१९८५-८६चा तो काळ. सगळीच घरं वन रूम आणि किचनने बनलेली. पुढे फार फार तर एक बाल्कनी! या बाल्कनीमध्येच लोक आपली गार्डनिंगची हौस फिटवून घेत असत. एक टॉयलेट, एक बाथरूम.  अशा घरातच आम्ही लहानाचे मोठे झालो. तसं पाहता मी एकुलती एक मुलगी. त्यामुळे कुटुंब तसं तिघांचंच. पण येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असायचा. वर्षांचे ३६५ दिवस घर पाहुण्यांनी आणि इतर लोकांनी भरलेलं, गजबजलेलं असायचं.

मिस्टरांच्या दाताचं ऑपरेशन होणार होतं. सासूबाई आणि ते दातांच्या डॉक्टरकडे गेले होते. सर्जरी फार सीरियस नसली तरी महत्त्वाची होती. मी घरी थांबले होते. स्वयंपाकपाणी, मुलांचं आवरून मी त्यांच्यासाठी एक रूम नीटनेटकी करून ठेवत होते. एका रूमचा बेड स्वच्छ बेडशीट घालून, उशांचे अभ्रे बदलून त्यांच्यासाठी तयार करून ठेवत होते. ते आल्यावर त्यांना झोपायला ‘ comfortable’ वाटावं, कुठेही, कोणताही ‘व्यत्यय’ येऊ  नये म्हणून मी काळजी घेत होते.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

ते आल्यावर कोणत्या खोलीत झोपतील असा विचार करत असतानाच मला माझ्या लहानपणच्या घराची, वन रूम किचनची आठवण झाली आणि मन होतं त्या ठिकाणीच थबकलं! मनाची पावलं मागे मागे जाऊ लागली आणि पाहता पाहता चक्क त्या वन रूम किचनच्या घरात जाऊन बसली! आमची सोसायटी तशी जुनीच. तीन विंग्स. त्यात सगळे मिळून ५८ फ्लॅट्स. आताच्या ‘फ्लॅट’ची आणि तेव्हाच्या ‘फ्लॅट’ची संकल्पना फार वेगळी होती. १९८५-८६चा तो काळ. सगळीच घरं वन रूम आणि किचनने बनलेली. पुढे फार फार तर एक बाल्कनी! या बाल्कनीमध्येच लोक आपली गार्डनिंगची हौस फिटवून घेत असत. एक टॉयलेट, एक बाथरूम.  अशा घरातच आम्ही लहानाचे मोठे झालो. तसं पाहता मी एकुलती एक मुलगी. त्यामुळे कुटुंब तसं तिघांचंच. पण येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असायचा. वर्षांचे ३६५ दिवस घर पाहुण्यांनी आणि इतर लोकांनी भरलेलं, गजबजलेलं असायचं. कधी कधी तर खो दिल्यासारखी लोकं येत. एक गेला, दुसरा आला, दुसरा गेला, तिसरा आला. गावाहूनही कोणीतही परिचित-अपरिचित माणूस आला तर तो सर्वप्रथम आमच्या घरी उतरे आणि त्याला जेवल्याशिवाय, राहिल्याशिवाय आई-बाबा कधीही सोडत नसत. आणि हे सगळं स्वखुशीने चालायचं. कोणत्याही दडपणाखाली किंवा औपचारिकतेखाली नाही. बाबांची शिफ्ट डय़ुटी असायची. रात्रपाळी करून आले की बाबा हॉलमधल्या बेडवरच झोपायचे. मग आम्हा मुलांना ‘आवाज करू नका रे’ म्हणून दरडावलं जायचं आणि मग आम्हीही आपण होऊन आवाज करायचा नाही, टीव्ही पाहायचा नाही, एकमेकांना मोठय़ा आवाजात हाक मारायच्या नाहीत अशा सूचना न सांगता पाळत असू. मग टीव्हीवर कितीही आवडीचा कार्यक्रम असला तरी आम्ही अगदी नकळत तो बघायचा टाळत असू. सेल्फ-कंट्रोलचं असं बाळकडू आमच्याच नकळत आम्हाला मिळत होतं. या छोटय़ा छोटय़ा त्यागांचा पुढील जीवनात एवढा फायदा होईल असं वाटलं नव्हतं. त्यावेळी एका मजल्यावर चार घरं. त्यामुळे साहजिकच सगळी घरं एकमेकांना लागून असायची. मग कधी सकाळी कोणाच्या तरी घरनं पुरणपोळीचा वास यायचा, तर कुणाच्या घरनं गरमागरम भजी तळल्याचा. बुधवार-शुक्रवारी कोणाकडे पापलेट, सुरमई फ्राय केली जायची. त्यावेळेस आपण आपल्या घरी कारल्याची भाजी खात असू तरी सुरमईच्या निव्वळ वासाने सुरमई खाल्लय़ाचा आनंद व्हायचा! मध्येच कधी अरोरा आंटी मक्के दि रोटी आणि पालक पनीर पाठवी. तर ख्रिसमसला रोझी आंटीच्या केकची आम्ही मुलं आतुरतेनं वाट बघत असू. गणपतीला मग तीच रोझी आंटी आमच्या घरी आरतीत सहभागी होऊन टाळ्या वाजवीत असे. श्रीधरन आंटीची इडली-चटणी लाजवाब वाटायची, तर गुप्ता आणि शर्मा आंटीच्या घरचं नवमीचं प्रसादाचं जेवण! अहाहा!! अजूनही आठवलं तर तोंडाला पाणी सुटतं..

काहींचं कुटुंब दोघांचं, तिघांचं, चौघांचं तर काहींचं आठांचंही असायचं. पण या ‘वन रूम किचन’मध्ये सर्वच जण आनंदाने, अभिमानाने, समाधानाने राहत असत. अशाच घरात माझी दहावी, बारावी, पंधरावी झाली. जशी माझी झाली तशी इतरांचीही झाली. आम्ही सगळेच चांगल्या मार्कानी पास झालो, कोणालाही वेगळी study room  ना असताही! काही जण तर बोर्डातही आले! रात्रीचं जेवण झालं, ओटा आवरून, लादी पुसून मग १०च्या सुमारास अभ्यासाला बसायचं. ते थेट २ वाजेपर्यंत. मग सकाळी लवकर उठायचं. पण तेव्हा आम्हाला अमूक एका गोष्टीचा त्रास होतोय, डिस्टर्ब होतंय ही जागा ‘ comfortable’ नाही असे विचार मनाला कधीच शिवले नाहीत. एवढीशी जागा, तीही खूप हवीहवीशी वाटणारी..

आज काळाबरोबर ‘वन रूम किचन’ची संकल्पना लोप पावत चालली आहे. वन रूम किचन घेणं लोकांना गरिबीचं लक्षण वाटतं. आता सगळ्यांचीच मोठमोठी घरं झाली. सुबत्ता आली. आजकाल फ्लॅटची किमान सुरुवात वन बेडरूम हॉल किचनने होते. तेही घेणाऱ्यांची संख्या आता कमी कमी होते आहे. अधिकाधिक लोक दोन किंवा त्याहूनही अधिक रूम घेणं पसंत करतात. हे बघून बिल्डरही आता ‘वन रूम किचन’ बांधणं बंद करीत आहेत. पण ‘वन रूम किचन’ची सर या मोठय़ा घरांना येणार नाही एवढं मात्र खरं. वन रूमच्या घरात सगळंच जवळजवळ असायचं, दाटी असायची. ती दाटी अर्थात नात्यांमध्येही दिसायची. आता या भल्या मोठय़ा घरात सगळंच एकमेकांपासून दूर, माणसंही..! प्रत्येकाच्या खोलीचं दार बंद, आत जायचं असेल तर ‘नॉक’ करून जावं लागतं. हे करताना मला तर खरं एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा वेटर असल्याचा ‘फील’ येतो! ‘‘अगं, मुलांनाही प्रायव्हसी पाहिजे ना!’’ असं म्हणणाऱ्या मैत्रिणीची मला कीव करावीशी वाटते.

आमच्या जुन्या वन रूम किचनचाही आता पुनर्विकास झालाय. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असं घर बिल्डरने लोकांना देऊ  केलंय. त्यामुळे अर्थातच नात्यांमध्येही अत्याधुनिकपणा आलाय, हे वेगळं सांगायची गरज नाही! पण मग काळाबरोबर आपण बदलायचं नाही का? हो. बदलायचं ना.. नक्की बदलायचं.. पण आपली मूळं (रूट्स) आपल्याच मातीत पक्की रोवून ठेवायची, मग पुढे कितीही वाढायला हरकत नाही!  थोडक्यात काय, तर मोठय़ा घरात ‘शिफ्ट’ होताना मनात मात्र ‘वन रूम किचन’नेच घर केलं असलं पाहिजे हे नक्की..!!

कीर्ती पाटसकर  kirti.pataskar@gmail.com