साडय़ा खरेदी करणे हा एक मोठा कार्यक्रमच असतो. त्यातही पुन्हा लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर मग विचारूच नये! त्यातल्या त्यात परिचयाचे दुकान असेल तर, पांढऱ्याशुभ्र बैठकीवर गिऱ्हाईक बसल्यानंतर त्यांच्या पुढय़ात लुगडय़ांची चवड अदबीने सादर होई. ढिगातल्या पातळांच्या घडय़ा यथावकाश खालीवर होऊ लागत. प्रथमदर्शनी मनात भरलेल्या साडय़ांचा शेजारीच मग आणखी एक अंमळ छोटासा ढिगारा आकार घेई. बरेच चर्वितचर्वण झाल्यानंतर त्या छोटय़ा ढिगातील एक एक साडी उलगडून दाखविण्याचे फर्मान जारी होई. अलवार हाताने घडय़ा उलगडून एकदा का लुगडय़ाचे अंग, काठ, पदर, सुताचा पोत, नक्षीकाम यांचे सौंदर्य खुलून नजरेसमोर उभरले, की सगळ्यांच्याच मुखावर संतोषाचे भाव विलसू लागत. तिथवर घडीमध्ये अवगुंठित झालेले त्या लुगडय़ाचे अवघे देखणेपण बघता बघता बघणाऱ्यांच्या मनाचा कब्जा घेई. खरेदीचा आनंद शतगुणी बने. इथे काय होते आहे हे आपल्या ध्यानात येते का? साडी होती एकच, मात्र ती प्रगटली द्विविध रूपांत. वस्तू एकच, मात्र तिचे दर्शन द्विविध. केवळ इतकेच नाही, तर दोन्ही अवस्थांमधील तिचे दर्शन आपापल्या परीने देखणेच. हाच तर आहे सांगावा अद्वयदर्शनाचा! शक्तिमान शिव हे आपण प्रतिक्षणी जगत असलेल्या जगाचे जे आदिकारण आणि अधिष्ठान, ते शिवतत्त्वही असेच दोन रूपांत विराजमान असते, हा तर ज्ञानदेवांच्या तत्त्वपरंपरेचा गाभा. शिवाची ती दोन रूपे त्याच्या दोन अवस्थांशी निगडित आहेत. हे शिवतत्त्व ज्या वेळी नामरूपात्मक अशा कोणत्याही प्रकारच्या उपाधीखेरीज केवळ आणि केवळ स्पंदरूपाने ‘असतचि असे’ या अवस्थेमध्ये क्रियारहित स्थित असते, तेव्हा त्या अवस्थेतील त्याच्या त्या रूपाला ‘विश्वोत्तीर्ण’ असे संबोधन आहे. वर्णन करण्यासाठी काहीही साधनच त्या अवस्थेमध्ये नसल्याने त्याचे वर्णन निखळ ‘असतचि असे’ असेच करावे लागते. अशा त्या क्रियारहित अवस्थेचा त्याग करून तेच तत्त्व ज्या वेळी जगदाकार बनते, अनंतविध नामरूपांच्या उपाधीने नटते-विलसते, तेव्हा त्याच्या त्या बहुविध रूपाला ‘विश्वात्मक’ असे संबोधतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, विश्वाचे आदिकारण असणारे हे तत्त्व ज्या वेळी निरुपाधिक अशा ‘विश्वोत्तीर्ण’ रूपांत नांदते तेव्हा त्याला म्हणतात ‘शिव’. तर तेच तत्त्व जेव्हा नामरूपात्मक उपाधींची लेणी लेवून ‘विश्वात्मक’ रूपात विलसते तेव्हा त्याला अभिधान लाभते ‘शक्ती’. घडीमध्ये दुमडून ठेवलेल्या साडीचे देखणेपण ज्याप्रमाणे घडी मोडल्यानंतर शतगुणी होऊन बहरते, त्याच न्यायाने विश्वोत्तीर्ण असणारे शिवतत्त्व शक्तीरूपाने विश्वात्मक होऊन विलसू लागले की त्याचे अवघे वैभव अगणित नामरूपांनी उमलून येते. विश्वदर्शन हे वस्तुत: शिवदर्शनच होय, हा सिद्धांत योगीराज चांगदेवांना समजावून सांगण्यासाठी ‘चांगदेवपासष्टी’मध्ये ज्ञानदेवांनी, ‘‘घडियेचेनि आकारें। प्रकाशिजे जेंवि अंबरे। तेंवि विश्वस्फूर्ति स्फुरे। स्फूत्तर्ि चि हे।।’’ अशा शब्दांत, घडी घातलेले लुगडे आणि घडीतून उलगडलेले लुगडे यांच्या परस्परनात्याचाच दृष्टांत दिलेला आहे. जगाचे मूलद्रव्य असलेल्या तत्त्वाचे हे उभयरूप आणि त्यांच्या दरम्यानचे हे नाते स्पष्ट होण्यासाठी संतपरंपरेने शिरोधार्य मानलेले साधन म्हणजे नाम. ‘एक तत्त्व नाम दृढ धरी मना’ असा ज्ञानदेवांनी ‘हरिपाठा’मध्ये जो मनोबोध मांडलेला आहे,

त्याचा गाभा हाच!

– अभय टिळक agtilak@gmail.com