अभिनयाचे धडे गिरवले तरी चित्रपट किं वा मालिका इंडस्ट्रीत येण्यासाठी कोणीतरी गॉडफादरहवाच, ही पक्की समजूत मनाशी बाळगून आपली वाटचाल करणाऱ्या तरुणाईसाठी तुम्हीच तुमचं आयुष्य घडवायला हवं, असा खमका गुरूमंत्र राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिने दिला आहे. सध्या कुठल्याही क्षेत्रात शिरलात तरी तरुण पिढीपुढे आव्हानं जास्त आहेत असं मानणाऱ्या अनिताने स्वानुभवातून तिने अभिनेत्री म्हणून केलेली वाटचाल ते राधिकाम्हणून आज लोकांचे मिळत असलेले प्रेम, ओळख आदी विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. लोकसत्ताआयोजित, ‘केसरीप्रस्तुत व्हिवा लाउंजकार्यक्रमात लोकसत्ताचे प्रतिनिधी किन्नरी जाधव आणि रेश्मा राईकवार यांनी अनिताशी संवाद साधला..

अनिताची राधिकाकशी झाली?

अभिनेत्री म्हणून मी गेली दहा-बारा र्वष काम करते आहे, पण ‘राधिका’मुळे मला खरी ओळख मिळाली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर ‘झी मराठी’ जिथे जिथे बघितलं जातं तिथे तिथे आज मी राधिकामुळे पोहोचले आहे. राधिका माझ्याकडे कशी आली हे सांगायचं तर दोन वर्षांपूर्वी मला ‘झी मराठी’चे नीलेश मयेकर यांनी  भेटायला बोलावलं. मला सुरुवातीला फक्त आपण एक प्रोजेक्ट करतो आहोत एवढं सांगत त्याची कथा काय आहे हे थोडक्यात सांगितलं होतं. पण आपल्यासोबत कोण काम करणार आहे, माझं पात्र कोणतं असणार आहे, मी राधिका असणार आहे की शनाया असणार आहे हेसुद्धा मला माहीत नव्हतं. जेव्हा दीड वर्षांपूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सुरू झाली अगदी त्या वेळी मला सागितलं की, अमुक अमुक एक बाई आहे आणि तिचं नाव आहे राधिका सुभेदार. तिची पाश्र्वभूमी नागपूरची आहे. ती नागपूरहून मुंबईत राहायला आली आहे. तिला एक नवरा आहे जो शनाया नावाच्या मुलीच्या प्रेमात आहे. आणि आता तू तुझं काम या दिशेने सुरू कर.. एवढंच सांगितलं आणि इथूनच राधिकाची सुरुवात झाली. खरंतर, मला त्या वेळी शनाया कोण आहे हेही माहीत नव्हतं.

इंडस्ट्रीत यायचं तर प्रशिक्षण हवंच!

इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर नवीन मुलांनी रीतसर प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे अनेक गोष्टी आपल्या आपल्यालाच कळतात. म्हणूनच आपण शालेय शिक्षणही घेत असतो. तसंच आहे नाटकाचं. मी एका लहान शहरातून आलेली मुलगी आहे. पुण्या-मुंबईच्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा करायला मिळतात. तसं नाशिकमध्ये एवढय़ा नाटकांची स्पर्धा वगैरे होत नाहीत. जास्त वाव मिळत नाही. एकच नाटक मग तेच राज्य नाटय़ स्पर्धेलाही करतो, कामगार नाटय़ स्पर्धेलाही करतो. म्हणजे वर्षांतून आम्ही एकच नाटक करतो. अशा वेळी त्यातून काय शिकायला मिळणार? अभिनय ही अशी स्पर्धा आहे किंवा क्षेत्र आहे जिथे करून करून आपण प्रगल्भ होत जातो. यासाठी तुम्हाला योग्य गुरूही लागतो आणि अभिनयाचंही रीतसर शिक्षण घ्यावंच लागतं. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. सगळ्या गोष्टींकडे कसं पाहायचं, त्या कशा हाताळायच्या हे समजतं. आपण भरकटत जात नाही. कसं आहे.. शेवटी या सगळ्या गोष्टींमागे खूप पैसा लागलेला असतो. त्यामुळे तुम्हाला कोणी इथे शिकवत बसत नाही. तेवढा वेळ त्यांच्याजवळ नसतो. तुम्हाला जे येतंय ते करा नाही तर बाजूला व्हा, अशी ही इंडस्ट्री आहे. तुम्ही जर शिक्षण घेऊन आलात तर तुम्ही कोणावर अवलंबून राहात नाही, तुम्हाला जे येतं ते डिलिव्हर करणं एवढंच तुमचं काम असतं.

मी कधीच नियोजन करत नाही

मी लहानपणापासून कोणतीही गोष्ट नियोजन करून केलेली नाही. मी आता अभिनय करतेय, राधिका सुभेदार हे पात्र करतेय एवढंच माझ्यासाठी वास्तव आहे. यापुढे मी काय करणार आहे हे मला माहिती नाही. यापूर्वीही मी जे केलं त्यात कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग नव्हतं. मी लहानपणी कधी अभिनेत्री व्हायचं असं ठरवलं नव्हतं. अनेक गोष्टी माझ्याबाबतीत घडत गेल्या. मी काम करत गेले. मी आधी डान्स शिकत होते आणि त्यातूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनयाची आवड तर आहे पण तो आपल्याला पुरेसा येत नाही म्हणून त्याचं नीट शिक्षण घ्यायचं ठरवलं. मग मी ललित कला केंद्रातून नाटकाचं रीतसर शिक्षण घेतलं. आणि करिअर करण्यासाठी नाशिकहून मुंबईला आले. या कुठल्याच गोष्टी प्लॅन केलेल्या नव्हत्या.

ग्लॅमरचा विचार कधीच नव्हता!

या क्षेत्रात काम करावं हे मनात होतं, पण मी ग्लॅमरचा आधीपासूनच विचार केला नव्हता. मला या क्षेत्रात काम करायला मिळेल का? चांगली कामं मिळतील का? असा साधाच विचार सुरुवातीला डोक्यात होता. आपण कोणत्या तरी चित्रपटाची अभिनेत्री आहोत, अशी कोणतीही स्वप्नं मी बघितली नव्हती. त्यामुळे आता अभिनेत्री म्हणून काम करत असताना अनेक फिल्मी सीन करावे लागतात, तेव्हा मला खूप हसू येतं. आपण कधीतरी तेव्हा या गोष्टींचा विचार केला होता का? नाही.. पण, अशा पद्धतीचं काम मी करतेय. माझ्याकडे तेव्हा पर्याय निवडीचं स्वातंत्र्यही नव्हतं. मला काम करणं गरजेचं होतं. येईल ते काम स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता, पण कामातून काम मिळतं, लोकांची पसंती मिळते हेच मला माहीत होतं. मला कोणत्याही गोष्टीचा हव्यास नव्हता. त्यामुळेच मी खरं तर प्रामाणिकपणे काम करत गेले आणि मला हवी ती दाद प्रेक्षकांकडून मिळत गेली.

नाटकाशी जिव्हाळ्याचं नातं

मी मुंबईला आल्यापासून गेली १२ र्वष सातत्याने नाटक करत होते. अधूनमधून मालिका-चित्रपट करत होते, पण त्या जोडीला माझं कोणतं ना कोणतं नाटक सुरूच असायचं. त्यामुळे माझं नाटकाशी जास्त नातं आहे. नाटक करता करता मालिका मिळाली. तेव्हापासून मी नाटक करत नाहीये, पण नाटक हाच बेस आहे माझा. नाटकच माझं पहिलं प्रेम आहे. नाटक करता करताच मी अनेक गोष्टी करत गेले, शिकत गेले. हाच माझा नाटकाचा प्रवास आहे. मी प्रायोगिक आणि व्यावसायिक अशी दोन्ही पद्धतीची नाटकं केली आहेत.

भूमिकेमागचा विचार

मुळातच मला जास्त काम मिळत नव्हतं त्यामुळे जे काम येतंय, ते घ्यावं आणि करावं अशीच परिस्थिती होती, पण मला जी व्यक्तिरेखा करायची संधी मिळेल ती समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न मी करते. माझी व्यक्तिरेखा अधिक टोकदार व्हावी यासाठीचा विचार जास्त करते. लेखकाने लिहिलेली व्यक्तिरेखा नेमकी काय आहे, त्याला त्यातून काय अपेक्षित आहे त्यानुसार मग मी त्या व्यक्तिरेखेला कसा न्याय देईन याचा विचार करून मी ती भूमिका निवडते, करते. मात्र भूमिकांच्या बाबतीत मी अजिबातच आग्रही मुलगी नाही.

माझे गुरू..

मी ललित कला केंद्रामध्ये शिकले आहे. नाटककार सतीश आळेकर हे माझे गुरू आहेत. राजीव नाईक हेसुद्धा माझे गुरू आहेत. तसंच मुंबईत आल्यानंतर मी चेतन दातार आणि सत्यजीत दुबे यांच्या नाटकांतून कामं केली. या दोघांनीही मला मार्गदर्शन केलं. त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मला यापुढेही काम करताना उपयोगी पडत आहेत आणि पडतीलच. इथे कधीही एकच एक गुरू नसतो. सातत्याने नवीन माणसं भेटतात आणि त्यांच्याकडून शिकायला मिळतं. खूप चांगली, हुशार माणसं आहेत या क्षेत्रात. त्यांचा उपयोग आपल्याला होतो. त्यामुळे या क्षेत्रात पदोपदी आपल्याला गुरू भेटत असतो.

राधिका आवडते की शनाया?

शनायाचं पात्र फारच इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही अभिनेत्रीला असं वाटतं की एखादी आव्हानात्मक भूमिका करावी. राधिका सुभेदार हे पात्र लेखकाने ताकदीने उभं केलेलं पात्र आहे. आणि हे असं पात्र करायला मिळणं ही मोठी गोष्ट आहे. ही भूमिका कोणी तरी मला देऊ  करतंय हीच माझी यासाठीची इतक्या वर्षांची मेहनत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राधिका ही एक गृहिणी आहे, त्यामुळे माझा चेहरा, माझं वागणं, माझ्याविषयीची लोकांची पसंती ही अशाच प्रकारच्या पात्रांसाठी जास्त  आहे. त्यामुळे मला शनायापेक्षाही राधिकाचंच पात्र आवडतं. मला शनायाचं पात्रही आवडतं. कधी कधी मला असं वाटतं की, ती करतेय असं छान काम आपल्यालाही करायला मिळावं. आणि मला हेही माहितेय की जितकं प्रेम लोक राधिकावर करतात तेवढंच प्रेम ते शनायावरही करतात.

राधिकेचा वऱ्हाडी ठसका

मी नाशिकची आहे, पण लोक मला पुणेकर समजतात कारण मी फार कमी हसते. चेहऱ्यावरून उद्धट वाटते. आमची नाशिकची भाषा जरा रावडी आहे. त्यामुळे लोकांना वाटायचं की ही अशी उद्धट का बोलतेय? असं का आहे तिचं बोलणं? तर कधी कधी लोकांना आवडायचंसुद्धा. सुरुवातीला मालिकेचा ट्रेलर आला तेव्हा माझ्यावर, माझ्या भाषेवर खूप टीका झाली. मी जी भाषा बोलतेय ती मुळात नागपुरी नाही असंच अनेक प्रेक्षकांचं म्हणणं होतं. पण आमच्या संपूर्ण टीमने, आमच्या लेखकाने आपण कुठेही चुकत नाही आहोत हे समजावलं. हळूहळू मलाही ती भाषा समजू लागली आणि मग ते लोकांच्या पसंतीस उतरलं. मी वऱ्हाडी भाषेसाठी अनेक पुस्तकं वाचली. यासाठी अभिजित गुरु यांनी मला खूप मदत केली. ते नेहमी मला डायलॉग कसे बोलायचे? किंवा काही उच्चार रेकॉर्ड करून पाठवायचे. ही मालिका मिळण्याआधी मी ‘हलकं फुलकं’ नावाचं नाटक केलं होतं ज्यात माझ्याबरोबर भारत गणेशपुरेही होते. आता भारत गणेशपुरे पूर्ण वेळ वैदर्भीय भाषा बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहून राहून, सतत ते कानावर पडत होतं. त्यांच्याकडूनही ही भाषा शिकायला मिळाली आणि त्याचा उपयोग राधिकेच्या वऱ्हाडी ठसक्यासाठी झाला. आता मला नागपूरची लेक म्हणून प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा वर्षांव करतात.

माझी इंडस्ट्री फक्त कास्टिंग काऊचपुरती मर्यादित नाही

‘कास्टिंग काऊच’बद्दल सारखंच बोललं जातं. आमच्या इंडस्ट्रीत सगळे वाईटच प्रकार घडतात, तिथे मुली अजिबात सुरक्षित नाहीत, असे सगळे समज या इंडस्ट्रीबद्दल प्रचलित आहेत. लैंगिक छळवणूक ही कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते, होते. पण म्हणून ही इंडस्ट्री फक्त ‘कास्टिंग काऊच’पुरती मर्यादित नाही. इथे खूप हुशार माणसे काम करतायेत. आपापल्या कलागुणांवर मेहनतीने पुढे येतात. त्यामुळे या क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हेच सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

फक्त चेहराच महत्त्वाचा नसतो

अनेकदा आपल्याला वाटतं की चेहरा फार महत्त्वाचा आहे, पण चेहऱ्याबरोबर तुमचं टॅलेंटही महत्त्वाचं आहे. तुमच्या कामासाठीची तुम्ही जी मेहनत घेता ती महत्त्वाची आहे. मी व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही गोष्टी निश्चितपणे करते. मी कलाकार आहे त्यामुळे माझ्या प्रकृतीची काळजी मी घेतलीच पाहिजे. मला जिम करायला जमत नाही, पण आहारात मी आवर्जून भाकरी भाजी खाते, नियमित व्यायाम करते. मी गेली अनेक र्वष चॉकलेट, आईस्क्रीम खाल्लेलं नाही. कोणी विचारलं प्रेमाने तरी त्यांना मी नम्रपणे नकार देते. मला या गोष्टी खाव्याशा वाटत नाहीत असं नाही, पण स्वत:वर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे या मताची मी आहे.

नो ड्रीम रोल

जसं मी आधीच सांगितलं की मी कधीही प्लॅनिंग करत नाही. त्यामुळे माझा ड्रीम रोल वगैरे असं काहीही नाही. जे येईल ते करत राहायचं. फक्त जे काम करतोय ते उत्तम करायचं हेच माझं ध्येय असतं. आपल्याला न पटणारी गोष्ट, पात्र असेल तर अजूनच मजा येते. ते पात्र आव्हान म्हणून स्वीकारायचं असतं आणि करून दाखवायचं हा माझा फंडा आहे. अनेकदा एखाद्या दृश्यात काही बदल सुचवावेसे वाटतात मात्र चॅनेलच्या म्हणण्यानुसार ते दृश्य करण्याबाबतचे नियम-चौकटी काटेकोर असल्याने दिग्दर्शक मला जे दिलं आहे तेच कर असं बजावून सांगतात. मग ठीक आहे, तुम्हाला ते हवंय ना.. दाखवते मी करून असं म्हणून मी ते दृश्य त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने पूर्ण करते. कधी कधी त्यांनी जे सांगितलं तेच योग्य होतं, याची अनुभूती मिळते. तर कधी कधी माझं बरोबर होतं हे त्यांना जाणवतं. मग अशा वेळी त्यांची गंमत पाहायला मला खूप मजा येते. मला मराठी अभिनेत्रींमध्ये मुक्ता बर्वे फार आवडते. तिच्यासारखं काम करावंसं वाटतं.

कामाकडेच पूर्ण लक्ष

सुरुवातीला मी भाषेवर खूप फोकस केला होता. जशी मालिकेला सुरुवात झाली तशा खूप प्रतिकिया आल्या. नागपुरी बायका खूप स्ट्राँग असतात, ही नागपुरी भाषाच नाहीच अशा सगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. पण तेव्हा माझ्या टीममुळे मी सोशल मीडिया किंवा मला येणारी पत्र याकडे अजिबात लक्ष न देता कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. गेल्या दीड वर्षांपासून मी कोणत्याही सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचत नाही. जो काही तुमचा फीडबॅक आहे तो मला आमच्या टीमकडून चॅनेलकडून मिळतो. लोकांना अनेकदा अनेक गोष्टी आवडत नाहीत. कोणी सांगतं हा लूक छान नाही, तर कोणी सांगतं इंदूरी साडी राधिकाला छान दिसेल. आत्ताची साडी बरी आहे.. या सगळ्याचा अर्थ मी एवढाच घेते की मी छान काम करतेय आणि तुम्ही ते बघताय. वाईट आणि चांगल्या अशा दोन्ही प्रतिक्रिया आधीही येत होत्या आणि आताही येतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघताना त्यातील सकारात्मकता घेऊनच पुढे जाण्यावर माझा भर आहे.

माझी सामाजिक बांधिलकी

‘पाणी फाऊंडेशन’ म्हणजे एक उत्तम चळवळ आहे. मी मागच्या वर्षी नाशिकची असूनही या फाऊंडेशनसाठी विदर्भाचं नेतृत्व केलं होतं. लोकांच्या कष्टातूनच हे काम होत आहे. मागच्या वर्षीही मी श्रमदान केलं होतं. या वर्षी कामामुळे जाता आलं नाही. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी श्रमदान करायला जाणार आहे. तुम्हीही जिथे जमेल जसं जमेल तसं जाऊन नक्की श्रमदान करा.

तरुण पिढीने बदलायला हवं!

आजच्या तरुण पिढीसमोर मग ती कुठल्याही क्षेत्रात असली तरी त्यांच्यासमोरची आव्हानं खूप मोठी आणि जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी सतत नवनवीन शिकत, स्वत:त बदल करत राहायला हवं. आपण जर आपल्याला अपडेट ठेवलं, नव्या बदलांशी जुळवून घेत स्वत:ला पुढे ठेवलं तर नैराश्यच येणार नाही.

वास्तवातली अनिता कशी?

मी अजिबातच राधिकासारखी नाही. ती सकाळपासून कामाचा उरक पाडते. ते मी करू शकत नाही. या मालिकेत मी सुरुवातीला नवऱ्याचे पाय चेपून देताना दाखवले होते. त्या वेळी अनेक मैत्रिणींनी मला विचारलं, काय चाललंय तुझं? चिन्मयचे तरी कधी पाय चेपलेस का? कारण मी खरंच तशी नाही.  मला राधिका खूप स्ट्राँग वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यासारखं बनणं फारच अवघड आहे. मला नवऱ्याचा खूप पाठिंबा आहे. तो  अनेक गोष्टींमध्ये मला मदत करतो.

मी अभिनेत्री नसते तर कोण असते, असा प्रश्न आला तर मी एक बिझनेस वुमन असते हेच माझं उत्तर आहे. मला व्यवसायाचे धडे लहानपणापासूनच मिळालेले आहेत. त्यामुळे मी कुठला ना कुठला व्यवसायच केला असता आणि एका अर्थी आताही मी अभिनयाच्या व्यवसायातच आहे.

स्वत:ला ओळखायला हवं

या क्षेत्रात रोजच नवी आव्हानं असतात.काम नसताना लोक अनेकदा विचारतात की तू सध्या काय करतेस? तेव्हा आपण निराश व्हायचं नसतं. स्वत:ला ओळखून आपण काम करायचं असतं. आपण काय प्रत्येक पात्रामध्ये फिट बसू शकत नाही. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. जी कामं मिळत आहेत ती करायची. सहज मिळालेली कामं करायची. इथे प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत असतो. त्यामुळे आपण काय क रू शकतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे.

टेलिव्हिजनची आव्हाने समजली

टेलिव्हिजन क्षेत्रातली आव्हाने आणि संधी दोन्ही गोष्टी या कार्यक्रमातून उत्तमरीत्या समजल्या. खूप छान प्रश्न विचारले गेले आणि आमच्या मनातील सर्व उत्तरे मिळाली. त्यामुळे समाधानही वाटले. या कार्यक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. कलाकारांच्या प्रसिद्धीमागचे कष्ट कळले .

राज मेठी

सुपर वुमन सिंड्रोमबद्दल ठाम मत मांडले

आजच्या कार्यक्रमात स्त्रियांच्या वेगळ्या बाजूही अनिता दाते यांनी मांडल्या. त्यामुळे दृष्टिकोन बदलला. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लोकप्रिय आहे मात्र मालिकेतली व्यक्तिरेखा कशी आहे आणि प्रत्यक्षात तशा पद्धतीने सुपर वुमन सिंड्रोमची कल्पना किती चुकीची आहे हे स्पष्ट झाले.

सुहास कुलकर्णी

प्रामाणिकपणा आवडला

‘राधिका’ याच नावाने आम्ही त्यांना ओळखतो. त्यांनी जसे सांगितले की कोणतीच गोष्ट त्या प्लॅन करत नाहीत. पण प्रामाणिकपणे काम करत पुढे जातात, त्याचा रिझल्टही छान मिळतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातील अशा छोटय़ा गोष्टीही आवडल्या.

निखिला जाधव

या इंडस्ट्रीबद्दल मार्गदर्शन खूप कमी मिळते

आजचा कार्यक्रम खूप मार्गदर्शक होता. टेलिव्हिजन आणि चित्रपट इंडस्ट्रीत काय असते? कशा प्रकारे त्यांचे काम चालते, याबाबतचे मार्गदर्शन फार कमी मिळते. आमच्या पिढीला अशाच कार्यक्रमातून माहिती मिळते. आज ती माहिती मिळाल्यानेच ‘व्हिवा लाऊंज’चा हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला.

पूर्वा जाधव

अनिता प्रत्यक्षात धाडसी

अनिता दाते या जरी मालिकेतून एक ठरावीक प्रकारची व्यक्तिरेखा साकारत असल्या तरी प्रत्यक्षात त्या किती सुंदर आणि धाडसी आहेत हे आजच्या कार्यक्रमातून समजले. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक धन्यवाद.

रश्मी नारखेडे