‘उद्या संपणार का संघर्ष यात्रा?’..
‘संघर्ष’वर जोर देत सुधीरभाऊ म्हणाले आणि नितीनभाऊंनी विनोदजींकडे बघितलं. विनोदजींनी नाथाभाऊंकडे कटाक्ष टाकला, आणि नाथाभाऊंनी देवेद्रभाऊंकडे पाहिलं..
सुधीरभाऊंना कोणत्या संघर्षांबद्दल बोलायचं होतं, ते सगळ्यांनाच समजलं होतं.
‘हो.. उद्या समारोप करायलाच हवा.. वेळ खूप कमी उरलाय हातात’.. विनोदजी म्हणाले, आणि सुधीरभाऊंच्या चेहऱ्यावर रागाची छटा उमटली.
‘किती दिवस नुस्तंच भांडत बसणार?.. मतदारसंघात कधी जायचं?.. प्रचाराला सुरुवात कशी करायची?.. करून टाका ना एकदा या पण संघर्ष यात्रेचा समारोप’.. सुधीरभाऊ तावातावानं बोलले.
समोरच्या टीपॉयवरचे मूठभर शेंगदाणे उचलून दोन्ही हातांनी रगडत नितीनभाऊंनी त्यावर एक जोरदार फुंकर मारली. सारी सालपटं उडून गेली. एकएक शेंगदाणा तोंडात टाकतत नितीनभाऊंनी डोळ्यांनीच सुधीरभाऊंना शांत होण्याची खूण केली.
‘किती दिवस झाले नं भौ.. जागावाटपाचं गुऱ्हाळ तुमाला सुटतंच नै ना.. ते मीडियावाले चारचार फॉम्र्युले देऊन ऱ्हायलेत. आपल्याकडं तं एकपन तयार नाही’.. पुन्हा सुधीरभाऊंचा पारा चढला.
नाथाभाऊ, विनोदजी आणि देवेंद्रभाऊ गप्पच होते.
‘नितीनभौ, आता अंतिम निर्णय जाहीर करून टाका.. सगळे इच्छुक कंटाळले. त्यांना कायतरी सांगितलं पायजे’.. सुधीरभाऊंचा आवाज नरम झाला होता.
‘नायतर, पुन्हा पक्षांतराची लाट यायची’.. त्यांच्या मनात विचार आला. पण बोलणं शहाणपणाचं नाही, असं समजून ते गप्प बसले.
तोवर नितीनभाऊंच्या हातातले सोललेले शेंगदाणे संपले होते. ‘काय करायचं?’.. नितीनभाऊंनी विचारलं.
‘तुम्ही ठरवाल तसं.. राज्यातली परिस्थिती आम्ही तुमच्या कानावर घातली आहे. आमचं म्हणणंही सांगितलेलं आहे. आता निर्णय तुम्हीच घ्यावा’.. देवेंद्रभाऊ म्हणाले. सुधीरभाऊंनी पुन्हा तावातावानं मान हलवली.
‘बरोबर आहे. तुम्ही निर्णय घेतला, की जबाबदारी पन तुमचीच ना भौ.. चुकला तं तुमी, बरोबर आला तं तुमचं कौतुकच करणार आमी’.. बोलावं की नाही, असा विचार करत सुधीरभाऊंनी तोंड उघडलं, पण ते काहीच बोलले नाहीत.
‘आपण एक काम करू या.. तीन निर्णय तयार ठेवू या.. आयत्या वेळी प्रेसला द्यायला गडबड व्हायला नको.’ तेवढय़ात विनोदजींनी सुचवलं, आणि समोरचं नोटपॅड पुढे ओढून त्यावर लिहायला सुरुवातही केली.
‘महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भ्रष्ट आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही एकदिलाने लढणार आहोत’..
दुसरा कागद काढला, त्यावर लिहिलं, ‘आम्ही अखेपर्यंत सामोपचाराचे प्रयत्न करीत होतो, पण आमचा नाईलाज झाला. तरीही आम्ही एका समान विचाराच्या धाग्याने बांधलेले आहोत. तो धागा एका निवडणुकीत वेगळे लढल्याने तुटणार नाही’..
तिसऱ्या कागदावर लिहिलं, ‘आम्ही मैत्रीपूर्ण लढण्याचे ठरविले आहे.. कारण आम्ही एकाच विचाराचे पाईक असलो, तरी कार्यकर्त्यांचा दबाव आणि जनतेच्या इच्छेचा आदर करण्याचे आम्ही ठरविले आहे.’
तीनही कागद खिशात ठेवून विनोदजी उठले, आणि बैठक संपली..