कॉलेज फेस्टिवल म्हटलं की इतर अभ्यासक्रमांच्या पदवी कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स आवर्जून नावाजले जातात मात्र अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अजब वेळापत्रकामुळे दुर्लक्षित होताना दिसतात. साधारण मार्च-एप्रिलच्या दरम्यान होणाऱ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या फेस्टिव्हल्सवर टाकलेला दृष्टिक्षेप..

शाळा-कॉलेज म्हणजे आयुष्यातले सोनेरी दिवस. आणि शाळा कॉलेजमधले सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे उन्हात पाऊ स पडावा इतकं सुखद वाटणारं प्रकरण. कॉलेजमधले फेस्टिव्हल्स म्हटलं की नाटक, कविसंमेलन, डान्स वगैरे डोळ्यासमोर येतं पण हे चित्र साधारण तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या कॉलेजमध्ये दिसून येतं. पण मग चार वर्ष ‘तांत्रिक’ अभ्यास करणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणारे फेस्टिव्हल्स ‘तंत्रज्ञान’ सोडून काय वेगळे असणार?, असं बऱ्याच जणांना वाटत असतं, मात्र तसं नाहीये कारण अभ्यासक्रम जरी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचे असले तरी हे फेस्टिव्हल्स खूप वेगळे असतात.

साधारणपणे सगळ्याच विशेषत: मुंबईतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विषम अंकाच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे १, ३, ५, ७ मध्ये साधारण सप्टेंबर महिन्यांत ‘टेक्निकल’ फेस्टिवल आणि सम अंकाच्या सेमिस्टरमध्ये म्हणजे २, ४, ६, ८ मध्ये साधारणत: मार्च महिन्यात ‘कल्चरल’ फेस्टिवलचे आयोजन केले जाते. बरं हे फेस्टिवल्स म्हणजे काही एक दोन दिवसांचं गणित नव्हे तर चार ते पाच दिवस कॉलेजेस या फेस्टिव्हल्समध्ये न्हाऊ न निघतात. टेक्निकल फेस्टिवल्समध्ये तांत्रिक बाबींवर जास्त लक्ष दिलं जातं तर कल्चरल फेस्टिवल्स मध्ये कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या फेस्टिवल्ससाठी अनेक कॉलेजमधून तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी म्हणजे टी.ई.चे विद्यार्थी हा भार सांभाळतात. टेक्निकल फेस्टिवलसाठी ‘टेक्निकल कमिटी’ तर कल्चरल फेस्टिवलसाठी ‘स्टुडंट कौन्सिल’ काम पाहते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांचे विद्यार्थी ‘वर्ग कमिटी’ म्हणून काम पाहतात तर त्यांच्यातलेच काहीजण विविध कमिटीचे असिस्टंट हेड म्हणून काम करतात. भारतात लोकशाही असल्याने या कमिटीमध्ये काम करणाऱ्यांची निवडसुद्धा ‘क्लास इलेक्शन’ मधून केली जाते. मग निवडून आलेल्या सदस्यांमधून गेल्या वर्षांची स्टुडंट कौन्सिल नवीन कमिटी तयार करते. अर्थात यातही राजकारण थोडय़ा फार प्रमाणात रंगतंच, पण कॉलेजच्या दिवसात त्या गोष्टींची मजा काही औरच असते.

फेस्टिव्हलमध्ये सादरीकरणासाठी म्हणून  कॉलेजमध्ये ‘सेंटर मॉडेल’ नावाची एक गोष्ट उभारली जाते. त्यासाठी त्या वर्षीच्या थीमनुसार ‘डेकॉर टीम’ रात्रंदिवस काम करत एक मॉडेल तयार करते. ‘टेक्निकल फेस्टिवल्स’साठी त्या त्या वर्षांत लागलेले शोध, तंत्रज्ञानाची प्रगती असे अवाक करून सोडणारे यंत्राचे आणि तंत्रज्ञानाचे नमूने पाहायला मिळतात तर कल्चरल फेस्टिवल्स दरम्यान थीमनुसार रंगीबेरंगी दुनिया पहायला मिळते. या फेस्टिवल्ससाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो पैसा. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फेस्टिवल्ससाठी सगळे पैसे स्वत:हून उभे करावे लागतात. टेक्निकल फेस्टिवल्स हे शक्यतो दिवसाच होतात. त्यामध्ये रोबो वॉर, लॅन गेमिंग, माईंड कंट्रोलिंग खेळ, रुबिक क्युब पझल असे अनेक बुद्धीला चालना देणारे आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासाशी निगडित खेळ आणि सेमिनार समाविष्ट असतात.

कल्चरल फेस्टिवल्स मात्र दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस असतात. डान्स, फॅशन शो, रॉक बँड कॉन्सर्ट, डीजे नाईट, प्रॉम नाईट, ड्रम नाईट असे ‘नाईट इव्हेंट्स’ म्हणजे कल्चरल फेस्टिव्हल्सची खास ओळख असते. अनेक कॉलेज येऊ न इथे सादरीकरण करतात आणि त्यातून बक्षिसं दिली जातात. या सगळ्या साग्रसंगीत आयोजित केल्या जाणाऱ्या फेस्टिवल्सची तयारी साधारण दीड ते दोन महिने आधीपासूनच सुरू होते. डान्स टीम, फॅशन टीम किंवा टेक्निकल फेस्टिवल्स मध्ये सादर करायचे रोबईट्स, तांत्रिक बाबी या गोष्टी फार काळजीपूर्वक पाहिल्या जातात. आलेल्या पैशांतून प्रत्येक विभागीय कमिटीला गरजेनुसार पैसा पुरवणं आणि त्या पद्धतीने काम करून घेणं कठीण असतं कारण इथे सगळे एकाच वयाचे असतात. त्यामुळे एकत्र येऊ न कॉलेजसाठी काम करणं ही भावना मनात ठेवून कामं केली जातात. या फेस्टिवल्स सोबतच ‘आय.इ.इ.इ.’ म्हणजेच ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स’ नावाचीही कमिटी टेक्निकल फेस्टिवलच्या दरम्यान आपले इव्हेंट्स आयोजित करते तिथे तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांना काम करण्याचा वाव मिळतो.

अभियांत्रिकीच्या जगात या फेस्टिवल्सना अभ्यासाइतकंच महत्व आहे. ‘आय.आय.टी.’ मुंबईचं ‘मुड इंडिगो’, सरदार पटेलचं ‘उडान’, अथर्वचं ‘ऱ्हिदम’, व्ही.जे.टी.आयचं ‘प्रतिबिंब’ हे फेस्टिवल्स आता ‘मल्हार’, ‘क्षितिज’सारख्या फेस्टिवल्सप्रमाणेच प्रसिद्धी मिळवत आहेत.

अभियांत्रिकीचा अभ्यास म्हणजे फक्त यंत्र आणि तंत्राचा अभ्यास, मात्र यातही हे फेस्टिवल्स विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखायला वाव देतात. आज कदाचित यामुळेच जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात इंजिनिअर्स काम करताना दिसत आहेत. अभियांत्रिकी कॉलेज फेस्टिवल अशा पध्दतीनेच आयोजित केले जातात ज्यात काही ना काही तरी शिकायला मिळतं. ते ज्ञान रोजच्या अभ्यासक्रमात उपयोगी पडणारं नसेल कदाचित मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतं त्यामुळे हे फेस्टिवल्स एकदा तरी सगळ्यांनी अनुभवायला हवेत.

viva@expressindia.com