मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in

जर येणारी व्यक्ती आपल्या परिचयातली असेल, तर आपलं घर पाहिल्यानंतर आपल्याकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो तरी, किंवा आपण जसे याला समजतो, तसाच हा आहे का याचा शोध त्यांची वेधक नजर घ्यायला सुरुवात करते. थोडक्यात काय, तर आपलं घर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. कारण आपल्या आवडीनिवडी, आपले विचार, आपल्या सवयी यांचं प्रतिबिंब आपल्या लिव्हिंग रूमच्या अंतर्गत रचनेवर पडलेलं स्पष्ट जाणवतं.

आपल्या घरी जेव्हा कोणी पाहुणे पहिल्यांदाच येतात, तेव्हा घरात शिरून आसनस्थ झाल्यावर त्यांची नजर घरभर फिरत असते. ही वेधक नजर घराच्या सजावटीबरोबरच ठाव घेत असते ती आपल्या राहणीमानाचा आणि त्यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा. अंदाज बांधायचं कामही आपोआप त्या व्यक्तीच्या मनात सुरू होतं. विचारांची चक्रे फिरायला लागतात. ती व्यक्ती जर आपल्याला अनोळखी असेल, तर एकंदरच आपण कसे आहोत, याचे अंदाज सुरू होतात. घराच्या सजावटीवरून, टेबल खुच्र्याच्या डिझाइनवरून, त्यांच्या जुनेनवेपणावरून आपण पुढारलेले, आधुनिकतेची आवड असलेले की परंपरावादी आहोत याचा अंदाज बांधला जातो. आपण शोभेच्या वस्तूंवर केलेला खर्च, नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चाचा अंदाज, घरातली टापटीप किंवा पसारा, अडगळ वगैरे यावरून आपली आर्थिक क्षमता, आपण दिखाऊ आहोत की, आपल्याविषयी इतरांना काय वाटेल याची पर्वा न करणारे, अशा अनेक गोष्टींचा अंदाज हे अनोळखी पाहुणे बांधत असतात. जर येणारी व्यक्ती आपल्या परिचयातली असेल, तर आपलं घर पाहिल्यानंतर आपल्याकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो तरी, किंवा आपण जसे याला समजतो, तसाच हा आहे का याचा शोध त्यांची वेधक नजर घ्यायला सुरुवात करते. थोडक्यात काय, तर आपलं घर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. कारण आपल्या आवडीनिवडी, आपले विचार, आपल्या सवयी यांचं प्रतिबिंब आपल्या लिव्हिंग रूमच्या अंतर्गत रचनेवर पडलेलं स्पष्ट जाणवतं.

आपल्या घरी येणारी व्यक्ती ही दिवसाच्या कुठल्या वेळी येते, त्यावरही या व्यक्तीची आपल्या घराविषयीची बरीचशी मतं अवलंबून असतात. दिवसाचा नैसर्गिक प्रकाश आणि रात्रीचा कृत्रिम प्रकाश किती आहे, यावरही त्या घरात आल्यावर कसं वाटतं, ते अवलंबून असतं. हे झालं पाहुण्यांबद्दल! पण इतरांना आपल्या घराविषयी काय वाटतं यापेक्षाही महत्त्वाचं असतं, ते आपल्याला आपल्या घरात कसं वाटतं ते. त्यामुळे आपला ‘मूड’ सांभाळायचा असेल, तर आधी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या खोलीचा वापर आपण कशाकशासाठी करणार आहोत. लिव्हिंग रूम म्हटली की तिथे घरातली लहान मुलं खेळतात. बऱ्याचदा सत्यनारायणाच्या पूजा, वाढदिवस किंवा इतर कौटुंबिक घरगुती सोहळे हेसुद्धा याच खोलीत होत असतात. त्याबरोबरच बऱ्याचदा संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला निवांत बसून टी.व्ही बघायचा असतो किंवा संगीत ऐकायचं असतं. या सगळ्या वेगवेगळ्या मूड्सना आवश्यक असलेलं वातावरण तयार करू शकेल, अशी प्रकाशरचना लिव्हिंग रूममध्ये करणं गरजेचं असतं.

तुम्ही जर लिव्हिंग रूममध्ये एका विशिष्ट खुर्चीत बसून वाचन करत असाल, तर त्या खुर्चीशेजारी जमिनीवर उभ्या असलेल्या स्टँडवर बसवलेला ‘फ्लोअर लाइट’ (सोबतच्या छायाचित्रातला क्रमांक १ चे दिवे पाहा) त्याकरता वापरता येईल. वाचन करताना पुस्तकाच्या पानावर थेट प्रकाश पडेल आणि कसल्याही सावल्या पडणार नाहीत अशा प्रकारे दिव्याची जागा ठरवावी. अशा प्रकारे जेव्हा विशिष्ट कामासाठी प्रकाशयोजना केली जाते, तेव्हा तिला ‘टास्क लाइटिंग’ असं म्हणतात. जिथे हलवता येण्याजोगं फर्निचर असेल, अशा फर्निचरसोबत फ्लोअर लाइटचा उपयोग प्रामुख्याने करावा. उदाहरणार्थ लिव्हिंग रूममधला सोफा किंवा खुच्र्या यांच्या मांडणीत जर फरक करायचा असेल, तर अशा ठिकाणी भिंतीवर कायमचा बसवलेला लाइट कदाचित नव्या रचनेत सोफा-खुच्र्यापासून खूप लांब गेलेला असेल. असं झालं तर मग त्याचा काय उपयोग? पण आपण जर फ्लोअर लाइट वापरत असू, तर तोसुद्धा या सोफा-खुच्र्यासोबत हलवता येईल. त्यामुळे वाचनासाठी लिव्हिंग रूममध्ये एकतरी फ्लोअर लाइट ठेवावा. तो लिव्हिंग रूमची शोभा वाढवण्याबरोबरच वाचनासाठी प्रकाशयोजना करायचा उद्देशही सफल करेल. आसनव्यवस्थेला उठाव द्यायचा असेल, तर लिव्हिंग रूममध्ये फॉल्स सिलिंग करून घेऊन त्यात पिवळ्या आणि पांढऱ्या प्रकाशाचे एलईडी दिवे बसवता येतील. यांना वातावरणनिर्मिती करणारे ‘एम्बियण्ट लाइट’ असं म्हटलं जातं. पण बऱ्याच जणांना यातले पांढऱ्या प्रकाशाचे दिवे नेहमीच्या वापराकरता, वाचनाकरता आवडतात. संगीत ऐकताना पिवळ्या प्रकाशाचे यातले केवळ काहीच दिवे लावले, तर योग्य ते वातावरण तयार व्हायला मदत होऊ शकते. पण हे अर्थात, प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असतं.

प्रकाश खूप जास्त असेल, तर टीव्ही पाहताना त्रास होतो. तसंच प्रकाश खूप कमी असेल, तर डोळ्यांवर ताण पडून डोकं दुखायला लागेल. यासाठी टीव्ही पाहताना टीव्हीच्या मागच्या भिंतीवर असलेला किंवा फॉल्स सिलिंगमध्ये थोडासा टीव्हीच्या स्क्रीनच्या मागे असलेला एखाद्दुसरा थोडासा मंद प्रकाशस्रोताचा दिवा लावावा. म्हणजे त्याचा प्रकाश स्क्रीनवर न पडता आपल्या डोळ्यांवर पडेल.

लिव्हिंग रूममध्ये जर पेंटिंग्ज लावली असतील, किंवा शिल्पे ठेवलेली असतील, किंवा इतर शोभेच्या काही खास वस्तू असतील, तर त्या उठून दिसण्यासाठी किंवा शोकेसच्यावर किंवा आतल्या बाजूला स्पॉटलाइटचा वापर करता येईल.  हॅलोजन दिव्यांचा यासाठी वापर केला, तर या कलाकृती अधिकच खुलून दिसतील. अशा प्रकारच्या प्रकाशयोजनेला ‘एस्सेंट लाइटिंग’ असं संबोधलं जातं. सोबतच्या छायाचित्रातले क्रमांक २ चे दिवे वापरून अशा प्रकारे आपल्याला पेंटिंग्ज आणि लाकडी रॅकवर ठेवलेल्या वस्तूंना सिलिंगला टांगलेल्या ट्रकलाइट्सद्वारे त्या पेंटिंग्ज आणि शोभेच्या वस्तूंना उठाव द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.

अशा प्रकारे लिव्हिंग रूम सजवताना त्या खोलीतल्या प्रत्येक प्रसंगासाठीच्या प्रकाशयोजनेचा तसंच शोभेच्या विशिष्ट वस्तूंना उठाव देणाऱ्या प्रकाशयोजनेचा विचार त्या घरातल्या लोकांचं व्यक्तिमत्त्वं लक्षात घेऊन करायला हवा, तर लिव्हिंग रूमच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातली रसिकताही त्यातून प्रतिबिंबित होईल.

इंटिरिअर डिझाइनर