वेशभूषा हे नाटक-सिनेमाचं अविभाज्य अंग. नायक-नायिकेचा पहिला प्रभाव पडतो तो याचमुळे. याच क्षेत्रात काम करते आपली आजची कल्लाकार वेशभूषाकार कल्याणी कुलकर्णी-गुगळे.

Redevelopment of building without help of private developers banks brokers
मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास
Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

कथावस्तूच्या अंतरंगात शिरून वेशभूषेच्या माध्यमातून कथेला पूरक घटक देण्याचं काम करते आहे, कल्याणी कुलकर्णी-गुगळे. कल्याणी वेशभूषा तर करतेच; पण स्टायलिंगही करते. मध्यमवर्गीय घरातल्या कल्याणीने आधी होमसायन्स करून टेक्स्टटाइल्स डिझाइनिंगची पदवी घेतली. ती गीता गोडबोलेंसोबत ‘घडलंय बिघडलंय’ वगैरे मालिकांसाठी साहाय्यक म्हणून काम करत होती. गीताताईंना ती या क्षेत्रातील आपली गुरू मानते. हो काम करतानाच डिझायनिंगच्या दृष्टीने आणखी कोणतं काम करता येईल, असा विचार तिच्या मनात सुरू होता. त्याच काळात वरुण नार्वेकर या मित्राच्या ओळखीने तिने मोहित टाकळकरसोबत ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’ हे नाटक केलं. याच काळात पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, की मालिका कराव्यात की नाटक असा संघर्ष तिच्या डोक्यात सुरू होता. पण बऱ्याच विचाराअंती पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार तिने सोडला आणि याच क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं. याच नाटकादरम्यान तिची सचिन कुंडलकर या दिग्दर्शकाशी ओळख झाली आणि तिने त्याच्यासोबत ‘रेस्टॉरंट’ हा सिनेमा केला. चित्रपटातूनही आपण कलेची छान अभिव्यक्ती करू शकतो, याचं भान कल्याणीला आलं. यानंतर तिने मागे वळूनच पाहिलं नाही. ‘गंध’, ‘वळू’, ‘विहीर’, ‘मसाला’, ‘अस्तू’ आदी चित्रपट तिने केले तर ‘सोनाटा’, ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’ , ‘बिनकामाचे संवाद’ ही नाटकं केली. कल्याणी म्हणते, ‘‘प्रत्येक दिग्दर्शकाच्या कामाचा अनुभव वेगळा होता. त्यांचा दृष्टिकोन आणि मांडणी भिन्न होती. गीताताईंसोबत काम करताना कामाचा झपाटा आत्मसात केल्यानं या दोन्ही माध्यमांत काम करताना कधीच भीती वाटली नाही. आपल्याला हे जमेल का? हा प्रश्नच कधी पडला नाही. अमुक हे काम करायचं आहे, आपण करूया, अशी वृत्ती ठेवली. चित्रपटांसाठी कधी कुणाला सहाय्य केलं नव्हतं. त्यामुळं स्वतच स्वत:लाच घडवत गेले. वेशभूषेच्या संचापासून ते कलावंतांच्या लूकपर्यंत सगळ्या गोष्टी ठरवत गेले. कलाकारांसाठी मी एक कॅरेक्टर नोट तयार करते. वेशभूषेबद्दलची त्यांची मतं मला खूप महत्त्वाची वाटतात. कारण ते त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करतात. कपडे हा त्यांच्या व्यक्तिरेखेचा एक अविभाज्य भाग असतो. वेशभूषाकाराला व्यवस्थापनही उत्तम करावे लागते. मी त्यासाठी एक छान व्यवस्था तयार केली आहे. आम्ही आधी कागदावर मांडणी करतो. त्याअनुषंगाने  शक्यतो तांत्रिक चुका टाळायचा प्रयत्न करतो. निर्मितीच्या कामाचा वेळ कमी झाला असला, तरी पुरेसा वेळ मिळाला नाही, ही सबब द्यायची नाही, असा माझा कल असतो.’’

वेशभूषा करण्यासाठीची प्रेरणा कल्याणीला सिनेमाच्या स्क्रिप्टकडून मिळते. कल्याणीच्या मते, वेशभूषा म्हणजे व्यक्तिरेखेचा लूक. त्यात केवळ कपडेच नव्हे तर मेकअपसह पूर्ण लूक डिझाइन करणं किंवा त्या कलावंताला त्या व्यक्तिरेखेत बघणं हा तिला एक भाग वाटतो. ती म्हणते, ‘‘हे काम एखादं चित्र काढण्यासारखं आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टींचा खूप सखोल नि सर्जनशीलपणं विचार व्हायला हवा. एखादा कॉश्चुम पाहिला की, आपोआप त्यांना त्या व्यक्तिरेखेचं नाव दिलं जातं. उदाहरणार्थ- चि. व चि. सौ. का मधल्या सावी किंवा सत्याचे कॉश्चुम म्हणून ओळखले गेले. नवीन कलाकार या सगळ्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊन सजगतेनं काम करताहेत. आगामी ‘फास्टर फेणे’मध्ये रंगसंगतीला फार महत्त्व दिलं गेलंय. तर ‘मुरांबा’मध्ये त्या त्या प्रसंगांना रंगांचं उपयोजन केलं आहे. त्यांचा भूतकाळ-वर्तमानकाळ आणि भावना रंगांनी अधोरेखित केल्या आहेत.’’ हे नवीन प्रयोग प्रेक्षकांना सहज समजून घेता येतील, असं तिला वाटतं. कारण हे प्रयोग वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत. ती म्हणते की, ‘‘अमर फोटो स्टुडिओचं उदाहरण देता येईल की, सेपिया आणि काळ्या-पांढऱ्या रंगात करायचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचदा वाटतं की, आपण हे ठरवतोय, पण ते प्रत्यक्षात होईल का.. कारण फक्त कल्पना डोक्यात येऊन चालत नाही, इतर अनेक गोष्टींची व्यवधानं ठेवावी लागतात. त्यामुळं नवे प्रयोग करायला नि त्यातलं आव्हान पेलायला फार मजा येते.’’

चित्रपट आणि नाटक या माध्यमांतील फरक लक्षात घेऊन काम करावं लागतं. अंतर या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दय़ाचा विचार करताना वापरले जाणारे रंग, कापडाचा पोत आदींचा अगदी बारकाईनं आणि अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. नाटकात लाइव्ह परफॉर्मन्स करताना कलावंताचा एखादा अभिप्राय मिळतो की, अमुक ती वेशभूषा केल्यावर एकदम त्या व्यक्तिरेखेत शिरल्यासारखं वाटतं. हा अभिप्राय कल्याणीला खूप समाधान देऊन जातो. कारण वेशभूषा ठरवताना व्यक्तिरेखेचा वावर ध्यानात ठेवावाच लागतो. ‘एक हजाराची नोट’ या सिनेमासाठी तिला प्रभात पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटासाठी वास्तववादी लुक होता. महत्त्वाचं म्हणजे परीक्षकांना यातील कपडे हे खरेच वाटले. त्यासाठी निराळी वेशभूषा करण्यात आली होती, असे वाटलेच नाही. पुरस्कारापेक्षाही परीक्षकांची ही प्रतिक्रिया कल्याणीला फार आनंद देऊन जाते. ती म्हणते, या चित्रपटाच्या लुक टेस्टसाठी चक्क उषाताईंना ते कॉश्चुम्स घालून रस्त्यावरून जायला सांगितलं होतं. त्या पैसे मागत होत्या आणि लोक ते देतही होते. हे सगळं उगाचंच स्टंट म्हणून केलेलं नव्हतं. तर दिग्दर्शक श्रीहरीला त्या स्थानिक वाटायला हव्या होत्या. या पुरस्कारासोबतच कल्याणीला आणखीही काही पुरस्कार मिळालेले आहेत. ‘अमर फोटो स्टुडिओ’साठी ‘महाराष्ट्र राज्य व्यावसायिक स्पर्धा’ आणि ‘झी गौरव नाटय़ पुरस्कार’, ‘रेस्टॉरंट’ आणि ‘विहिर’साठी ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ मिळाले आहेत. तर अभिनेता अमेय वाघने तिच्या कामाचा आवर्जून उल्लेख केला आहे. कल्याणीसोबत त्याने ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’ हे सिनेमे लागोपाठ केले आहेत. प्रत्येक सिनेमात अमेयचा लुक पूर्णत वेगळा आहे. ती म्हणते, परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, किरण यज्ञोपवित, श्रीहरी साठे, सुनील शानबाग आदींसोबत काम करताना त्यांचा दृष्टिकोन आणि अनुभवामुळे कामात फरक पडतो. ते पाहून अधिक चांगला अभ्यास आपण करतो आणि गोष्टी आणखी चांगल्या होत जातात.

कलाकारांचं स्वतचं वलय आणि ग्लॅमर याचा अडसर तिला अजूनतरी जाणवलेला नाही. तिने अंकुश, सई, अमेय अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. या कलाकारांना फॅशनेबल हायफाय कपडे देणं, तुलनेने सोपं असतं पण अत्यंत साधा लुक आणायचा तर ते मोठं आव्हान असतं. उदा. ‘डबल सीट’मधला अंकुशचा लुक किंवा ‘वायझेड’मधील कलाकारांचे लुक्स. पण दिग्दर्शक आणि कलाकारांच्या विश्वासामुळेच हे आव्हान पेलू शकल्याचं कल्याणी सांगते. सिनेमांसोबतच तिने अनेक जाहिरातींसाठी तसेच मराठीच नव्हे, तर हिंदी, इंग्रजी नाटकांसाठीही वेशभूषा केल्या आहेत.

‘चि. व चि. सौ.का.’ हा तिचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्यानंतर ‘मुरांबा’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘फास्टर फेणे’ आदी आगामी सिनेमे आहेत. मध्यंतरी ‘सिंधु, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकात तिनं तळीरामाचा काळ उभा केला होता. आता पुढील एका चित्रपटात तिला वेगळ्याच काळातला लुक साकारायचा आहे. त्यासाठीची तिचा अभ्यास सुरू आहे. बॉलीवूड तिला नक्कीच खुणावतं आहे, पण सध्या मात्र ती मराठीवरच जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. कल्याणीने स्वत ‘तू’ या नाटकासाठी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तो अनुभव तिला तिच्या रोजच्या कामातही उपयोगी पडतो. अमर फोटो स्टुडिओ या नाटकात सुव्रत जोशी वडील नी मुलगा एकत्र रंगमंचावर साकारतो असं एक दृश्य आहे. ज्यासाठी काम करताना कल्याणीला बॅकस्टेजच्या अनुभवाचा फायदा झाला.

कामाच्या पलीकडे तिला भरपूर भटकायला आवडतं. सध्या ती इंडोलॉजीत एमए करते आहे. त्या दृष्टिकोनातून वेशभूषेचा अभ्यास करणं, तिला रोचक वाटतं. नवं-जुनं संगीतही तिला खूप आवडतं. तिचा नवरा रणजित गुगळे हासुद्धा याच क्षेत्रात काम करतो. त्यामुळे या गोष्टीचाही तिला खूप उपयोग होतो. तिच्या मते, कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्य या दोन्हीत समतोल राखायचा तर आपल्या माणसांचा पाठिंबा लागतो. तिच्या नवऱ्याचा पाठिंबा तर आहेच, पण तिची आई सुलभा कुलकर्णीसुद्धा कायम तिच्या पाठीशी असतात. त्यामुळे तिचा हुरूप वाढतो. कल्याणीच्या पुढील वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा!

viva@expressindia.com