नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

ब्रॅण्डच्या नावात गाव आणि ब्रॅण्डमुळे गावाचं नाव, असं अफलातून रसायन कमी ब्रॅण्ड्सच्या वाटय़ाला येतं. मिस ठाणे, मिस दादर होत होत एखाद्या सुंदरीला मिस वर्ल्ड होताना पाहणं जितकं आनंददायी आहे तितकंच भारतीय मातीमधल्या पार्ले बिस्किट कंपनीचा हुकमी एक्का असणाऱ्या पार्ले-जी बिस्किटाचा प्रवास मुंबईतील पार्ले ते परदेश असा अनुभवणं अभिमानास्पद आहे.

E-mail, bomb, best bus, Inspection,
बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल, मुलुंड पोलिसांकडून सहा बेस्टची तपासणी
vacancies in railway protection force
नोकरीची संधी : ‘आरपीएफ’मधील भरती
Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

१९२९. भारतीय पारतंत्र्याच्या काळात मोहनलाल दयाल चौहान यांनी मिठाई आणि टॉफी बनवणारी एक कंपनी सुरू केली. मुंबईतल्या पार्ले उपनगरात स्थित असल्याने पार्ले कंपनी असंच नाव कंपनीला दिलं. त्या काळात सोवळ्याओवळ्याच्या कल्पना मनात बाळगणाऱ्या भारतीयांच्या मनात बिस्किट या परदेशी खाद्यप्रकाराबद्दल अढीच होती. बिस्किटं खाऊन धर्म बाटल्याने प्रायश्चित्त घ्यावं लागलेल्या काही नेत्यांच्या कहाण्याही आपल्याला माहीत आहेत. पण याच काळात असा एक मोठा वर्ग होता जो ब्रिटिश सरकारची नोकरी करताना त्यांच्या चालीरीती, त्यांची जगण्याची पद्धत पाहत होता. त्यातलं जे योग्य वाटेल ते स्वीकारत होता. त्यामुळे बिस्किट हा प्रकार हळूहळू जनमानसात रुळू लागला आणि बिस्किट खाण्याने काही धर्मबीर्म बुडत नाही हे लोकांना पटू लागलं. अशा काळात १९३९ साली पौष्टिक आणि ताकददायी बिस्किटं बनवण्याचा विचार पार्ले कंपनीने केला आणि ‘पार्लेग्लुको’ या नावाने हे बिस्किट अवतरलं. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर पार्ले बिस्किट कंपनी या नावाने कंपनीने उघड जाहिरात सुरू केली. या जाहिरातीचा आशय असा होता की, ब्रिटिशमेड बिस्किटं खाण्याऐवजी ही अस्सल देशी बनावटीची पौष्टिक बिस्किटं खा. हळूहळू पार्ले ग्लुको हे नाव लोकांना परिचित होत गेलं. पण १९८०च्या दरम्यान ग्लुको हे नाव धारण करणारी अनेक बिस्किटं बाजारात आली. नामसाधम्र्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी ‘पार्ले ग्लुको’चं नामकरण ‘पार्ले-जी’ असं झालं आणि याच नावाने या बिस्किटाने भारतातच नाही तर जगभरात आपला फॅन क्लब तयार केला.

पार्ले-जी या नावासोबतच तो फिक्या पिवळ्या रंगाचा आणि अतिशय गोंडस मुलीचं चित्र असलेला बिस्किटांचा पुडा लगेच डोळ्यासमोर येतो. ती गोंडस मुलगी अर्थातच मुलं आणि महिला यांना आकर्षित करण्यासाठी निवडण्यात आली होती. (पार्ले-जी गर्ल नेमकी कोण याचीसुद्धा खूप चर्चा झाली, पण प्रत्यक्षात ते काल्पनिक चित्र आहे.) सुरुवातीला हा पुडा वॅक्स पेपरपासून बनलेला होता, आता अलीकडे हा पुडा प्लॅस्टिक रॅपरमध्ये उपलब्ध झाला आहे. ती चौकोनी चॉकलेटीसर बिस्किटं आणि ग्लुकोज यांचं नातं पार्ले-जीमधून नेहमीच अधोरेखित झालं पण जेन-नेक्स्टला आकर्षित करण्यासाठी ‘जी म्हणजे जिनियस’ हे नवं स्लोगन तयार झालं, जे तितकंच गाजलं. ‘कलके जिनिअस’ ही जाहिरात खुद्द गुलजार यांच्या लेखणीतून साकारली होती. पार्ले-जीची अगदी जुनी जाहिरात आठवून बघा. ‘स्वादभरे शक्तिभरे पार्ले-जी’ असं सांगणारे ते आजोबा कित्येकांना आठवत असतील. पार्ले-जी हा उपनगरीय रेल्वेच्या डब्ब्यांवर जाहिरात झळकावणारा पहिला ब्रॅण्ड. या जाहिराती आज लक्षात असल्या तरी या ब्रॅण्डला प्रमोशनची गरज तितकीशी भासलीच नाही. हा ब्रॅण्ड हा स्वत:च एक ओळख ठरला आहे .

दोन रुपयांपासून ते अगदी ५० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या आकारांत हा पुडा मिळतो, पण पाच रुपयेवाला पुडा हा पार्ले-जीचा सगळ्यात जास्त खपणारा पॅक आहे. भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक विकला जाणारा ग्लुकोज बिस्किट ब्रॅण्ड म्हणून पार्ले-जीने भारतीयांची मान उंचावली आहे. पाच हजार कोटींची उलाढाल करणारा हा ब्रॅण्ड इतका प्रसिद्ध आहे की, एक गमतीशीर निरीक्षण असं सांगतं की, जगभरात प्रतिमिनिट कुठे ना कुठे पार्ले-जी खाणाऱ्यांची संख्या चार-पाच हजार इतकी आहे.

२०१६ मध्ये पार्ले-जीचं पार्ले येथील उत्पादन बंद करून अन्यत्र हलवण्यात आलं, पण अंधेरी-पाल्र्याच्या मध्ये आजही ट्रेनमधून प्रवास करताना तो मिट्टगोड बिस्किटगंध आठवणरूपात जाणवत राहतो. पार्ले हे गाव आणि नाव या बिस्किटांसोबत कायम जुळलेलं राहील.

भारतातील प्रत्येक घरात पार्ले-जी कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात आलेलं असतंच. त्याची माफक किंमत आणि चहासोबत जुळलेली गट्टी यामुळे नंतर अनेक ग्लुकोज बिस्किटं येऊनही पार्ले-जीच्या स्थानाला कोणी धक्का लावू शकलेलं नाही. ऑफिसमधल्या औपचारिक मीटिंगनंतरचा चहाचा सोपस्कार असो, शाळकरी मुलांना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार खाऊ  असो, आजारपणात पोटाला आधार असो किंवा थकलेल्या जीवाला सहज तोंडात सरकवण्यासाठी हवा असलेला चाळा असो, पार्ले-जी हा नेहमीच सहज पर्याय राहिलेला आहे. ‘हमारे खानदानकी परंपरा’च्या चालीवर तो आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. गरीब श्रीमंत अशी दरी मिटवून सर्वाना सामान व्हायला लावणारे काही मोजकेच ब्रॅण्ड्स असतात. भारतीय बिस्किटातला सर्वात जुना ब्रॅण्ड असणाऱ्या पार्ले-जीला ही किमया साधली आहे. भारताच्या हिमालयीन डोंगरदऱ्यांतील छोटय़ाशा चहाच्या टपरीवरील काचेच्या बरणीपासून ते अगदी हायफाय टी-हाऊसपर्यंत सर्वत्र असणं हे या ब्रॅण्डचं मोठेपण अधोरेखित करत राहतं.

viva.loksatta@gmail.com