विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपला पर्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र डावी लोकशाही समितीच्या १४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी या वेळी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, परंतु कार्यकर्ते त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती पक्षाचे सरचटिणीस जयंत पाटील यांनी दिली.
सत्ताधारी आघाडी आणि महायुतीच्या विरोधात लढण्यासाठी भाकप, माकप, शेकाप, जनता दल (धर्मनिरपेक्ष), रिपब्लिकन पक्ष (सेक्युलर), रिपब्लिकन पक्ष (खरात गट) या पक्षांचा समावेश असलेली महाराष्ट्र डावी लोकशाही समितीची स्थापना करण्यात आली.  समितीच्या वतीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढविणार असून, त्यापैकी १४ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.   शेकापचे आमदार विवेक पाटील (उरण) व धैर्यशील पाटील (पेण) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार मीनाक्षी पाटील यांच्याऐवजी अलिबागमधून सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील हे निवडणूक लढविणार आहेत. बळीराम पाटील यांना पनवेलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांनी या वेळी वयोमानानुसार निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. परंतु त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

माकपकडून नरसय्या आडम (सोलापूर शहर-मध्य), जीवा पांडू गावित (कळवण), बारक्या वंशा मांगात (डहाणू), डी.एल.कराड (नाशिक-पश्चिम) तर भाकपकडून भालचंद्र कांगो (ओरंगाबाद-पूर्व), मच्छिंद्र सकट (कांदिवली-पूर्व), श्याम काळे (हिंगणा) व हिरालाल इरमे (आरमोरी) यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. जनता दलातर्फे बुलंद इक्बाल निहाल अहमद (मालेगाव-मध्य) आणि मनवेल तुस्कानो (वसई) हे निवडणूक लढविणार आहेत.