10 April 2020

News Flash

माध्यमी : आवाज ही पहचान है..

करिअरमध्ये ‘ब्रेक’ न घेता सातत्याने कार्यरत राहण्यासाठी त्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

| February 7, 2020 01:36 am

|| वेदवती चिपळूणकर

तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेलं मनोरंजनाचं अगदी सुरुवातीचं माध्यम म्हणजे रेडिओ. बातम्यांपासून ते गाण्यांपर्यंत सगळ्याच क्षेत्रांना आकाशवाणीने सामावून घेतलं. केवळ श्राव्य अशा या माध्यमात अनेकांनी फक्त आवाजावरून आपली ओळख निर्माण केली. आपल्या आवाजाची ओळख सांभाळण्यासाठी वर्षांनुर्वष मेहनत घेणारे रेडिओ जॉकी हेसुद्धा कलाकारच! सातत्याने वीस र्वष आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या कानात आणि मनात घर करणारं एक मराठी नाव म्हणजे रश्मी वारंग.

रेडिओ किंवा आकाशवाणीमध्ये करिअर करायचं असं काहीही न ठरवता सहज म्हणून या क्षेत्रात आलेल्या रश्मी यांनी सुरुवातीला केवळ हंगामी उद्घोषक म्हणून काम सुरू के लं. आकाशवाणीचं रूप बदलत असतानाचा हा प्रवास रश्मी यांच्यासाठी खूप मनोरंजक आणि तितकाच आव्हानात्मकही होता. ‘मी इथे सुरुवात केली तेव्हा असलेली आकाशवाणी आणि वीस वर्षांनंतर आता असलेली आकाशवाणी यात खूप फरक आहे. मी सुरुवात केल्यानंतर तीन ते चार वर्षांनी प्रसारभारतीकडून आम्हाला हे सांगण्यात आलं, की आतापासून आम्हाला आरजे म्हटलं जाईल. केवळ उद्घोषणा नसून आता संवादाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत आरजे ही संकल्पना लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. विद्या बालनची मुन्नाभाईमधली भूमिका किंवा मलिष्काची वाढती लोकप्रियता अशा काही गोष्टींनी आरजे यांच्या अस्तित्वाची वेगळी जाणीव लोकांना व्हायला लागली,’ हे सांगत असतानाच रश्मी यांनी त्यांचा प्रवासही उलगडला. माध्यमात काही बदल होत असले तरीही केंद्रस्थानी आवाजच कायम होता. त्यामुळे स्वत:च्या आवाजावर जाणीवपूर्वक मेहनत घेणं हा रश्मी यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच जणू अविभाज्य भाग आहे.

आवाजासाठी म्हणून आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्स या दोन गोष्टींवर रश्मी यांनी वीस वर्षे जवळजवळ पाणीच सोडलं आहे. करिअरमध्ये ‘ब्रेक’ न घेता सातत्याने कार्यरत राहण्यासाठी त्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यांचा आवाज ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. त्यामुळे त्यात सातत्य राखणं त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. ‘रेडिओ या माध्यमात केवळ आवाज या एकाच गोष्टीला महत्त्व असतं. श्रोत्यांना चेहरा, देहबोली, कपडे, मेकअप अशा कोणत्याच गोष्टी कधीच दिसणार नसतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रत्येक गोष्ट, मग ती कोणती माहिती असो किंवा एखादी भावना, सर्वकाही केवळ आवाजातून व्यक्त करायचं असतं. सुरुवातीला आपला आवाज जसा होता, जो श्रोत्यांना आवडलेला होता, तो कायमस्वरूपी तसाच ठेवणं हे मोठं आव्हान असतं. मी वीस वर्षांची असताना माझा आवाज साहजिकच तरुण होता. मात्र तोच आवाज माझ्या वयाच्या चाळिसाव्या वर्षीही मेंटेन करणं हे अवघड काम असतं,’ असं रश्मी सांगतात. त्यांच्या मते आवाजात प्रसन्नता तेव्हाच येते जेव्हा मनही प्रसन्न असतं. सदासर्वकाळ मन प्रसन्न ठेवणं जरी शक्य नसलं तरी प्रत्यक्ष शोच्या वेळी मात्र कोणत्या ना कोणत्या उपायांनी स्वत:चा मूड उत्साही करणं गरजेचं असतं, असं रश्मी सांगतात. ‘माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी असूनही पुढचे जवळजवळ तीन तास मला कार्यक्रम करावा लागला. कितीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तरीही लाईव्ह शो सोडून तुम्हाला जाता येत नाही आणि तुमची मन:स्थिती ठीक नाही म्हणून कार्यक्रमावर परिणामही होऊन चालत नाही,’ असं रश्मी स्वत:च्या वैयक्तिक अनुभवावरून संगत होत्या.

एका मैत्रिणीच्या अरंगेत्रमसाठी रश्मी करत असलेलं मराठी निवेदन ऐकून मध्यंतरात सुकन्या कुलकर्णी यांनी सहज त्यांना आकाशवाणीची ऑडिशन देण्याबद्दल सुचवलं आणि रश्मी यांना करिअरची वाट सापडली. एकदा त्यात उतरल्यावर मात्र मनापासून स्वत:चे अगदी दोनशे टक्के एफर्ट्स देऊन त्यांनी काम करायला सुरुवात केली. सातत्याने वीस र्वष आपली शैली जपत, तरीही तोचतोचपणा येऊ  न देता वेगवेगळ्या विषयांवर खुमासदार भाष्य करताना रश्मी यांनी काही बाबींचं अगदी काटेकोरपणे पालन केलं आहे. त्या म्हणतात, ‘आजपर्यंत कधीही मी स्क्रिप्टशिवाय कार्यक्रम केला नाही. हलकाफुलका विषय असला तरीही आपल्याला काय बोलायचं आहे हे न ठरवता माइकसमोर जाऊन बसायचं आणि वेळ मारून न्यायची हे मला आवडत नाही, जमत नाही. एकदा मी मला स्वत:ला आणि माझ्या श्रोत्यांना चांगल्या कंटेंटची सवय लावली, की मग एखाद दिवससुद्धा मला त्यात कामचलाऊपणा चालत नाही’, असं त्या ठामपणाने सांगतात. त्यांच्या मते, आपल्याला काय बोलायचं आहे हे ठरवलेलं नसलं, की मग विषय भरकटतो, जास्त गाणीच ऐकवली जातात, आपल्या बोलण्याला काही दर्जा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तयारी न करता मी कार्यक्रम करतच नाही. त्यासाठी वाचन करणं, बातम्यांबद्दल अप-टू-डेट राहणं, हात लिहिता राहणं अशा सगळ्या गोष्टी मी करते. आकाशवाणीच्या पलीकडे मी ज्या इतर गोष्टींमध्ये सहभागी असते किंवा ज्या इतर अ‍ॅक्टिव्हिटीज करते त्या सगळ्या माझ्या कामाला पूरकच असतात. मी आवाजाची कार्यशाळा घेते, कॉलेजमध्ये मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना शिकवते, लेखन करते. या सगळ्या गोष्टींनी मला माझ्या रोजच्या कामातही फायदाच होत असतो’, असं रश्मी सांगतात.

रोज सलग पाच – पाच तास लाईव्ह कार्यक्रम करणं वाटतं तितकं सोपं नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतरांच्या मनात तयार होणारी इमेज ही केवळ आवाजाच्या आधारावर असणार आहे याची जाणीव ठेवून आपल्या आवाजाला वीस र्वष जसंच्या तसं सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. कितीही अवघड आणि धीरगंभीर विषय असला तरीही श्रोत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी त्याला थोडं हलकंफुलकं आणि रंजक करावंच लागतं. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी साधून प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दरम्यान पूर्ण लक्ष केवळ तिथेच केंद्रित करणं, आयत्यावेळी काही अडचणी आल्या तर त्या निवारणं आणि या सगळ्यात श्रोते थेट ऐकत असल्याचं भान सुटू न देणं ही तारेवरची कसरत रश्मी वारंग गेली वीस र्वष करत आहेत.

‘नव्याने आरजेइंगकडे वळणाऱ्या सगळ्यांना माझा एकच सल्ला आहे. इथे तुमचं वैयक्तिक आयुष्य, इच्छा, मन:स्थिती, परिस्थिती, अडचणी सगळं बाजूला ठेवून के वळ श्रोत्यांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांचा विचार करून काम करायची तयारी ठेवावी लागते. तुमच्या आवाजातला अगदी सूक्ष्म बदलही संपूर्ण कार्यक्रमाचा नूर बदलून टाकू शकतो. त्यामुळे आपण श्रोत्यांसाठी काम करतोय याचं भान सुटता कामा नये’.

– रश्मी वारंग

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 1:36 am

Web Title: article on radio jockey rashmi warang abn 97
Next Stories
1 बुकटेल : एका मुराकामीची गोष्ट
2 ‘मी’लेनिअल उवाच : आमदनी अट्ठण्णी खर्चा रुपय्या
3 डाएट डायरी : हेल्दी राहण्याचा कानमंत्र
Just Now!
X