खरंतर मध्यरात्र ही झोपायची पण कधीकधी नोकरी, व्यवसायाच्या वेळाअवेळा, उशिरा दोस्तांसोबत जागवलेल्या रात्री यामुळे ही मध्यरात्र मेजवानीचीसुद्धा होऊन जाते. भलत्या वेळी घरी बनवलेल्या या मेजवानीची लज्जत सांगतायत तरुण कलाकार..

आरोग्याचा नंबर पहिला

मी परदेशात शिकले. हायस्कूलला तिकडे असल्याने स्वत:च करून खायची सवय तेव्हापासून आहे. एकदा मारे ऐटीत भारतीय खाद्यपदार्थ म्हणून बटाटय़ाची भाजी बनवली होती. त्यात मसाले मात्र तिकडचे होते. भाजी अगदीच ‘काहीतरी’ झाली होती. तेव्हा खपून गेलं. कारण त्यांना कुठे माहिती होतं की बटाटय़ाची भाजी किती चविष्ट लागते? पण इकडे घरी केल्यावर मात्र सगळ्यांनी माझी चेष्टा केली. ‘हा कुठला नवा पदार्थ शोधलास बाई?’ तेव्हापासून मी फार काही करण्याच्या फंदात पडत नाही. साधं सोपं पण पौष्टिक खाणं, असावं असा माझा कल असतो. रात्री उशिरा शूटवरून घरी आल्यावर भूक लागलेली असते. पण दुसऱ्या दिवशी उठून परत कामाला सुरुवात करायची असल्याने नेहमीनेहमी जंक फूड चालत नाही. मी रात्री भूक लागल्यावर मिल्कशेक घेते. गुलाबाच्या स्वादाचं दूध, बदाम पावडर घालून थंड दूध पिते. त्यामुळे भूकही भागते आणि तब्येतही चांगली राहते.

नेहा महाजन, अभिनेत्री

 

टिकटिक वाजते पोटात

मी मुळात खवय्या आहे. मला सतत नवनवे पदार्थ आवड असल्याने मला खाण्यातले प्रयोग आठवतात. कधी एखादा कार्यक्रम उशिरा संपला म्हणून किंवा उगाच नाईट आऊट म्हणून मी मध्यरात्री खाल्लेले आहे. चार वर्षांपूर्वी एम.एस.सी. करत असताना रात्ररात्र जागून असाइनमेंट्स लिहायचो. त्यावेळी रात्री मध्येच खूप लागायचीच. काहीतरी खायला हवं, असं वाटायचं. अशावेळी फोडणी दिलेल्या नूडल्स, स्क्रॅम्बल्ड एग सँडविच, चिवडय़ावर घातलेली कांदा-कोथिंबीर-मिरची असे प्रयोग व्हायचे. त्यात मित्र बरोबर असतील तर आणखीच कल्पना सुचायच्या. सगळ्यांना खाऊ घालण्याचा आनंदही मिळायचा.

श्रीरंग भावे, गायक

 

कॉफी आणि बरंच काही

मी, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, आशुतोष परांडकर, क्षितिज पटवर्धन आणि रोचन गानू असे आम्ही लेखक, अभिनेते मिळून विलेपार्लेला सलग ३-४वर्षे एकत्र राहायचो. अनेकदा रात्री गप्पा मारत बसलो आणि किती वाजले कळलंच नाही असं व्हायचं. भूक लागल्यावर गप्पा थांबायच्या. मग सगळ्यांनाच हवी असायची कॉफी आमच्यातला सुयश टिळक कॉफी छान करायचा. त्यामुळे कॉफीचं काँट्रॅक्ट तो आणि रोचन गानूकडे असायचं. कधी त्यात चॉकलेट वितळवून घालण्यासारखे प्रयोगही व्हायचे. शिवाय घरून आलेले चिवडे, भडंग एकत्र करून त्यात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घालून भेळ करणे, उरलेल्या पोळी भाजीच्या रोलला फ्रँकी समजून खाणे, हे उद्योग तर नेहमीचेच.

आरती वडगबाळकर, अभिनेत्री

 

फोडणीच्या भाताची गंमत

बरेचदा रात्री उशिरा पॅकअप झाल्यानंतर घरी आल्यावर भूक लागलेली असतेच. एकदा असाच उशिरा घरी आलो होतो. पहाटेचे चार वाजले होते. यावेळी बाहेर काही मिळण्याची शक्यता नव्हती. घरातल्याच असलेल्या वस्तूंमधून काही कलाकुसर करावी लागणार होती. घरातल्या भाताला फोडणी द्यायची ठरवली. पण त्यात काही वेगळेपण म्हणून कांद्याची पात आणि अंड फोडून घातलं. हा भात चवीला मस्त होता. पण दिसायला भलताच विचित्र होता. त्याला अंडा राईस वगैरे नाव द्यायचा प्रयत्न केला पण गणलंच होतं ते!

हेमंत ढोमे, अभिनेता

 

भुर्जी बिघडली..

मला स्वयंपाक करायला आवडतो. मध्यरात्री केव्हातरी भूक लागली तर बाहेर कुठेच काहीच मिळत नाही. अशावेळी स्वयंपाकाचं हे कौशल्य उपयोगी येतं. तर अशा आणीबाणीच्या वेळी मिळणारा माझा सगळ्यात लाडका पदार्थ म्हणजे मॅगी. आता प्रत्येकवेळी त्याच त्या चवीची मॅगी खायचा कंटाळा येऊ नये म्हणून मॅगीत मी वेगवेगळे जिन्नस घालून पाहायचो. कधीकधी सगळ्यात सोप्पी खिचडी मध्यरात्रीची मेजवानी बनायची. यात वेगळे मसाले घातले की वेगळी खिचडी तयार असा सोपा फंडा होता माझा. एकदा हौसेने मी भुर्जी करायला घेतली. त्यात काहीबाही घालत गेलो. शेवटी लक्षात आलं मी भुर्जीतले महत्त्वाचे मसाले घातलेच नव्हते. अशारीतीने माझी ती मेजवानी चक्क फसली.

सुयश टिळक, अभिनेता