर तसंही नाही. रोज पाणी द्यावं लागत नाही, की भरपूर ऊन लागत नाही. खूप मोठी जागा नको. महागडी खतं, माती, काहीही नको. मुकी बिचारी गुमान वाढतात. शिवाय यांचा एक विशेष गुण म्हणजे यांच्या एखाद्या पानापासून यांची रोपं तयार करता येतात. एखाद्या छोटय़ा इवल्या कुंडीत आकर्षक चिनीमातीच्या भांडय़ात चक्क नारळाच्या करवंटीत, आइस्क्रीम ग्लासमध्ये कुठेही आपण यांना लावू शकतो.

रसाळांच्या खूप जाती आहेत. कलांचो नावाची एक जात तर इतकी सुरेख आहे की याची फुले अतिशय नाजूक आणि देखणी दिसतात. पिवळा, लाल, नारिंगी, गोंडस गुलाबी, कोनफळी, पांढरा असे अनेक रंग यात उपलब्ध आहेत. पावसाळा वगळता एरवी सगळ्या महिन्यांत झाड फुलांनी डवरलेलं असतं. दिवाणखान्यात अगदी सहज ठेवता येणारं हे झाडं फार देखणं दिसतं. बरं एक रोप नर्सरीतून आणलं तरी पुरे. याच्या प्रत्येक पानापासून नवीन रोप करता येतं. पान नुसतं ओलसर मातीवर ठेवलं तरी दहा-बारा दिवसांत त्यांना मुळं फुटतात. रसाळाच्या सगळ्या जातींना आठवडय़ातून एकदा पाणी दिलं तरी पुरतं. मुळात ही रोपं आपल्या पानांमधे, खोडांमधे पाणी साठवत असल्यामुळे यांना नियमित पाण्याची गरज नसते. सकाळी मिळणारं दोन तास ऊनही पुरेस होतं. ऊन येत नसेल तर खिडकी-दरवाजातून येणारा स्वच्छ सूर्यप्रकाशही चालतो. यांच्या फुलणाऱ्या जाती तर सुंदर दिसतातच, पण गर्द हिरव्या पोपटी चक्राकार पानं असणाऱ्या जातीही तितक्याच शोभिवंत असतात. cactus आणि succulents ही एकाच प्रकारात गणली जातात. दोघांनाही पाणी कमी लागतं.

अलीकडे घरात काटेरी झाडे ठेवू नयेत असा एक समज बऱ्याच लोकांमध्ये रूढ झाला आहे. पण मला विचाराल तर हा शुद्ध गैरसमज आहे. निवडुंग वर्गीय झाडांमध्ये तर इतक्या मोहक जाती आहेत की त्यांचा उपयोग शोभेच्या वनस्पतींसारखा सहज होऊ शकतो. यातल्या काही जातींना फार आकर्षक फुलेही येतात. शिवाय या एकाच वर्गात मोडणाऱ्या सर्व वनस्पतींची आपण एखादी सुंदर रचना करू शकतो. एखाद्या कपबशीच्या आकाराच्या कुंडीत किंवा एखाद्या पसरट चिनीमातीच्या भांडय़ात यांच्या मदतीने सुरेख निसर्ग चित्र तयार करता येते. वर्षांनुवर्ष वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यांमध्ये बदलत ते आपल्याला आनंद देत राहतं. या रचनेला जागाही फार लागत नाही आणि याची हलवाहलवही सहज करता येते.

यांचाच वापर करून एखादी बंदिस्त हंडीतील बागही तयार होऊ शकते. या लेखाबरोबरच्या फोटोंतून तुम्हाला या सगळ्याची स्पष्ट कल्पना येईलच. रसाळ आणि निवडूंग वर्गातील वनस्पतींना उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा होणारी माती लागते. ती आपण घरच्याघरी तयार करू शकतो. वाळलेल्या पानांचा चुरा, कोरडे शेण, भाताची तुसं, नारळाच्या शेंडय़ाचा चुरा आणि वाळू यांचं मिश्रण करून माती तयार करायची. यात वाळू, नारळाच्या शेंडय़ांचा चुरा (कोकोपीट) यांचं मिश्रण जास्त व इतर घटक थोडे कमी प्रमाणात घ्यायचं. यातच थोडा कडूनिंबाचा वाळलेला पाला चुरून घातला किंवा निमपेंड घातली अथवा थोडा कोळशाचा चुरा घातला की  झाडाला कीड लागत नाही. जर मिळालं तर थोडं परलाइट घातलं तरी चालेल. या प्रमाणे जेवढे घटक उपलब्ध होतील त्यांने कुंडी भरून रोप लावता येतं.

रोपाला आठवडय़ातून एकदा जास्तीतजास्त दोनदा पाणी द्यावे. पाणी कमी दिले तरी चालेल, पण जास्त होऊन चालत नाही. पाणी जास्त झाल्यास रोपाची मुळं खराब होऊ लागतात. पाणी नेहमी रोपाच्या मुळांपाशी हलकेच द्यावे. रोपाला अंघोळ घालू नये. नाहीतर पानांवर साठलेल्या पाण्यामुळे बुरशी संसर्ग होऊन रोप मरते.

बुरशी किंवा फंगस लागल्यास तेवढा भाग काढून टाकावा. एवढी काळजी घेतल्यास आपण ही रसाळांची बाग सहज फुलवू शकतो. सक्युलंट्स नर्सरीत सहज मिळतात. ऑनलाइनसुद्धा मागवता येतात. किंवा succulent factory मधूनही मागवता येतात. यात फुले येणाऱ्या, इनडोर, आउटडोर अशा अनेक जाती मिळतात. Adinum, jade या जातींची तर उत्तम बोन्साय करता येतात. काही जाती या टांगत्या कुंडय़ांमध्ये लावण्याजोग्या असतात, तर काही चक्क फोटोफ्रेममध्ये लावून भिंतीवर लावता येतात. जर ठरवलं तर अनेक नवीन कल्पना लढवून आपण या हिरव्या दोस्तांनी आपलं घर हिरवंगार करू शकतो. मग आता वाट बघू नका. नेटवर सर्च करा, व्हिडीओ पाहा आणि नव्या बागेच्या तयारीला लागा.

mythreye.kjkelkar@gmail.com