पराग श्याम परीट

भारतातील बहुतांश शेती आजही पावसावर अवलंबून आहे. यामुळे याच पावसावर पोसला जाणाऱ्या शेती व्यवसायातील खरीप हंगामालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या हंगामाला सामोरे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, काय नियोजन करावे, शेतात काय बदल करावेत याचे मार्गदर्शन करणारा हा लेख.

Should you ditch other flours and only have almond flour
मैदा किंवा गव्हाच्या पिठाऐवजी फक्त बदामाचे पीठ वापरावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे
Money Mantra, instant loan, instant loan from the app , app instant loan, care while taking instant loan, Interest rate, cibil score, data privacy, private data, blackmail, instant loan care, marathi news,
Money Mantra: अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताना, काय काळजी घ्याल?
what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

देशातील बहुतांश शेतकरी वर्ग ज्या हंगामावर सर्वात जास्त विसंबून असतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला वाईट परिणाम घडवून आणणारा म्हणून जो ओळखला जातो तो खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गेल्या वर्षी पेक्षा यावेळच्या हंगामात जास्त उत्पादन मिळावे यासाठी काही गोष्टींची अंमलबजावणी फायदेशीर ठरू शकते. उत्पादन वाढीबरोबरच शेतकरी कुटुंबीय आणि त्याचे पशुधन यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील ही पूर्वतयारीची कामे महत्त्वाची ठरतात. केवळ जमिनीची मशागत म्हणजे हंगामाची पूर्वतयारी नव्हे तर सर्वच बाबींचा बारकाईने केलेला विचार आणि त्यादिशेने उचललेली पावले आपणाला चार महिन्यांनी चांगला परतावा देण्यासाठी केलेली गुंतवणूक या अर्थाने हंगामाची पूर्वतयारी गरजेची असते.

शेतीच्या कुठल्याही हंगामास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या शेतीत काय काय बदल करावेत, कुठल्या गोष्टींचे नियोजन करावे याला महत्त्व आहे. यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचा या लेखात परामर्श घेऊयात.

* माती परीक्षण

हंगाम कोणताही असो, आपल्या शेतातील मातीची तपासणी करून त्याचा अहवाल समजावून घेणे आवश्यक आहे. खर्चातील बचतीच्या दृष्टीने ही बाब म्हणजे पूर्वतयारीची प्रथम पायरी आहे.

* बांध बंदिस्ती

शेतातील पीक कोणतेही असो, योग्य प्रकारे जमिनीची बांध बंदिस्ती करणे आवश्यक असते. पाऊस चालू झाल्यानंतर ही कामे करणे शक्य होत नाही. भात खाचरांमधे पाणी साठून राहण्यासाठीदेखील बांध बंदिस्ती आवश्यक ठरते. शेतातील बांध आटोपशीर आणि योग्य त्या उंचीचे ठेवावेत.

* झाडांची छाटणी

फळझाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ आटोपशीर ठेवून रोगट, वाळलेल्या आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर बोडरे पेस्ट लावावी.

* जमिनीचा उतार

शेतातील पिकाला योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी जमिनीला योग्य प्रकारे आणि एकाच दिशेने उतार असणे आवश्यक असते. त्यासाठी शेतजमिनीवर तयार झालेले खाचखळगे बुजवून जमीन समपातळीत आणावी.

* पूर्वमशागत

जमिनीची उभी आडवी नांगरट करून ढेकळे उन्हात वाळल्यानंतर कुळवाच्या पाळय़ांद्वारे ढेकळे फोडून घ्यावीत. शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीच्या वरच्या थरात चांगले मिसळून द्यावे.

* दर्जेदार बियाणांची उपलब्धता

कोणते पीक आणि त्याच्या कोणत्या वाणाची लागवड करायची हे निश्चित झाल्यावर शक्य तेवढय़ा लवकर बियाणे खरेदी करावे. पाऊस सुरू झाल्यानंतर खरेदीची धांदल करणे चुकीचे ठरते. विक्रेत्याकडून पक्की पावती घेऊन पीक काढणी होईपर्यंत पावती आणि बियाणाच्या बॅगवरील टॅग जपून ठेवावे.

* बियाणांची उगवणक्षमता तपासणी

सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूगसारख्या महागडय़ा बियाणांचे बियाणे जमिनीत पेरण्याआधी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे ही आता गरज बनली आहे. बऱ्याचदा शेतकरी ऐन पेरणीच्या वेळेस बियाणे विकत आणून लगेचच पेरणी करतात. अशा वेळेस आवश्यक त्या प्रमाणात बियाणाची उगवण झाली नाही तर प्रती एकरी रोपांची संख्या मिळत नाही त्यामुळे घरच्या घरी वर्तमानपत्रावर १०० बिया ओळीत मांडून त्यावर दुसरे वर्तमानपत्र अंथरून त्यावर पाणी शिंपडून ओलावा ठेवावा. तीन चार दिवसात १०० पैकी किती बियाणाला मोड आलेत त्यावरून बियाणाची उगवणीची टक्केवारी समजू शकेल आणि त्यानुसार किती बियाणे पेरणीसाठी वाढवावे लागेल याचा अंदाज येईल. कुंडीत बियाणे पेरूनही ही चाचणी घेता येते.

* इतर निविष्ठांची खरेदी

युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही रासायनिक खतांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपात आपण ज्या पिकाची लागवड करणार आहोत त्याला आवश्यक खतांची खरेदी करून हवा, सूर्यप्रकाश आणि पाणी लागणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी साठवून ठेवावे. आवश्यक बियाणे आणि पिकाला गरजेची ठरणारी कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच बिजप्रक्रियेसाठी आवश्यक असणारे जिवाणू कल्चर खरेदी करून थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावे.

* जनावरांचे लसीकरण

बहुतांश जनावरांच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावसाळय़ापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक असते. यात घटसर्प, फऱ्या, बुळकांडय़ा, लिव्हर फ्ल्युक यावरील लसीकरणाचा समावेश होतो.

* जनावरांच्या गोठय़ाची दुरुस्ती

जनावरांच्या गोठय़ात पाणी गळत असेल, कोबा फुटला असेल किंवा फरशा निघाल्या असतील, गटर बुजली असेल तर याच्या दुरुस्त्या करून घ्याव्यात जेणेकरून पावसाळय़ात जनावरांची मानसिकता चांगली राहील. गोठा स्वच्छ करून गोचिडा, पिसवा होऊ नयेत यासाठी कीटकनाशकाची फवारणी घ्यावी आणि सोबतच चुन्याने गोठा आतून रंगवून घ्यावा.

* प्रकाश सापळय़ांद्वारे हुमणीच्या भुंगेऱ्यांचे नियंत्रण करणे

वळवाचा पाऊस पडला की लगेचच हुमणी किडीचा प्रजनन काळ सुरू होतो. या काळात हुमणीचे काळय़ा व करडय़ा रंगाचे (शेण किडे) भुंगेरे प्रजनन करण्यासाठी जमिनीतून बाहेर पडण्यास मोठय़ा प्रमाणात सुरुवात होते. अशा वेळेस शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कडूलिंब, बाभळी, शेवगा अशा हुमणीला प्रजननासाठी आवडत्या असणाऱ्या झाडाखाली अत्यंत अल्प खर्चाचा प्रकाश सापळा तसेच एरंडी आंबवण सापळा (एरंडीच्या बिया भरडून रात्रभर पाण्यात भिजवून एका खोलगट भांडय़ात ठेवावे) प्रकाशाकडे आकर्षित झालेले भुंगेरे या प्रकाश सापळय़ाच्या खाली ठेवलेल्या कीटकनाशकयुक्त पाण्यात पडून मरतात. एरंडीच्या वासाकडे आकर्षित झालेले भुंगेरे खोलगट भांडय़ात पडून अडकतात. हे भुंगेरे एकत्र करून मारून टाकता येतात व परसबागेतील कोंबडय़ांना खायला देता येतात. प्रजननाच्या काळातच बरेचसे नियंत्रण केल्याने पुढे अळी अवस्थेत हुमणीकडून होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी करता येते. गावपातळीवर सामुदायिक पद्धतीने असे नियंत्रण खूप प्रभावी ठरते.

* विद्युत उपकरणांची दुरुस्ती

विहीर, कूपनलिका यावरील मोटर, कडबा कुट्टी मशिन यांसारख्या विद्युत उपकरणांची पाहणी करून गरज असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. विद्युत वाहिन्यांची पाहणी करून गरज पडल्यास संबंधित विभागाकडून त्याची दुरुस्ती करून घेतल्यास विद्युत उपकरणांमधील बिघाडांमुळे पावसाळय़ात होणारे अपघात आपण टाळू शकतो.

* शेतातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती

नेहमीच मोठा पाऊस होऊन गेल्यानंतर आपल्याला शेतातील रस्त्यांची दुरवस्था अनुभवायला मिळते. यामुळे अपघातही घडतात. त्यामुळे वेळीच त्यांच्या दुरुस्तीची कामे लोकसहभागाद्वारे करून घ्यावीत.

* वाहनांची आणि शेती अवजारांची दुरुस्ती

दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचे जीर्ण झालेले टायर्स पावसाळय़ात घसरणे, फुटणे यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळेच पुढील धोका टाळण्यासाठी आता पावसाळय़ापूर्वीच जुने टायर्स बदलणे, वाहनांची ऑईल बदली, काही नादुरुस्त उपकरणे आणि भाग बदलणे ही कामे आताच करून घ्यावीत.

* सेंद्रिय खताचे खड्डे जिणाणूंनी समृद्ध करणे

शेणखताचे किंवा कंपोस्ट खताचे खड्डे उपसून हे खत आपण शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर शेतात मिसळून देतो. पण ही सेंद्रिय खते जिवाणूंनी समृद्ध करण्याची गरज असते. त्यासाठी कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणाहून अ‍ॅझोटोबॅक्टर, अ‍ॅझोस्पिरिलम, रायझोबियम, मेटॅरायझिअम, ट्रायकोडर्मा यांसारखे जिवाणू संवर्धक आणून त्याची पावडर या खतांच्या खड्डय़ात मिसळून टाकून पाण्याचा अधूनमधून शिडकावा करावा. यामुळे या खड्डय़ातील खतात जिवाणूंची चांगली वाढ होऊन मुख्य शेतातील पिकाला नक्कीच फायदा होईल.

* बांधावर फळबाग लागवडीसाठी खड्डे घेणे

शेताच्या बांधावर फळझाडे लागवड करण्यासाठी आताच तीन बाय तीन फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे उन्हात चांगले सुकू द्यावेत. यात तळाला काडीकचरा टाकावा, शेणखत आणि चांगली पोयटायुक्त माती याच्या मिश्रणाने खड्डा पूर्ण भरून घ्यावा. एखाद दुसरा पाऊस झाल्यानंतर मग या खड्डय़ांमधे मधोमध झाडे लावावीत.

* दैनंदिनी

शेतातील आणि दुग्धव्यवसायातील दैनंदिन जमाखर्चाचा हिशोब लिहून ठेवल्याशिवाय खर्चात बचत करणे शक्य होत नाही. त्यासाठी यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीपासूनच नवीन जमाखर्च नोंदवही घालावी.

वरील बाबी सोप्या आहेत. पण त्याच्या अवलंबाद्वारे निश्चित गेल्या वेळेपेक्षा या वेळी हंगाम फायद्याचा ठरू शकतो. यंदा पाऊसमान चांगले होऊन खरीप हंगाम शेतकरी वर्गाला भरघोस उत्पादनाचे, उत्पन्नाचे आणि समृद्धीचे ठरो हीच सदिच्छा.