गेले वर्ष पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याने, तर हे वर्ष पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अर्थात पीएमसी बँकेने एचडीआयएल समूहाच्या संगनमताने केलेल्या सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या अपहाराने गाजले. हा घोटाळा सप्टेंबर महिन्यात उघड झाला आणि अवघ्या काही तासांत रिझव्‍‌र्ह बँकेने प्रशासक नेमून या बँकेचे सर्व व्यवहार ताब्यात घेतले. त्यामुळे देशभर विखुरलेले या बँकेचे हजारो खातेदार-ठेवीदार अडचणीत आले. ठेवी सुरक्षित राहतील का, या प्रश्नाने चिंताग्रस्त झालेल्या खातेदारांपैकी काहींचा मृत्यूही ओढवला. घोटाळा उघड झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून रोज नवनवीन बाबी समोर येऊ लागल्याने अन्य सहकारी बँका आणि पतपेढय़ांचे खातेदारही आपली ठेव सुरक्षित राहील का, या विचाराने कासावीस झाले. हातावर पोट असलेल्या श्रमिक वर्गापासून व्यावसायिक, पतपेढय़ा, सहकारी गृहनिर्माण संस्था, गुरुद्वारा ते अगदी रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कर्मचारी संघटनांचीही खाती पीएमसी बँकेत होती.  दिवाळखोरीत निघाल्यात जमा असलेल्या एचडीआयएल समूह कंपन्यांना पीएमसी बँकेने एकूण कर्जापैकी तब्बल ७३ टक्के कर्ज दिले होते. हे कर्ज एचडीआयएल परत करू शकणार नाही, याची कल्पना बँकेच्या संचालक मंडळापासून लेखापरीक्षकांपर्यंत प्रत्येकाला होती. मात्र या सर्वानी त्याकडे दुर्लक्ष केले. ही गोम रिझव्‍‌र्ह बँकेच्या लक्षात येऊ नये म्हणून एचडीआयएल समूह कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या नोंदी करण्याऐवजी बँकेने २१ हजार बनावट कर्जखाती तयार केली. या आठवडय़ात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्यासह पाच प्रमुख आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. नव्या वर्षांत खटल्याची सुनावणी सुरू होईल. न्यायालयाच्या परवानगीने आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल कंपनीच्या जप्त केलेल्या स्थावर, जंगम मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ठेवी सुरक्षित राहतील का, हक्काचे पैसे मिळतील का, ही खातेदारांना भेडसावणारी काळजी नव्या वर्षांत दूर होण्याची शक्यता आहे!