‘लाइफ इज रेस’ हे आजच्या तरुणाईला सतत अनुभवावं लागतं. या रेसच्या ‘पेस’ला मॅच करता करता ‘स्ट्रेस’ नावाचा राखीव खेळाडू कधी एन्ट्री करतो ते कळत नाही. त्याला बाहेर काढायला मग वेगवेगळे स्ट्रेसबस्टर्स शोधले जातात.. कधी कळत, कधी नकळत. तरुणाई ताणाला कसं हाताळते? आजच्या तरुणाईचे स्ट्रेसबस्टर्स कोणते?

‘यार माझं नेट अक्षरश: समाधिस्त झालंय, सगळं काही संथ सुरू आहे असं वाटतंय, त्यात सबमिशन्सही जवळ आलेत..काय चाललंय आयुष्यात..आय एम सो स्ट्रेस्ड आऊट..’ असा सूर हल्ली तरुण मुलगा- मुलगी असणाऱ्या बहुतेक सगळ्या घरांतून ऐकू येतो. स्ट्रेस, टेन्शन्स, चिडचिड आणि तरुणाई हे तर एक न सुटणारं गणितच बनून राहिलं आहे. कॉलेज, रिझल्ट, मित्रांचा ग्रुप, स्पर्धा, आई-बाबांचे किंवा इतरांचे ‘करिअर’च्या रोखाने मिळणारे सल्ले, ओरडा, त्यातूनच काही तरी हटके करण्याचा आजच्या युथचा सततचा अट्टहास, यातच भरीस नव्याने तोंड वर काढणारे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स!
तसं बघायला गेलं तर आजच्या तरुणाईकडे ‘हम हर रोज खतरों से खेलते है’ असाच अ‍ॅटिटय़ूडमध्ये असतं. पण ‘लाइफ इज अ रेस..’ हेदेखील पटत असतं.

त्यामुळे या रेसच्या पेसला मॅच करता करता ‘स्ट्रेस’ नावाचा राखीव खेळाडू एन्ट्री करतो आणि डाव काहीसा डगमगून जातो. असाइन्मेन्ट्स, प्रॉजेक्ट्स करण्यासाठी महिनाभराचा अवकाश आहे म्हणून हलगर्जीपणा करून मग अगदी आदल्या दिवशी तासन्तास प्रॉजेक्ट्समागे खिळून बसणारे काही कमी नाहीत किंवा मग ‘तिचा’ ‘लास्ट सीन’ दिसतच नाहीये, ‘तो’ काल भांडला आहे, तर आम्ही बोलणं बंद केलंय याचंही काहींना टेन्शन येतं. वजन वाढलंय, पॉकेटमनी पुरत नाही आहे, अमुक एकाचं बोलणं अजिबात पटत नाही, इंटर्नशिप मिळत नाही, उद्या इंटरव्ह्य़ू आहे, नोट्स नाहीत.. मग आमची ही तरुणाई लगेच स्टेटस अपडेट करणार, ‘स्ट्रेस्ड…डीएनडी’ किंवा मग स्टेटसमध्ये नुसतीच एखाद्या इमोटिकॉनची वर्णीही लागून जाते. पार्टीला काय कपडे घालायचे इथपासून ते इंटर्नशिपदरम्यान कसं इम्प्रेसिव्ह राहायचं या सर्व लहान-मोठय़ा कारणांनी ‘स्ट्रेस’ बहुतेकांच्याच मनात ठाण मांडून बसतो.

असं हे स्ट्रेसफुल आयुष्य जगताना आपल्या वागण्याचा नकळतच इतरांना त्रास होतो. चिडचिड, रागरुसवे, मूड स्विंग्सचा सामना करता करता कधी कधी हे सर्व वरच्या पातळीला जाऊन मग डिप्रेशनपर्यंतच्या धोक्याच्या पातळीलाही जातं. स्ट्रेस येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अपयश. अपयशाची परिभाषा नसली करीही मानसिकदृष्टय़ा खच्चीकरण करण्यासाठी हेच अनेकदा जबाबदार असतं, असं अनेकांचं मत. फक्त परीक्षांपुरताच नाही, तर रोजच्या जीवनातही लहान-मोठय़ा घटनांचा आणि ताणतणावाचा संबंध असतोच. पण ‘स्ट्रेस.. काय असतं रे भाऊ?’ असं म्हणत हसत खेळत या नावडत्या पाहुण्याला दूर लोटलं जातं ते म्हणजे विविधढंगी ‘स्ट्रेस बस्टर्स’ किंवा ताण-तणाव दूर करण्याच्या काही ट्रिक्स वापरून. चॉकलेट खाणं, वॉकला जाणं, वाचन, गायन, नेट सर्फिग, चॅटिंग, एकटंच फिरणं याही पलीकडे जाऊन काही जण आपला स्ट्रेस घालवण्यासाठी काही वेगळीच शक्कल लढवत आहेत. मुळात ताण घ्यायचाच नाही, आला तरी त्या संदर्भात बोलून मोकळं व्हायचं, याकडे तरुणाईचा कल आहे.

खुलून विचार मांडण्याकडे, व्यक्त होण्याकडे जास्त कल आहे. तेच आमच्यासाठी स्ट्रेस बस्टर्स असं बहुतेक तरुण सांगतात. मानसिकतेपासून खर्चीकतेकडे वळत जाणारेही काही स्ट्रेसबस्टर्स आहेत. त्यात शॉपिंगवरच्या स्थानी आहे. नाइट आऊट, हँग आऊट, इट आऊट ही त्रयी स्ट्रेसबस्टर्स म्हणून उपयोगी पडते, असं अनेकांनी सांगितलं.
स्ट्रेस, टेन्शन्स हे आजच्या युथला चुकलेले नाहीत. पण हा स्ट्रेस दूर करणं म्हणजेही एक कलाच आहे. अनेक महिला, तरुणी यांसाठी शॉपिंग हा उत्तम स्ट्रेस बस्टर ठरू शकतो. शॉपिंग, मग ती कशीही असो..मॉल, स्ट्रीट, शॉपिंग हब. शॉपिंग शॉपिंग असते, जी माझ्यासाठी एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे.
– अनुराधा नवलकर
मला राग अगदी पटकन येत असल्यामुळे ताणतणाव/ स्ट्रेसला मला अनेकदा तोंड द्यावं लागतं. अशा वेळी दुसऱ्या कोणाकडे व्यक्त होण्यापेक्षा मी आरशापुढे व्यक्त होतो. आरशापुढे उभं राहिल्यावर मी स्वत:चाच असतो, कोणाचं टोकणं, कमेंट्स किंवा पारखणं नसतं. स्पर्धात्मक तुलनाही नसते. त्यामुळे आय गो फॉर मिरर..
– विकल्प नरोनी
तरुणाईचे स्ट्रेसबस्टर्स
नाईट आऊट, हँग आऊट, इट आऊट तणावाला आऊट करण्यासाठी यांचा वापर तरुणाई अधिक करते. याशिवाय..
– शॉपिंग
– एकटय़ानेच सिनेमाला जाणं
– गेमिंग – काउंटर स्ट्राइक, लॅन गेमिंग
– आरसा – आरशासमोर उभं राहून स्वत:चीच स्तुती करणं, कोणाबद्दल राग असेल तर आरशापुढे व्यक्त होणं
– मनात असेल ते भडाभडा बोलून जाणं
– यू टय़ूब ब्राउझिंग
– वॉट्सअ‍ॅप जोक्स किंवा इतरांचे डीपी पाहणं
– पेट थेरपी