02 June 2020

News Flash

आरामदायी बेड

बेडचे आकारमान वगळता इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे बेडचे निरनिराळ्या प्रकारांत वर्गीकरण होऊ शकते.

|| घर सजवताना : गौरी प्रधान

‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ या म्हणीत खाटल्याचा म्हणजेच पलंग किंवा बेडचा उल्लेख दिसून येतो. का बरं अशी म्हण नाही निघाली की, ‘असेल माझा हरी तर देईल खुर्चीवरी’ किंवा ‘असेल माझा हरी तर देईल ओसरीवरी’. कारण घरातील इतर कोणत्याही जागेपेक्षा खाटलं, पलंग किंवा बेड हीच जागा म्हणकर्त्यांला सर्वात जास्त आरामदायक वाटली असणार! खरे तर घर आहे म्हटले की, त्यातील बेडरूम आणि बेड या आपल्या तशा सगळ्यात जवळच्या वस्तू. सुट्टीचा दिवस आहे पडा बेडवर लोळत, बरं वाटत नाही तर झोपून राहा दिवसभर. दिवसभराची दगदग, ताणतणाव या सगळ्यापासून सुटका म्हणजे आरामदायक बेडवरची आठ-दहा तासांची ताणून दिलेली झोप.

बघा किती महत्त्वाचा आहे ना हा बेड आपल्या आयुष्यात! मग जर तो इतका महत्त्वाचा असेल तर तो तितकाच आरामदायक आणि आपल्या आवश्यकता, आवड लक्षात घेऊनच बनवलेला हवा. आधुनिक बेडचे तसे तर अनेक प्रकार पडतात- किंग साइझ बेड, क्वीन साइझ बेड तसेच सिंगल बेड, डबल बेड, इत्यादी. या प्रत्येक प्रकाराप्रमाणे बेडचे आकारमानही बदलत जाते; परंतु भारतात या पद्धती बहुतांश करून गरलागू ठरतात, याचे कारण म्हणजे भारतात आपल्या सोयीप्रमाणे बेड बनवून घेण्याची पद्धत जास्त प्रचलित आहे. आपल्याकडे बेडरूमचे आकारमान पाहून बेडचे मोजमाप ठरवले जाते.

साधारणपणे दोन व्यक्तींना झोपण्यासाठी ७५ इंच बाय ६६ इंच एवढा बेड लागतो, तर ७५ इंच बाय ३६ इंच एवढा बेड एका व्यक्तीसाठी पुरेसा असतो. ही झाली ढोबळ मोजमापे; परंतु त्यातही पुन्हा आपल्या खोलीचे मोजमाप व वापरणाऱ्या व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन यात काही फेरफार केले जाऊ शकतात.

बेडचे आकारमान वगळता इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे बेडचे निरनिराळ्या प्रकारांत वर्गीकरण होऊ शकते. यात मग स्टोरेज असणारे बेड, पलंग, मेटल बेड, लहान मुलांसाठीचे बंक बेड याव्यतिरिक्त कॅनोपी बेड तसेच कँटीलिवर बेड, रॉकिंग बेड, हँगिंग बेड, पुल-आऊट बेड, इत्यादी प्रकार पाहायला मिळतात. आपण त्यातील एकेक प्रकाराविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

स्टोरेज बेड – या बेडच्या आत जास्तीच्या गाद्या, उशा किंवा इतर काही सामान ठेवण्याकरिता जागा असते. भारतात विशेष करून जिथे लहान घरे आहेत अशा ठिकाणी या प्रकारच्या बेडला जास्त पसंती दिली जाते. यात निरनिराळ्या प्रकारे आपण स्टोरेज बनवू शकतो. एका प्रकारात हायड्रोलिक पंप बिजागरांचा वापर करून गादीसकट हलकेच वर उचलले जाणारे झाकण बनवून आत स्टोरेज केले जाते, तर आणखी एका प्रकारात आपण बेडला दोन्ही बाजूंनी किंवा समोरून सहज बाहेर येतील असे ड्रॉवर बनवू शकतो. ड्रॉवर असणारे स्टोरेज वापरण्याकरिता अतिशय सुटसुटीत असते. यात बेडवर कोणी झोपले असतानाही स्टोरेजचा सहज वापर होऊ शकतो; परंतु अशा प्रकारचे बेड बनवून घेताना ड्रॉवर उघडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे ना याची मात्र खात्री करून घ्यावी.

पलंग – हा बेडमधील एक लोकप्रिय प्रकार मानला जातो. आपल्याकडे भारतात तर पलंग फार जुन्या काळापासून वापरात असलेला दिसून येतो. याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे सुटसुटीतपणा. यात स्टोरेजची सोय नसते. पलंग शक्यतो लाकडात किंवा लोखंडाचा वापर करून बनवले जातात. चार पाय आणि त्यांना जोडणारी चौकट अशी बनावट असल्याने याला चौपाई किंवा चारपाई असेदेखील म्हणतात.

कॅनोपी बेड – हा पलंगाचा एक थोडा राजेशाही प्रकार म्हणता येईल. यात पलंगाचे जे चार पाय असतात त्यांना सरळ आणखी उंच करून पलंगाच्या डोक्यावर एक चौकट उभारली जाते. याचा उपयोग मच्छरदाणी किंवा सजावट म्हणून पडदे सोडण्यासाठी होतो. अशा प्रकारचे बेड हे शक्यतो मोठय़ा बेडरूममध्ये अवाढव्य आकारात चांगले दिसतात.

कँटीलीवर बेड – मुबलक जागा, आवड व पशाचे गणित एकत्र जुळून आले तर आपण या प्रकाराचा निश्चित विचार करू शकतो. या प्रकारात दोन समध्रुवी शक्तिशाली चुंबकाचा वापर करून बेड अक्षरश: तरंगता ठेवता येतो. थोडा जादूच्या प्रयोगांसारखा वाटणारा हा प्रकार आपल्या घरातील इंटेरियरची उंची कुठच्या कुठे नेऊन ठेवू शकतो.

रॉकिंग बेड – It’s really a rocking concept. मुबलक जागेची अट इथेही आहेच. जशी आपली रॉकिंग खुर्ची असते त्याच धर्तीवर रॉकिंग बेड बनवला जातो. याचा तळभाग अर्धगोलाकार असून झोपून पायाने दाब दिला असता तो छान डुलू लागतो.

हँगिंग बेड – झोपाळा हा आपल्यापकी बऱ्याच जणांचा आस्थेचा विषय असतो. लहानांपासून मोठय़ांपर्यंत झोपाळ्याचे आकर्षण नसणारी व्यक्ती विरळाच. हा बेड तर आपली अगदी झोपाळ्यात झोपण्याचीही इच्छा पुरी करतो. या प्रकारचे बेड म्हणजे एक मोठा झोपाळाच भक्कम दोरखंडांनी छताला लटकवला जातो. अशा प्रकारचे बेड बनवताना त्याच्या भक्कमपणाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

बंक बेड – लहान मुलांना साधं, सोप्पं, सरळ असं काही आवडतच नाही. त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये काही तरी नावीन्य हवं असतं. या नावीन्याचा विचार करून बंक बेडची कल्पना केली गेली असावी. बंक बेड म्हणजेच एकाच्या डोक्यावर एक एक असे रचलेले बेड. बंक बेड मुलांची वैचित्र्याची हौस पूर्ण करतातच, पण त्याचसोबत जागा वाचवण्याचेही काम करतात. विशेषत: लहान बेडरूममध्ये दोन मुलांसाठी दोन वेगवेगळे बेड करून जागा अडवण्यापेक्षा बंक बेड करून इतर जागा मुलांना खेळण्यासाठी किंवा इतर काही फर्निचर ठेवण्यासाठी उपयोगी पडू शकते. बंक बेड हा नुसताच बेड नसून, काही वेळा त्याला एखाद्या युनिटप्रमाणे डिझाईन करता येते. मग यामध्ये वरच्या बाजूला बेड आणि खाली स्टडी टेबल, कपाट, बुकशेल्फ यामधील काहीही बसवता येते.

पूल आऊट बेड – जिथे लहान बेडरूम आहे किंवा एकाच खोलीचा निरनिराळ्या गरजांनुसार वापर करायचा आहे अशा ठिकाणी पूल-आऊट बेड हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. याचे वैशिष्टय़ म्हणजे, बंद असताना हा एखाद्या सिंगल बेडप्रमाणे वापरता येतो. याच्या खालील बाजूस ड्रॉवरप्रमाणे बाहेर ओढता येणारा दुसरा बेड असतो. याचा उपयोग दोन सिंगल बेडप्रमाणे किंवा गादीमध्ये थोडे फेरफार करून डबल बेडप्रमाणेदेखील करता येतो. लहान मुलांच्या खोलीत किंवा पाहुण्यांच्या खोलीत अशा प्रकारचे बेड वापरले जातात.

अशा प्रकारे आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार आपण बेड बनवून घेऊ शकतो, पण बेड बनवत असताना फक्त बेडचा विचार करून चालत नाही. बेडसोबतच त्याचा हेड बोर्डदेखील महत्त्वाचा असतो. बऱ्याच लोकांचा असा गरसमज असतो की, हेडबोर्ड हा फक्त उशी घेऊन मागे टेकून बसण्यासाठी असतो. अर्थात तो जरी त्याचा मूळ उद्देश असला तरीही हेड बोर्ड, बेडचे सौंदर्य खुलविण्यात मोलाचा वाटा उचलतो. अगदी दोन फूट उंचीपासून ते छतापर्यंत उंचीचे हेड बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. लाकडात, स्टीलमध्ये, रेक्झिन किंवा कपडय़ांनी आच्छादलेले अशा अनेक प्रकारे हेड बोर्ड बनवले जाऊ शकतात. शिवाय शक्य असल्यास हेड बोर्डमध्ये शोकेसचादेखील अंतर्भाव करता येतो. सध्या बाजारात उंच हेड बोर्डची जास्त चलती आहे.

हेड बोर्डप्रमाणेच काही बेड ना फूट बोर्डदेखील पाहायला मिळतो. यालाही ही आपण हेड बोर्डप्रमाणेच सुशोभित करू शकतो. खरं तर हेड बोर्ड किंवा फूट बोर्ड असल्यानसल्याने बेडच्या कार्यक्षमतेत काहीच फरक पडत नाही तरीही सौंदर्य दृष्टिकोनातून पाहता या गोष्टी आवश्यक ठरतात.

याहीपलीकडे जाऊन जगात अनेक प्रकारे बेड बनवले जातात. कॉलेजमध्ये असताना मला आठवते, आम्ही दिल्लीला लाल किल्ला पाहायला गेलो होतो. तेथे एक साधारण दहा बाय बारा फुटांचा एक दगडी चौथरा तिथल्या गाईडने दाखवला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो बादशहा अकबराचा बेड होता. अर्थात ते पटणे जरा अवघडच होते, पण यावरून आपण कल्पना करू शकतो की, आपण किती प्रकारे बेड बनवू शकतो. -(इंटिरियर डिझायनर) pradhaninteriorsllp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:35 am

Web Title: comfortable beds home decoration akp 94
Next Stories
1 नावडत्या!
2 आयफोनचा नवा अवतार
3 नवलाई
Just Now!
X