भूस्खलन, भूकंप, सुनामी, तापमान वृद्धी, महापूर, अतिवृष्टी इत्यादी आपत्तीच्या तडाख्यातून सहिसलामत वाचलेल्या प्राचीन वास्तू पाहिल्या की त्यांच्या मागे असलेल्या वैज्ञानिकतेचा शोध घेणं अपरिहार्य वाटू लागतं.

भारतीय उपखंडाला गेल्या हजारो वर्षांचा अनेक प्रकारच्या भूकंपांचा इतिहास आहे. ब्रह्मगुप्त, गर्ग, वराहमिहिर व आर्यभट आदी पूर्वाचार्यानी ज्योर्तिगणित, खगोलशास्त्र व भूगर्भशास्त्रांचा साकल्याने अभ्यास व त्यावर सतत संशोधन करून भूकंपाची लक्षणे, स्वरूप, कारणे व भाकीत करण्याची थक्क करून सोडणारी पद्धतही विकसित केली होती. अंगिरस ऋ षींच्या मेघोत्पत्ती प्रकरणातील विशिष्ट प्रकारचे ढग व भूकंप यांचा परस्पर संबंध तसेच विक्रमादित्या (२ रा) च्या नवरत्नांमधील एक असलेल्या वराहमिहिर या आचार्याने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथातील ३२व्या प्रकरणात पृथ्वी, वातावरण, भूजल, समुद्राखालील हालचाली, ग्रहभ्रमणांचा व ग्रहांच्या आकर्षणाचा परिणाम इ. घटक भूकंपाचे कारण असल्याचे सविस्तर नमूद केले आहे. त्याचप्रमाणे भूकंपाच्या वेळी विजा चमकणे, भूगर्भीय बदल, पक्षी व प्राणी यांच्या वागण्यातील बदल, अतिवृष्टी, काही कीटक व वनस्पतींची उत्पत्ती (अचानक) वा गायब होणे इ. निरीक्षणे नोंदविली असून विशेष म्हणजे पॅसिडेना, कॅलिफोर्निया येथील Earthquake Prediction Institute मधील संशोधकांचे निष्कर्ष व  ऋषीमुनींची Cloud Theory  व संबंधित सिद्धान्त यात कमालीचे साम्य आहे. विनाशकारी भूकंपासंबंधीच्या या सर्व माहितीचा उपयोग वास्तू संरक्षित करण्यासाठी करून वास्तूचे बांधकाम, आकार, साहित्य, इ.संबंधी निश्चित नियम वास्तुशास्त्रात अंतर्भूत केले. म्हणूनच प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या वास्तू हजारो वर्षे अनेकविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, तसूभरही न हलता श्रेष्ठ विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची साक्ष देत डौलाने उभ्या आहेत.

Loksatta editorial Spices Board bans some Indian brand products from Singapore and Hong Kong
अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!
History of Geography Long lasting regimes For the economic prosperity of the people Water management
भूगोलाचा इतिहास: राजवटींच्या दीर्घायुष्याचे रहस्य?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

अशा अविचल वास्तूत केदारनाथ, रामेश्वर, पशुपतिनाथ, पुरीचे जगन्नाथ मंदिर, तिरुपती बालाजी या मंदिरांचा मुख्यत्वे करून समावेश होतो. विनाशकारी ढगफुटी, भूकंप व वादळासारख्या निसर्ग कोपांमध्ये अद्ययावत- बऱ्याचवेळा भूकंपरोधक  (Earthquake Proof) तंत्रज्ञानाने बांधलेल्या अत्याधुनिक इमारती जमिनदोस्त होत असताना वैदिक काळापासून चालत आलेले भारतीय वास्तुशास्त्रच सर्वाना स्थिरता  व सुरक्षा देण्यास सक्षम असल्याचे जणू प्रात्यक्षिक करून दाखवत आहे.

निसर्ग लहरींना अविचारी मानवी हस्तक्षेपाची जोड मिळाल्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीच्या माऱ्यातून वाचलेल्या व अविचल असे प्राचीन वाडे, महाल, प्रार्थनास्थळं, मंदिर इत्यादी तसूभरही न हलता पूर्वीच्याच डामडौलाने उभ्या राहिलेल्या दिसतात. यामध्ये ओडिशा, तामिळनाडू, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश व पूर्वेतील काही राज्ये इत्यादींचा समावेश होतो. सूक्ष्म निरीक्षणाअंती अनेक वेळा उच्चकोटीच्या शास्त्रज्ञांना नैसर्गिक सिद्धांत, प्राचीन विज्ञान व नवभौतिक शास्त्रातील संकल्पना यात साम्य आढळले आहे.

अत्यंत भूकंपप्रवण भागावर वसलेलं दाट वस्तीचं दिल्ली. अनेक तीव्र (६ रिक्टरपेक्षा अधिक) भूकंपाचे धक्के खाऊनही तिथे पडझड झाली नाही. कारण तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार ऊर्जा स्पंदनांना संतुलित करण्यासाठी द्रष्टय़ा वास्तू पंडितांनी १८०० वर्षांपूर्वीच त्या ऊर्जाप्रवाहांना नियंत्रित व नियमित करून नकारात्मक स्पंदनांना उपयोजितेत परिवर्तित करण्यासाठी गूढ धातूंच्या विशिष्ट मिश्रणाचा (Alloy) अशोकस्तंभ, ज्यावरील सिंहप्रतिमा राजकीय स्थितीवर प्रभाव टाकत असते. पूर्वाचार्यानी केलेल्या अशा उपायांना नष्ट केल्यावर विनाश ओढवण्याचं उदाहरण अफगाणिस्तानचे त्या देशावर अत्यंत उपकारक प्रभाव संवाहित करून लोकमानस व राज्यसंस्था सुस्थिर ठेवण्याचं काम हजारो र्वषपासून वास्तुप्रतिमाशास्त्रानुसार घडविलेली बाहमियने बुद्धप्रतिमा, भग्न झाल्यावर तेथील पर्यावरण, शासनव्यवस्थेची वाताहत होऊन यादवी झाल्याचे सर्वानीच पाहिले आहे. १९९५च्या भयानक वादळात संपूर्ण ओरिसातील सरकारी व खासगी बांधकामं उद्ध्वस्त होत असताना ओरिसातील १८०० मंदिरं, रामेश्वरचं रामनाथ मंदिर वा एकही मंदिराचा ध्वजस्तंभही न हलल्याचा पुरावा भारतीय वास्तुशास्त्राची परिपूर्णता अधोरेखित करतो. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या विज्ञानमय प्रवाहाशी जोडलेले पशुपतिनाथ मंदिर हजार वर्षांपूर्वीचे १२० फूट उंचीचे नेपाळ नरेशाचे कुलदैवत असलेले भवानी मंदिर व शंभुनाथ मंदिर ही मंदिरं प्रवेशद्वाराबाहेरील किरकोळ पडझड सोडली तर अति विध्वंसकारी अशा अलीकडच्या भूकंपातही सहिसलामत सुटली, यामागचं रहस्यही काटेकोरपणे पाळली गेलेली वास्तुसूत्रे होत.

गुजरातमधील सोमनाथ नागेश्वरमध्ये २००१ साली आलेला भूकंप या ज्योतिर्लिगाच्या स्थानाला किंचितही हलवू शकला नाही. पुरीचे जगन्नाथ मंदिर असो की भूज भूकंपातील लोकांना समर्थपणे, सुरक्षित आश्रय देत वाचवणारं अंजारचं जुनं मंदिर असो, या ठिकाणी वास्तुशास्त्रीय तत्त्वे पाळली गेली आणि ती निश्चितपणे अभ्यासनीय आहेत. या सर्वात अव्वल मानलं जाणारं तिरुमलावरचं बालाजी मंदिर हे दक्षिणशैलीत बांधलं गेलेलं आहे. बर्फाच्छादित शिखर व ग्लेशियर्समध्ये वसलेलं समुद्रसपाटीपासून ११,७५५ फूट उंचीवरचं उत्तराखंड राज्यामधील रुद्रप्रयाग जिल्ह्यतील प्रसिद्ध केदारनाथ धाम स्थानाला २०१३च्या प्रलयंकारी ढगफुटी व विनाशकारी पुरात व दरडमाती कोसळणं हे यत्किंचितही हलवू शकले नाहीत. त्यानंतरही सर्वाचं एकमेव आश्रयस्थान ठरलेलं हे जागृत शिवस्थान पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मद्रास आय.टी. चमू व भारतीय पुरातन खात्याच्या शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करून घोषितही केले. या सर्वाचं कारण हे मंदिर बांधताना केलेलं प्राचीन, रहस्यमय वास्तुसूत्रांचं काटेकोर पालन होय!

वास्तू अशा नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी वास्तुसूत्रकारांनी अनेक उपाय प्राचीन ग्रंथात सांगितले आहेत. भूमिपरीक्षणासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व नियमामध्ये भूमीचे आकार, स्पंदनं, भौगोलिक अवस्था व वातावरण याचा तसेच घर, प्रासाद व मंदिर बांधकामाची वेळ, म्हणजेच मुहूर्त ऋ तू व बांधकामाचे विविध ठिकाणचे आकार विशिष्ट असावे असा वास्तुपंडितांचा आग्रह असे. तो मुख्यत्वेकरून नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठीच. वास्तू बांधताना दगड, माती, चुना, विटा व रेती, लाकूड यांच्याही पलीकडील ऊर्जाना महत्त्व दिलं जात असे. वास्तूंचा भूमिलंब म्हणजेच पायाची खोली आधुनिक शास्त्रातील ६/७ फुटाएवढीच सांगितली गेली आहे. त्यानंतरचा पाया बेस हाही तेवढय़ाच उंचीचा असावा असा नियम आहे. विशेषत: मंदिर व प्रासाद बांधकामासाठी अनेक खांब व एकाहून अधिक मजले आवश्यक असल्यास वरील मजला हा खालील मजल्यापेक्षा १/१२ उंचीने कमी असावा असे बृहत्संहिताकार सांगतो. असे केल्यास भूकंपाच्या वेळी इमारत हेलकावे खाते, पण पडत नाही. बांधकामाचे साहित्य म्हणजे इष्टिका (वीट), शिला (दगड) व लाकूड हे एकत्रितपणे निसर्गाशी एकरूप होणारे पण नैसर्गिक आपत्तीत अढळ व मजबूत तसेच धक्के व कंपने सहन करणारे यासाठी लोखंड लाकडाचा युक्तीने वापर सांगितला गेला आहे. कारण ते धक्के सहन करणारे मानले जातात. याशिवाय चौकोन, षटकोन व अष्टकोन,  इ. आकाराच्या बांधकामामुळे महाभूतांचे असंतुलन व धक्के, इ. सर्व दिशांना विभागले जाऊन सौम्य होतात. लाकडीच नव्हे तर दगडी बांधकामेही भूकंप अवरोधक व पंचमहाभूतांचे व इतर ऊर्जाचे अदृश्य प्रभाव रोखणारी अविचल असल्याचे कालौघात सिद्ध झाले आहे.

सध्याच्या भूकंप, ढगफुटी व वादळं या सर्वाच्यामुळे झालेली हानी पाहता वास्तुशास्त्रातली तत्त्वे नैसर्गिक आपत्तींना प्रतिबंध करतात असं म्हणण्यापेक्षा अशा आपत्तींपासून वास्तूचं रक्षण मात्र निश्चित करू शकतात असं दिसतं.  अतिप्राचीन वैदिक काळापासून चालत असलेल्या भारतीय वास्तुशास्त्रातल्या सूत्रांना निश्चित, शाश्वत, उपयुक्त असे अनुभूतिजन्य अधिष्ठान लाभलेले आहे.

डॉ. उदयकुमार पाध्ये  Cosmic_society_india@yahoo.co.in