डाएटच्या पथावरून चालत असताना..  गरमागरम बटाटावडय़ाचा सुगंध दरवळू लागला की मनाचं व जिभेचं काय होतं?, हे काही पुन्हा वेगळं सांगायला नको. बारीक होण्यासाठी मनावर घेऊ न डाएट करणाऱ्या व्यक्तींच्या पुढय़ात जेव्हा चमचमीत पदार्थ दिसू लागतात, तेव्हा त्यांची मजा घेण्याचा परमानंद तरुण चमूंमध्ये ठासून भरलेला असतो. अशा डाएट फिट लोकांचं आयुष्य हेल्दी सूप, हेल्दी ज्यूस सगळं काही हेल्दी फूडच्या अवतीभोवती पिंगा घालू लागतं. आणि अशावेळी सणाच्या निमित्ताने काही चविष्ट पदार्थ पुढय़ात आलेच तर जिभेवर संयम ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. हीच परिस्थिती येत्या रविवारी रक्षाबंधनाच्या सणाला हेल्दी फूड पुरस्कर्त्यांच्या वाटय़ाला येऊ  नये या उद्देशाने शेफ शंतनू गुप्ते यांनी चटकमटक पदार्थावर हेल्दी फोडणीचा वर्षांव करून काही आगळ्यावेगळ्या व हव्याहव्याशा रेसिपीज शेअर केल्या आहेत. चमचमीत पदार्थामधील मोजकेच जिन्नस वगळून, पाककृती सुलभ करून त्याचा चविष्टपणा न घालवता हेल्दी तडका देण्यात आला आहे!!

चटपटीत बटाटावडा विथ हेल्दी ट्विस्ट

साहित्य (६ वडे) : १ मोठा बटाटा, ३ टे.स्पून चिरलेली कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, १ टे.स्पून तेल, १ टी.स्पून मोहरी, १ टी.स्पून जिरे, ५-६ कडीपत्ता पाने, २ हिरव्या मिरच्या, १/२ टी.स्पून हिंग, १ टी.स्पून हळद पावडर, १/२ टी.स्पून साखर, चवीनुसार मीठ, बेसन पीठ , १ टी.स्पून लाल मिरची पावडर, पाणी (पिठानुसार)

कृती : बटाटा शिजवून घ्या. एका भांडय़ात तेल गरम करा. तेलात मोहरी टाका, मोहरी तडकल्यावर जिरे, कडीपत्ता, हिंग आणि हळद टाका. तेलाचे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. बटाटय़ाचे साल काढा व कुस्करून घ्या. तेलाचे मिश्रण, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर बटाटय़ात एकजीव करा. बटाटय़ाच्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा.

गॅसवर अप्पेपात्र गरम करा व प्रत्येक गोलात १ टी.स्पून तेल घाला.  सरसरीत जाडसर बेसन, तिखट व मीठ, पाण्याचे पीठ करून घ्या. तयार झालेले गोळे पिठात घोळून घ्या व अप्पे पॅनमध्ये दोन्ही बाजूंनी तळून घ्या. चटकदार हेल्दी बटाटे वडे सव्‍‌र्ह करा.

हेल्दी बटर चिकन

साहित्य : आले-लसूण पेस्ट – १ चमचा, बारीक चिरलेला कांदा १, टोमॅटो (चिरलेला) – ३, कापलेल्या हिरव्या मिरच्या २-३, काजू – ५ ग्रॅम, स्कीम दुधाचे दही – १ कप, चिकन ब्रेस्ट १, गरम मसाला – १/२ चमचा, कसुरी मेथी – १/२ चमचा, धणे पूड – १/२ चमचा, हळद पावडर – १/२ चमचा, काश्मिरी मिरची पावडर १ चमचा, दालचिनी – २, बटर  – १ चमचा, चवीनुसार मीठ

कृती : चिकन ब्रेस्टचे बारीक तुकडे करा. एका बाऊलमध्ये स्कीम मिल्कचे दही, हळद, मिरची, मीठ आणि धणे पूडचे मिश्रण तयार करा. त्यात चिकन एकजीव करून १ तास मॅरिनेट करा. मध्यम आकाराच्या भांडय़ात १ कप गरम पाण्यात आलं-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, मिरच्या, काजू, मीठ मंद आचेवर उकळवा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करा. कढईत १ टीस्पून तेल गरम करा, तेलात दालचिनीचे तुकडे टाका. नंतर मॅरिनेट केलेले चिकन एकजीव करा. त्यानंतर तयार ग्रेव्ही पेस्ट व कसुरी मेथी टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका. झाकण ठेवून २० मिनिटं शिजवून घ्या. शेवटी १ टेबलस्पून बटर आणि कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा, हेल्दी बटर चिकन..

बेक चिकन मल्टिग्रेन सँडविच

साहित्य : चिकन ब्रेस्ट – १, पातीचा कांदा  – ३ देठ , मिरे पूड – १ टी.स्पून, बारबेक्यू सॉस – २ टेबलस्पून, इंग्लिश मस्टर्ड सॉस – १, टेबलस्पून, लोफॅट सलाड ड्रेसिंग – १ वाटी, ऑलिव्ह ऑइल १ टेबलस्पून, ड्राय हर्ब्स – १/२ टी.स्पून, लॅटय़ूसची पाने – ४, टोमॅटो – १, मल्टिग्रेन ब्रेड – २ स्लाइस, मीठ – चवीनुसार

कृती : चिकन ब्रेस्टला १ तास बार्बेक्यू सॉस, बारीक चिरलेल्या लसूण, मिरे पूड, ड्राय हर्ब्स व मिठाबरोबर मॅरिनेट करा. ओव्हनला २२० डिग्रीला प्री-हीट सेट करा. ओव्हनच्या ट्रेवर अ‍ॅल्युमिनिअम फॉइल पसरवा व त्यावर मॅरिनेट केलेले चिकन ठेवा, चिकनला वरून ऑलिव्ह ऑइल लावा. चिकन २२० डिग्रीला १८ मिनिटं बेक होऊ  द्या. चिकन शिजल्यावर सोनेरी रंग येईल. बंद ओव्हनमध्ये चिकनला १० मिनिटं फॉइलमध्ये झाकून ठेवा. सँडविच ड्रेसिंगसाठी एक वाटी लो फॅट ड्रेसिंग घ्या किंवा (फेटा गॉट चीझ घेऊ  शकता). ड्रेसिंगमध्ये बारीक चिरलेला पातीचा कांदा, मीरपूड, मीठ, मस्टर्ड सॉसचे मिश्रण तयार करा. चिकनचे बारीक उभे तुकडे करा आणि ड्रेसिंगच्या मिश्रणाबरोबर मिक्स करा. मल्टिग्रेन ब्रेडचे २ स्लाइस घ्या व ऑलिव्ह ऑइलमध्ये पॅनवर हलके भाजून घ्या. ब्रेडवर टोमॅटोचे स्लाइस ठेवा व लॅटय़ूसची पाने ठेवा, त्यावर चिकनचे मिश्रण पसरवा व दुसरा ब्रेड वरून ठेवा. स्वादिष्ट आणि पौष्टिक चिकन सँडविच सव्‍‌र्ह करा !!

व्हेज पनीर फेटा चीझ हेल्दी पिझ्झा

साहित्य : १/२ कप लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिरची (तुकडे), १ कप बटण मशरूम (चिरलेला), २ टेबलस्पून काळे ऑलिव्ह, १/२ टीस्पून प्रत्येक ड्राय – बेझिल, ओरेगॅनो, क्रश काळीमिरी, लाल तिखट आणि लसूण पावडर

३ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट, १ कप फेटा चीझ, २ टेबलस्पून ग्रीक योगर्ट / हंगकर्ड, १०० ग्रॅम पनीर तुकडे, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, २ होल व्हीट / मल्टिग्रेन पिझ्झा, १/४ टीस्पून मीठ

कृती : फेटा चीझ आणि ग्रीक योगर्टची ब्लेंडरमध्ये पेस्ट तयार करून घ्या, त्यात बेझिल, ओरेगॅनो, क्रश काळीमिरी, लसूण पावडर, लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो पेस्ट मिक्स करा. २ होल व्हीट/मल्टिग्रेन पिझ्झावर ऑलिव्ह ऑइल सिलिकॉन ब्रशने लावून घ्या, त्यावर पिझ्झाचे १/४ इंच बाजू सोडून फेटा चीझची पेस्ट पसरवा. चिरलेले लाल, हिरव्या आणि पिवळ्या सिमला मिरचीचे तुकडे, ऑलिव्ह व मशरूम टॉपिंग्स वरून पेरा. तयार झालेल्या पिझ्झावर पनीर ग्रेट करा, त्यावर हलके मीठ, ओरेगॅनो, चिल्ली फ्लेक्स भुरभुरवा व ऑलिव्ह ऑइल वरून शिंपडा. प्री-हीट ओव्हनमध्ये २०० डिग्रीवर २० मिनिटे बेक करा. ओव्हनमधून काढा व तुकडे करा आणि टबॅस्को किंवा केचपबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

संकलन : मितेश जोशी