वैदर्भीय माणूस बोलण्यात तसा अघळपघळ. मनात आले ते बोलून मोकळे व्हायचे हीच त्याची वृत्ती. भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी हे बोलण्याच्या बाबतीत पक्के वैदर्भीय. यावेळी त्यांच्या याच शैलीने मोठा घात केला आहे. विरोधकांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ करून घ्या आणि मतदान मात्र भाजपलाच करा, हा नितीनभाऊंचा सल्ला निवडणूक आयोगाने फारच मनावर घेतला आहे. आयोगाची नोटीस मिळताच गडकरींनी सारवासारव सुरू केली असली तरी नागपूरच्या महाल परिसरातील गडकरी वाडय़ात मात्र ‘लक्ष्मीदर्शन’ या शब्दावर अघोषित बंदी लादली गेली आहे. तसाही ‘लक्ष्मीदर्शन’ या शब्दाचा व विदर्भाचा संबंध जुना आहे. काँग्रेसचे माजीमंत्री सतीश चतुर्वेदी हे या शब्दाचे खरे जनक. गडकरींप्रमाणेच एकेकाळी काँग्रेसचे वजनदार नेते असलेले सतीशबाबू फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अशाच बोलण्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे अडचणीत आले होते. तर सांगायचा मुद्दा असा की, चतुर्वेदींनी निवडणुकीच्या राजकारणात आणलेला हा शब्द गडकरींनी उचलला. त्यालाही आता २०वर्षे झाली. निवडणूक प्रचाराची कुठलीही सभा असली की गडकरी या शब्दाचा हमखास उल्लेख करतात. प्रलोभने दाखवणाऱ्या विरोधी पक्षांच्या आमिषाला बळी पडा, पण बटनं कोणती दाबायची ते मात्र विसरू नका, हाच यामागचा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे गडकरींचे भाषण आणि लक्ष्मीदर्शन यांची सवय वैदर्भीय मतदारांना कधीचीच झाली आहे. आता गडकरी झाले केंद्रात मंत्री. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आले, प्रसिद्धी मिळू लागली. हा बदल लक्षात घेऊन बोलायला पाहिजे हे नितीनभाऊंना उमगलेच नाही आणि मोठा घोटाळा झाला. शेवटी माणसाची प्रतिष्ठा वाढली तरी सवयी काही सुटत नाही हेच खरे. मध्यंतरी महाराष्ट्राचे जाणते नेतृत्व शरद पवार यांनी अशाच अजाणतेपणी दोनदा मतदान करण्याचा सल्ला देऊन टाकला होता. आता त्यांचेच राजकीय मित्र गडकरी सुद्धा सवयीनुसार बोलून गेले. जाहीर सभेत मतदारांना पैसा खा असे सांगणे हे खरे मोठे पातकच. मात्र आपण स्वच्छ आणि इतर तुच्छ अशी तुलना करण्याच्या नादात अनेकदा राजकीय नेते असे बेकायदेशीर सल्ले देऊन मोकळे होतात. गडकरींचे नेमके तेच झाले. आता आयोगाला काय उत्तर द्यायचे ते नितीनभाऊ बघून घेतील, पण सध्या नागपूरच्या वाडय़ात ‘लक्ष्मी’ असे जरी कुणी म्हटले की कार्यकर्ते दटावणीच्या नजरेने बघतात. दिवाळीत ‘लक्ष्मी’ नावाच्या मोठय़ा आवाजाच्या फटाक्याची चर्चा असते. आता आयोगाच्या वक्रदृष्टीमुळे दिवाळी आधीच या ‘लक्ष्मी’वर बंदी आली हे मात्र खरे!