परेश हाटे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

‘रिडल्स इन हिंदुइझम’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात ‘ब्राह्मणिक थिऑलॉजी’ किंवा हिंदुत्वाचा तत्त्वज्ञानाच्या अंगाने त्यांनी शोध घेतला आहे. आंबेडकरांनी आयुष्यभर मूळतत्त्व आणि नवीन विचार यांची सांगड घालत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. वेद, उपनिषदे आणि इतिहास यांचा गाढा अभ्यास असलेल्या आंबेडकरांनी त्याच आधारावर हिंदुत्वातील विरोधाभास लोकांसमोर आणला.

स्वातंत्र्याची पहाट होत असताना एकीकडे ब्राह्मण वर्गाकडून हिंदुत्व हा सनातन धर्म म्हणून पुकारला जात असताना आंबेडकरांनी मुळात हिंदुत्व म्हणजे काय? त्याची व्याख्या काय, हिंदुत्वाचा स्वीकार करायचा म्हणजे नेमके काय करायचे, याबद्दलच्या विचारांतच अडथळे असल्याचे दाखवून दिले. वरच्या ओळीत ते मुळात याच प्रश्नाने सुरुवात करतात. एखाद्याची ओळख हिंदू म्हणून केली जाते तेव्हा त्याला त्यातून काय म्हणायचे आहे? मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे?, हा प्रश्न मी याआधी जेव्हा मी हिंदू होतो तेव्हा स्वत:ला कित्येकवेळा विचारला आहे. आणि आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे असा प्रश्नच मुळात आपल्याला नवलाचा वाटतो. यावर काय उत्तर द्यायचं हेच आपल्याला माहीत नसतं. आपण त्याचा अभ्यासच केलेला नसतो.

हिंदुत्ववाद ज्याच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचे विश्लेषण आंबेडकरांनी या पुस्तकात केले असून तो मुळात धर्म म्हणता येईल का?, असाच प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.