आधी मन शांत होतं. मग मनाला अध्यात्माची ओढ लागते आणि त्यानंतर मनाला लागलेल्या अध्यात्माच्या ओढीचं रूपांतर हे हळूहळू विरक्तीत व्हायला लागतं. माणसाचं मन हे समुद्राच्या तळापासून अनंत अवकाशात कितीही उंचीपर्यंत कुठेही भरारी मारू शकतं आणि त्याच वेळी जेव्हा मनाला विश्वाच्या या अफाट पसाऱ्याचा हा सगळा खेळ क्षणाक्षणाला बदलणारा आणि म्हणूनच तात्कालिक आणि क्षणभंगुर आहे, हे जाणवायला लागतं, तेव्हा जिथे विश्वच शाश्वत नाही, तिथे आपलं आयुष्य, त्यातल्या बऱ्यावाईट घटना यांना किती महत्त्व द्यायचं याची उमज बुद्धीला पडायला लागते. अशा वेळी नराश्याकडे झुकण्याचा धोका असतो. म्हणून माणसाला खरं तर आवश्यक असतो तो एकांत! या एकांतात माणूस स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं आणि आपण आयुष्यात गाजवलेल्या कर्तृत्वाचं निरीक्षण करू शकतो. त्यामुळे मग स्वत:तल्या ‘स्व’चा शोध लागला की, आपलं मन ग्रासून टाकणाऱ्या नराश्यवादी भावना खोटय़ा आहेत याची जाणीव होते आणि मग पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासाने माणूस आयुष्यातल्या आव्हानांना, संकटांना धीराने सामोरं जायला उभा ठाकतो. एरव्ही आपल्यातला अहंगंड पोसला जाऊ नये, असं अध्यात्म आणि आपली संस्कृती सांगते. पण अशा प्रसंगांना ‘स्व’चा शोध घेण्याची गरज असते, हेही तितकंच खरं. थोडक्यात काय, तर या ‘मी’ किंवा ‘स्व’चं सुयोग्य व्यवस्थापन करत जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ घालवणं म्हणजेच आयुष्य जगणं. त्यामुळे आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर जेव्हा जेव्हा आपल्याला असा ‘स्व’चा शोध घेणारं हे निरीक्षण करायचं असतं, तेव्हा जर आजूबाजूला जांभळा रंग असेल, तर तो या निरीक्षणाला हातभार लावतो. सप्तरंगांमध्ये सगळ्यात शेवटी असलेल्या आणि कमी वेव्हलेंग्थ अर्थात तरंगलांबी असलेल्या या रंगाची फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपल्यापर्यंत पोहोचण्याची वारंवारता ही सगळ्यात अधिक असते. त्यामुळेच तो मनावर आणि मनातल्या भावभावनांवर अधिक परिणाम करतो. इंद्रधनुष्यातला सगळ्यात शेवटचा असलेला रंगचक्रावरचा जांभळा रंग हा दुय्यम रंग असून तो निळ्या आणि तांबडय़ा रंगापासून तयार होतो. म्हणजेच तांबडय़ा रंगापासून सुरुवात करून निळ्या किंवा पारवा रंगापर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा तांबडय़ा रंगाकडे नेऊन रंगचक्र पूर्ण करणारा हा जांभळा रंग! निळ्या रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या मन शांत करणाऱ्या विरक्तीकडे नेणाऱ्या, तर तांबडय़ा रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या कोमेजलेल्या मनात चेतना निर्माण करणाऱ्या आणि ते फुलवणाऱ्या अशा असतात.

आध्यात्मिक उन्नतीसाठी बेडरूममध्ये, स्टडीरूममध्ये अर्थात चिंतनाच्या खोलीत किंवा जिथे कलात्मक निर्मिती करायची आहे, अशा एखाद्या स्टुडिओ किंवा ऑफिसमध्ये, एखाद्या उपचारपद्धतीचा वापर करून ज्या खोलीत माणसावर उपचार केले जातात अशा थेरपी-रूममध्ये किंवा जिथे खूप एकाग्रतेची गरज असलेलं असं काम चालतं, अशा खोलीमध्ये एकप्रकारे मेंदू आणि मध्यवर्ती चेतासंस्थेवर अधिपत्य गाजवणारा हा रंग दिला, तर अशी कामं अधिक प्रभावीपणे आणि जास्त कार्यक्षमतेने होऊ शकतात.

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

जांभळ्या रंगाची सगळ्यात चांगली गट्टी जमते ती हिरव्याबरोबर! निसर्गातही ही किमयागार जोडी आपल्याला पाहायला मिळते. (छायाचित्र १ पाहा) हिरव्या चुटूक पानांच्या पाश्र्वभूमीवर लेव्हेंडर रंगाची फुलं डोळ्यांना सुखावून जातात. त्यामुळे बठकीच्या खोलीतल्या सोफ्यामागच्या भिंतीवरच्या पडद्यासाठी किंवा सोफ्यासमोरच्या सेंटर टेबलवर रंगांची ही जोडी  ठेवली, तर ती अधिक खुलून दिसेल (छायाचित्र २ पाहा.) त्याबरोबरच जांभळा-पिवळा ही रंगचक्रावरची विरुद्ध रंगांची जोडीही खुलून दिसते (छायाचित्र ३.) जांभळा-पांढरा, निळा-जांभळा या जोडय़ाही मनावर प्रभाव पाडतात आणि विशेषत: बेडरूममध्ये विश्रांती घेताना आवश्यक असलेली मनाची शांती राखण्यासाठी किंवा एकाग्रता आवश्यक असलेल्या अभ्यासिकेसाठी जांभळा आणि पांढरा ही रंगजोडीही खोलीची शोभा वाढवण्याबरोबरच सुयोग्य परिणाम साधायला मदत करते. (छायाचित्र ४)

अशा प्रकारे जांभळा रंग हा मनाला एकप्रकारची विरक्ती प्रदान करण्याबरोबरच स्वत:तल्या ‘स्व’चा शोध घ्यायला मदत करून मनाला उभारी द्यायलाही मदत करतो.

निळ्या रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या मन शांत करणाऱ्या विरक्तीकडे नेणाऱ्या, तर तांबडय़ा रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या कोमेजलेल्या मनात चेतना निर्माण करणाऱ्या आणि ते फुलवणाऱ्या अशा असतात. आध्यात्मिक उन्नतीसाठी बेडरूममध्ये, स्टडीरूममध्ये अर्थात चिंतनाच्या खोलीत किंवा जिथे कलात्मक निर्मिती करायची आहे, अशा एखाद्या स्टुडिओ किंवा ऑफिसमध्ये, एखाद्या उपचारपद्धतीचा वापर करून ज्या खोलीत माणसावर उपचार केले जातात अशा थेरपी-रूममध्ये किंवा जिथे खूप एकाग्रतेची गरज असलेलं असं काम चालतं, अशा खोलीमध्ये एकप्रकारे मेंदू आणि मध्यवर्ती चेतासंस्थेवर अधिपत्य गाजवणारा हा रंग दिला, तर अशी कामं अधिक प्रभावीपणे आणि जास्त कार्यक्षमतेने होऊ शकतात.

मनोज अणावकर

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in