नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

घरगुती गोष्टीच्या वापराची सवय असणाऱ्या लोकांमधला ग्राहक शोधून त्याला त्या वस्तूच्या विक्रीसाठी वळवणं ही कला असते. काही विक्रेते अतिशय चाणाक्षपणे हा व्यवहार करतात तर काहींकडून ते अगदी सहजपणे होते. घरच्याघरी दंतमंजन करणाऱ्या मोठय़ा वर्गाला टूथपेस्टकडे वळवणे, ती विकत घ्यायला लावणे ही शतकभरापूर्वीची घटना. पण ती खूप सहजपणे घडली. क्रांतीबिंतीचा आव न आणता घडली.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

बाप्टीस्ट विल्यम कोलगेटने १८०६ मध्ये साबण आणि मेणबत्त्या बनवणारी एक छोटीशी फॅक्टरी न्यूयॉर्कमध्ये सुरू केली. १८३५च्या दरम्यान विल्यमला हृदयविकाराचा धक्का बसल्यावर वास्तविक पुन्हा हा उद्योग सुरू राहणे कठीण होते, पण त्याला बरे वाटल्यावर त्याने फॅक्टरी चालू ठेवली. १८५७ मध्ये विल्यम जग सोडून गेला. त्याचा मुलगा सॅम्युअल कोलगेट याला वास्तविक त्या व्यवसायात काडीचा रस नव्हता. पण अन्य काही करण्यापेक्षा आहे ते बरे आहे या हेतूने त्याने कोलगेट आणि कंपनी चालू ठेवली. साबण आणि मेणबत्त्या विकता विकता फॅक्टरीने १८७३ मध्ये टुथपेस्ट बनवायला सुरुवात केली. काचेच्या बरण्यांतून ही टुथपेस्ट विकली जात असे. वॉशिंग्टन शेफील्ड या डेंटिस्टचा या टुथपेस्टच्या निर्मितीत मोठा वाटा होता. कोलगेट रिबन डेंटल क्रीम या नावाने ही टुथपेस्ट विकली जात असे. १८९६ मध्ये पहिल्यांदा कोलगेट आणि कंपनीने जगातील टय़ूब रूपातील टुथपेस्ट आणली. १९०८ पासून खूप मोठय़ा प्रमाणावर या टय़ूबरूपातील टुथपेस्टची विक्री सुरू झाली आणि कोलगेट टुथपेस्टने जगभरात आपली पावलं पसरली. फ्लोराईडयुक्त नवी टुथपेस्ट बाजारात येईपर्यंत कोलगेटला बाजारात कुणीच प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळे आपला व्यवसाय वाढवणे कोलगेटला फारसे कठीण गेले नाही. यादरम्यान कोलगेट कंपनीने पामोलिव्ह कंपनीशी केलेली हातमिळवणी खूप मोलाची होती. पाम आणि ऑलिव्ह या दोन तेलांपासून बनवलेली उत्पादने विकणारी पामोलिव्ह कंपनी आणि कोलगेट यांचे एकत्रित कोलगेट पामोलिव्ह नाव हे ब्रँडविश्वात खूपच वरचे आहे.

आज कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडून मौखिक काळजीसाठी टुथपेस्ट, टूथब्रश, माऊथवॉश यांचे उत्पादन होते. १९२० पासून सिंगापूर आणि त्यानंतर भारत व नेपाळ अशा मार्गाने भारतात आलेली कोलगेट हा खूप जुना ब्रँड आहे. भारतात टुथपेस्टचा विचार करता ५५% वाटा एकटय़ा कोलगेटचा आहे. १९९९ पासून कोलगेटने भारतात उत्पादन करणारा विभाग सुरू केल्यावर हे उत्पादन वाढतच राहिले आहे. जगाचा विचार करता जगभरातील टुथपेस्टमार्केटमध्ये कोलगेटचा ४५% वाटा आहे. म्हणजे जगभरातील जवळपास अर्धे ग्राहक कोलगेट खरेदी करतात. भारतात गेल्या काही वर्षांत कोलगेटला पतंजलीच्या उत्पादनांनी मोठी स्पर्धा निर्माण केली. कोलगेटला आयुर्वेदिक टुथपेस्टची निर्मिती करावी लागण्याइतकं हे आव्हान मोठं होतं.

लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं. इतर उत्पादनं आल्यावरही कोलगेटने आपली मक्तेदारी नेहमीच कायम ठेवली आणि काळाप्रमाणे सतत नवनव्या टॅगलाइन्स, स्लोगन यातून लोकांशी संपर्क साधला. १९४० मध्ये कोलगेटचे ब्रीदवाक्य होते It cleans your breath while it cleans your teeth. तर १९६० मध्ये Colgate…ring of confidence हे ब्रीदवाक्य कोलगेटने वापरलं.

आज कोलगेटचे असंख्य प्रकार आपण बाजारात पाहतो. विविध उत्पादनांची स्लोगन्स त्याच्या विविध उपयोगांनुसार वेगवेगळी आहेत. ‘क्या आपके टुथपेस्ट में नमक हैं?’ हा प्रश्न आणि ‘डेंटिस्टनी रेकमंड केलेला नंबर वन ब्रँड’ या दोन टॅगलाइन्स सध्या आपल्या मुखी आहेत. त्यांचाही कोलगेटच्या यशात मोठा वाटा आहे.

बाप्टीस्ट विल्यम कोलगेट किंवा त्यांचा मुलगा सॅम्युअल यांनी अगदी सहज हा व्यवसाय चालू ठेवला होता. तेव्हा यातून एवढय़ा मोठय़ा साम्राज्याची निर्मिती त्यातून होईल असा विचार केला असेल का? हा प्रश्न पडतो. पण काही उत्पादनं ही नकळत एखाद्या व्यवसायाला जन्म देतात. घरच्याघरी दंतमंजन तयार करणाऱ्या समाजाला रेडिमेड टुथपेस्ट देताना एका मोठय़ा व्यवसायाचीच बीजं रोवली गेली.

आपल्या मागच्या ते अगदी आताच्या पिढय़ांच्या दातांचं सफेद सौंदर्य दोन्ही कायम ठेवण्याचं काम कोलगेटने चोख केलं आहे. म्हणूनच डेंटिस्टच्या शिफारसीपेक्षा मागच्या पिढय़ांनी कोलगेटला घराघरांत दिलेलं स्थान, त्यामागचा विश्वास जास्त महत्त्वाचा आणि सहज आहे. कोलगेटच्या टय़ूबमधून बाहेर येणाऱ्या त्या शुभ्रधवल पेस्ट इतका सहज!

viva@expressindia.com