scorecardresearch

विरत चाललेले धागे : कोणे एके काळी..

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात वस्त्रनिर्मितीवर बऱ्यापैकी राजकीय अंकुश असायचा.

विनय नारकर

फॅशनचा थेट संबंध हा कपडय़ांशी पहिल्यांदा जोडला जातो. कपडय़ांची निवड करताना आपण फारच चौकस असतो. कपडय़ांची निवड म्हणजे नेमकं काय? त्यांचा आकार-नक्षी यापलीकडे ते कुठल्या प्रकारचं कापड आहे यावर खरं म्हणजे आपली निवड ठरते. सुती, सिल्क याशिवाय रंगरूपाने वेगळ्या असलेल्या वस्त्रप्रावरणांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्याच्याच आधारावर आधुनिक फॅशनचा पाया घातला जातो आहे. जुनेच पुन्हा नव्याने भेटीला येत असताना हे जुनं नेमकं काय होतं, हे विरत चाललेले धागे कुठून आले, त्याची इतिहासाच्या पोटात शिरून माहिती देणारं हे फॅशन डिझायनर विनय नारकर यांचं नवं कोरं सदर..

आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’ या सुरुवातीच्या ओळी आपण खूप अभिमानाने म्हणतो. त्या ओळींमध्ये ज्या वैविध्यपूर्ण परंपरांचा उल्लेख केला आहे त्याचा साज जगातील सर्वात प्राचीन वस्त्र-परंपरांपैकी एक असलेल्या भारतीय वस्त्र-परंपरेलाही चढलेला आहे. या वैविध्यपूर्ण, अद्भुत दुनियेत प्रवेश करतानाच आपल्यासारखा साधा माणूस हरवून जातो. भारतातील सुती धाग्यांचा माग काढत आपण इसवी सनपूर्व ४००० पर्यंत मागे जाऊ न पोहोचतो. तर रंगीत सुती धागे इसवी सनपूर्व २५०० पासूनच अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. भारतातील भौगोलिक विविधता आणि हवामान अनेक प्रकारच्या नैसर्गिक तंतू आणि नैसर्गिक रंगांच्या उत्पादनासाठी अनुकूल असल्याने वस्त्र-परंपरा विकसित होऊ  शकली. नैसर्गिक रंगांमध्ये लाल आणि निळा रंग बनवण्याचं कौशल्य भारतात हजारो वर्षांपासून होतं. निळ्या रंगाचं आणि भारताचं समीकरण असं होतं की, ग्रीक देशातील लोक या रंगांला ‘इंडिगो’ असे म्हणू लागले. एकोणिसाव्या शतकात रासायनिक रंग येईपर्यंत यातलं भारताचं वर्चस्व अबाधित होतं.

प्राचीन इजिप्तमध्ये उत्खननात भारतातील ‘ब्लॉक प्रिंटिंग’ असलेला सुती कापडाचा तुकडा सापडला आहे. प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये वापरल्या जाणाऱ्या सुती कापडात भारतीय कापड सर्वात तलम असे. हे तलम सुती वस्त्र भारताची एक प्रकारे ओळखच होते. रोमन लोक याचं वुव्हन विंड्स (woven winds) असं वर्णन करायचे. रोमन अभिजनांचा राष्ट्रीय पोशाख असलेला ‘टोगा’सुद्धा भारतीय तलम सुताचाच असायचा. अनेक शतकं भारताने जगाला सुती वस्त्रं पुरवली. भारतीय रेशमी वस्त्रांनी रोमनांचे खजिने रिकामे केल्याचं तिथल्या इतिहासकारांनी नोंदवलं आहे.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात वस्त्रनिर्मितीवर बऱ्यापैकी राजकीय अंकुश असायचा. इथलं विणकाम समृद्ध होण्यासाठी इथले राजे-महाराजे खूप कारणीभूत ठरले आहेत. कलेची समज असणाऱ्या राजांनी तर विणकामाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सामान्य जनांसाठीच्या विणकामात आणि रजवाडय़ांसाठी आणि अभिजनांसाठी केलेल्या कामात फरक असायचा. रजवाडय़ांच्या वस्त्रनिर्मितीसाठी खास केंद्रं बनवली गेली होती. विणकरांना समाजात खूप मानाचं स्थान होतं. एकोणिसाव्या शतकापर्यंत विणकरांना राष्ट्रीय संपत्ती समजलं जायचं. रजवाडय़ांच्या, उमरावांच्या लग्नांमध्ये विणकरांना आंदण म्हणून दिलं जायचं. तहाची बोलणी करताना विणकरांची देवाणघेवाणही केली जायची. राजे, संस्थानिक आपल्या राज्यातील विणकरांना दुसऱ्या प्रदेशांमध्ये तिथलं कौशल्य शिकून घेण्यासाठी पाठवत. यामुळे तिथल्या परंपरा विकसित व्हायला मदत व्हायची. राजांमध्ये चांगले विणकर आपल्याकडेच ठेवण्यासाठी आपसांत चढाओढ असायची. अनेक राज्यांमध्ये विधवांना आणि निवृत्त वेश्यांना विणकामाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या उपजीविकेची सोय केली जायची. आणि या प्रकारच्या सर्वार्थाने पोषक वातावरणात भारतीय वस्त्र-परंपरा सर्व अंगांनी बहरली. भारतातल्या सर्व भागांमधून अगणित परंपरा निर्माण झाल्या, परंतु अशा प्रकारचं काम सोडून विणकरांना आताच्या काळात अन्य कौशल्यहीन कामं करावी लागणं हे समाजघटक म्हणून आपल्याला लाजिरवाणं आहे.

औद्योगिकीकरणाच्या रेटय़ामुळे, राजाश्रय गेल्यामुळे, विणकरांच्या गुपित ठेवण्याच्या खास भारतीय स्वभावामुळे आणि अशा अनेक अन्य कारणांमुळे या वैभवशाली परंपरांपैकी काही वस्त्र-परंपरा लोप पावत चालल्या आहेत, काही नष्टसुद्धा झाल्या आहेत. विणकाम हे तांत्रिक कौशल्य, बौद्धिक जाण आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ आहे. पण हा मिलाफ कुठं तरी नष्ट होऊ  लागला आहे. आणि अशाच काही विरत चाललेल्या धाग्यांचा मिलाफ, त्यांची कथा, माहिती आपण या सदरातून पाहणार आहोत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Black printing woven winds fashion designer vinay narkar

ताज्या बातम्या