लोकांनी काही म्हटलं तरी, तू काही शत्रू नाहीस. मात्र जरी तुझे हेतू वाईट नसले, तरी तुला ‘मित्र’ म्हणायचं असेल तर तूही जरा समजून घे ना..

प्रिय मित्रा कोविड-१९,

तुला येऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला. पहिल्यापासून तू नीट आठवलंस, तर मी तुला कधीही शत्रू म्हटलेलं नाही. तुझ्याशी लढतो, तुझ्याविरोधातील ही लढाई मला जिंकायची आहे, असं मी चुकूनही म्हटलं नाही. सुरुवातीला काही लोकांना असं वाटलं की ही लढाई आहे. आमचे पंतप्रधानही म्हणाले की, ही लढाई जिंकायला हवी; ही लढाई आपण नक्की जिंकू. ते फार चांगल्या हेतूने म्हणाले. पण माझ्या लक्षात आलं, की पुढे पुढे काही लोकांनी तुझं राजकारणच केलं, जसं हल्ली सुशांतसिंह राजपूतचं होत आहे. हळूहळू काही लोक धंदाही करू लागले. पण त्याकडे तू दुर्लक्ष कर. कारण खूप लोकांनी एकमेकांना या काळात मदतही केली. विशेषत: आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, प्रशासन..

मी असं म्हणेन की, तू अनाहूत पाहुणा होतास. पण माझ्या संस्कृतीमध्ये ‘अतिथि देवो भव:’ हा धर्म असल्यामुळे तू जरी न कळवता आला, तरी तू येताच मी बाहेर न पडता घरात थांबलो. तुला काय हवं नको ते पाहिलं. तुझ्या अवचित येण्यानं खरं तर मी घाबरलो होतो. कारण आपली पूर्वीची ओळख नाही. सुरुवातीला काही भीती वाटली नाही, पण पुढे तू अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्यावर मी फारच घाबरलो. त्यामुळे सगळेच घाबरले. तू सांगायचा प्रयत्न करत होतास की, तू निसर्गाचा दूत म्हणूनच आलायस. आधीही असे दूत आले होते. पण ते एकेकटे कुठे तरी.. म्हणजे भूकंप, त्सुनामी, पूर वगैरे..! आम्हाला जाणीव देण्यासाठी. पण निसर्गाच्या लक्षात आलं, की तंत्रज्ञानात खूप पुढे गेलेला हा माणूस हे काही समजून घ्यायला तयार नाही.

तेव्हा स्ट्रॅटेजी बदलून एकाच वेळेला सगळीकडे ‘ग्लोबल दूत’ म्हणून तुला पाठवायचं निसर्गानं ठरवलं. त्यामुळे तू आलास. सांगू लागलास की, मीसुद्धा निसर्गाचाच भाग आहे. तुम्ही माझीच भावंडं आहात. मी केवळ तुम्हाला समजून सांगायला आलोय की मी शत्रू नाही. फक्त निसर्गाचा दूत आहे..

पण जसं मुलं मोठी झाल्यावर त्यांना शिंगं फुटतात, तसं आमचं माणसांचं व्हायला लागलं. कारण आम्हाला वाटलं, की सगळं तंत्रज्ञान आम्हाला अवगत आहे. तू सांगत होतास की, नीट बघितलंत तर याआधी अशा घटना झाल्या आहेत हे तुमच्या ध्यानी येईल. प्लेग येऊन गेलाय, स्पॅनिश फ्लू येऊन गेलाय. आमचे दूत ग्लोबली आधीसुद्धा आले होते. दर वेळी आम्हीच तारून नेलंय तुम्हा माणसांना आणि त्यामुळेच तुम्ही आहात ना अजून? हे समजावून घ्या अन् समजून घेऊन वागा. आयुष्य असं ओरबाडून जगण्यापेक्षा दिलेलं आयुष्य समाधानानं जगा ना तुम्ही..

आता तुझ्या भीतीमुळे म्हण किंवा कशामुळे म्हण, लोकांचं वागणं एकदम बदललं. लोक हातपाय धुवायला लागले. एकमेकांत अंतर ठेवायला लागले. घरात राहून एकमेकांशी बोलायला लागले. पूर्वी आमच्या संस्कृतीत आम्ही आरोग्य आणि नात्यासाठी जे पाळत होतो, ते सगळं परत आलं. जे आम्ही कशाच्या तरी मागे धावत होतो, तीस वर्षांत साठ वर्षांचं आयुष्य जगू पाहात होतो तो आमचा वेग कमी झाला. खरं म्हणजे, आनंदानं जगायला किती कमी गोष्टी लागतात, हे हळूहळू तीन-चार महिन्यांतच आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्हाला झालेल्या ‘दिल माँगे मोअर’ या रोगानं आम्ही जे नुसते पळत सुटलो- कशाच्या मागे पळत सुटलोय हे न कळताच- ते तू आल्यावर कमी झालं. आम्हाला जरा भान आलं. चांगल्या लोकांनी आम्हाला सांगितलं, की वर्तन सुधारा; मग आपोआपच पाहुणा जाईल. हे खरं आहे रे.. आता हे लक्षात आलंय की, खूप लोकांना हे पटलंय. त्यामुळे तुझी बाधा होण्याचं प्रमाण वाढलं असलं, तरी मृत्यूचं प्रमाण कमी झालंय. तशी आम्ही माणसं विचार करणारीही आहोत. तू यायच्या आधी आम्हाला जो ‘हावऱ्या’ नावाचा रोग झाला होता, तो जर कमी झाला तर तूसुद्धा मुक्काम लांबवणार नाहीस फारसा..

म्हणून कालपरवा धीर एकवटून म्हणालो, दोस्ता, आता बघ ना, सहा महिने झाले. पाहुण्यांनी तरी किती राहायचं? तुला अजून राहायचं असेल तर माझी हरकत नाही. पण तू तुझ्या खोलीत राहा, मी माझ्या खोलीत राहतो. यू अल्सो क्वारंटाइन युवरसेल्फ डीयर..! येऊन मला माझ्याच घरातून बाहेर काढू नको रे! नाही तर मग मला वाटेल की, भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी! लोकही मला म्हणतील की, बघ, आम्ही तुला सांगितलं होतं की नाही तो शत्रू आहे ते? अर्थात, लोकांनी काही म्हटलं तरी मला काही ते पटलेलं नाहीच आहे ते.. तू काही शत्रू नाहीस. मात्र जरी तुझे हेतू वाईट नसले, तरी तुला ‘मित्र’ म्हणायचं असेल तर तूही जरा समजून घे ना.. म्हणूनच, संबोधनाचा घोळ न घालता केवळ आपण एकत्र कसे राहू शकू याचा आपण विचार करू.. तू कायमचा जा असं मी नाही म्हणत, कारण माझा तो अधिकार नाही. आणि तूही थोडा मॅच्युअर झाल्यानं आम्हाला सोसवशील इतकाच तू राहशील अशी मला आता खात्री वाटते आहे. तशी चिन्हं तूच दाखवतो आहेस. म्हणजे पूर्वीच्या मानाने कमी लोकांना अज्ञातस्थळी घेऊन जातो आहेस आणि खूप लोकांना घरी पाठवतोयस. तुझे हेतू वाईट नाहीत हेही हळूहळू पटतंय. तेव्हा राहा तू.. जरूर राहा. राहण्याबद्दल काही नाही, फक्त एकच सुचवावंसं वाटतं, की सुखानं एकत्र नांदण्याचा प्रयत्न आपण दोघंही करत राहू या. चालेल?

तुझा समजूतदार मित्र,

डॉ. मोहन आगाशे