दात आल्यापासून खाबू मोशायने अनेक ठिकाणच्या चिकन तंदुरीची चव घेतली आहे. पंजाबमधल्या एखाद्या ढाब्यापासून ते मुंबईतल्या प्रसिद्ध रेस्तराँपर्यंत सगळ्या ठिकाणच्या तंदुरीने खाबू मोशायला सुखावले आहे. जोगेश्वरीमध्ये स्कायवे नावाच्या एका रेस्तराँमध्ये खाल्लेल्या लेमन तंदुरी आणि शेजवान तंदुरी यांनी या तंदुरीला नवीन आयाम दिला..
खाबू मोशायची स्वारी सध्या खूप खूश आहे. अनेक वर्षांनंतर खाबू लहानपणी पाहिलेला पाऊस पुन्हा अनुभवतोय. म्हणजे ज्येष्ठ-आषाढात मुसळधार पडणारा आणि श्रावणात उन्हासंगे कधी लपाछुपी, तर कधी जोडीची सोनसाखळी खेळणारा.. निसर्गाने यंदा पावसाळ्यात मस्त रंग उधळायला सुरुवात केली असून खाबू मोशायची तबियत त्यामुळे भलतीच खूश आहे. इतकी की, ऐन श्रावणात खाबूला सामिष खाण्याची हुक्की आली. वास्तविक खाबूचा आणि श्रावणाचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. लहानपणी श्रावणी शुक्रवारी शाळेत चणे वगैरे वाटायचे, म्हणून खाबूला श्रावणी शुक्रवार आपलासा होता. पण त्याशिवाय खाबूचं आणि श्रावणाचं काही फार जमत नाही. यंदा पावसाच्या रंगांमुळे खाबू श्रावणाच्या प्रेमात पडला आणि ‘कुणी सामिष देता का सामिष’असा कंठघोष करत फिरू लागला.
याच शोधात खाबू आणि बाबू निघाले. आता बाबू खवय्या खाबू मोशायचा अगदी लंगोटी यार. त्यामुळे खाबूप्रमाणे बाबूलाही श्रावण वगैरे भानगडींचा फरक पडत नाही. बाबूला त्याच्या यारदोस्तांकडून खबर मिळाली की, जोगेश्वरीला एका हॉटेलात चिकन तंदुरी चांगली आणि वेगळ्या प्रकारची मिळते. खाबू आणि बाबू दोघेही जोगेश्वरीला चालते झाले. खाबू लहान असताना गल्लीत किंवा ट्रेनमध्ये टाळ्या वाजवत पैसे मागणारे तृतीयपंथी हे जोगेश्वरीला राहतात, अशी आवई का कुणास ठाऊक, पण उठवण्यात आली होती. त्यामुळे खाबूला जोगेश्वरी स्थानकाबद्दल एक भयमिश्रित कुतूहल होतं. पण खाबू जोगेश्वरी स्थानकात उतरत गेला आणि ही भीती फोल ठरत गेली. तरीही रेल्वे स्थानक टाळण्यासाठी खाबू आणि बाबूने मस्त बाइकचा आसरा घेतला. स्वामी विवेकानंद मार्गावरील ती वाहतूक कोंडी मागे सारत गाडी अंधेरीच्या पुढे आणली. जोगेश्वरीला स्कायवे नावाच्या एका हॉटेलमध्ये चिकन लेमन तंदुरी आणि चिकन शेजवान तंदुरी या दोन हटके डीश मिळतात, या एका माहितीवर खाबू आणि बाबू निघाले.
खाबू आणि बाबू हॉटेलात शिरले आणि एक टेबल अडवून मेन्यू कार्ड चाळते झाले. या दोघांचीही ऑर्डर ठरली होती. त्यांनी हाफ प्लेट लेमन तंदुरी आणि हाफ प्लेट शेजवान तंदुरी मागवली. तेवढय़ात खाबूने तिकडच्या वेटरला विश्वासात घेत लेमन तंदुरी म्हणजे काय, असा प्रश्न अगदी बालसुलभ कुतूहलाने विचारला. या डिशसाठी चिकनला लावतात तो मसाला नेहमीच्या चिकन तंदुरीपेक्षा वेगळा असतो. त्यात लिंबू पिळून थोडीशी टँगी टेस्ट दिली जाते. त्याशिवाय मसाल्याचा रंगही पिवळसरपणाकडे झुकणारा असतो. मसाल्यातच लिंबू पिळल्याने ते चिकनच्या अंतरंगात झिरपतं आणि तंदुरमध्ये छान भाजल्यानंतर त्याचा मस्त घमघमाट सुटतो.
आता एक गोष्ट खाबूला इथे सांगितलीच पाहिजे. चिकन तंदुरी हा चिकनमधला बडा ख्याल आहे. सहस्रावर्तन किंवा तत्सम अनुष्ठान सोडून बसतात, त्याचप्रमाणे चिकन तंदुरी खायला बसता आलं पाहिजे. काटय़ाचमच्याच्या जंजाळात अडकणारा हा पदार्थच नाही. चिकन तंदुरी ज्याने काटय़ा-चमच्याने खाल्ली, त्याच्या घशात माशाचा काटा अडको! चिंबोरी खाताना जशी दोन्ही हातांची मदत लागते, तसंच चिकन तंदुरीसाठीही दोन्ही हात पुढे सरसावले पाहिजेत. मग तंदुरीतील विशिष्ट भाग खाण्यासाठी मानेचा काटकोन वगैरे करून दातांनी तो मोडता आला पाहिजे. त्यासाठी लाजलज्जा वगैरे त्यागावी लागते.
खाबू आणि बाबू या दोघांनाही खाताना लाज वगैरे काहीच वाटत नसल्याने त्यांनी बिनधास्त बैठक मारली आणि आपल्या खाद्यसफारीतल्या एक एक आठवणी काढत तंदुरीची वाट बघायला सुरुवात केली. काहीच वेळात दोघांसमोर दोन प्लेटमध्ये चिकन शेजवान तंदुरी आणि चिकन लेमन तंदुरी पेश झाली. या दोन्ही डिशमधला फरक लगेचच लक्षात येत होता. चिकन शेजवान तंदुरीसाठी चिकन आधी शेजवान सॉसमध्ये मस्त मुरवून मग तो शेजवान सॉस चिकनवर पुन्हा लावून ती तंदुरमध्ये टाकली होती. त्याचा गंध भन्नाट होताच, पण लेमन तंदुरीच्या वासानेच खाबूच्या तोंडाचं पाणी पाणी झालं. लिंबाचा स्वत:चा असा एक मस्त वास त्या चिकनच्या डिशला येत होता. त्यातच तंदूरमध्ये चिकन भाजल्याने त्याला येणारा एक वास घमघमत होता. खाबू आणि बाबू यांनी फक्त काहीच क्षण एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांच्या प्लेटमधला एक तुकडा समोरच्या प्लेटमध्ये सरकवला आणि दोघंही बाह्य़ा मागे सारून चिकनचा समाचार घ्यायला सज्ज झाले.
खाबूने सर्वप्रथम लेमन चिकनची चव घेतली. चिकनमध्ये मस्त भरलेला आणि रोस्ट झालेला मसाला, मस्त शिजलेलं चिकन आणि त्याला लिंबाचा थोडासा अर्क यामुळे मजा येत होती. चिकन शेजवान तंदुरी हा प्रकारही तेवढाच रुचकर होता. साधारणपणे शेजवानमधल्या आलं-लसूण या तीव्र फ्लेवर्समुळे इतर पदार्थाची चव तेवढय़ा परिणामकारकपणे जाणवत नाही. पण इथल्या शेजवान तंदुरीमध्ये चिकन, शेजवान सॉस आणि इतर मसाला यांची भट्टी, किंवा तंदूर म्हणू हवं तर, चांगलीच जमून आली होती. चिकनचा समाचार घेतल्यानंतर हाडांच्या सांदीकोपऱ्याला लागलेला मसालाही या दोघांनी सोडला नाही. कदाचित त्या हॉटेलमध्ये त्याआधी चिकन तंदुरी एवढय़ा साफसफाईने खाणारं कोणीच आलं नसावं. पण खाबू-बाबू दोघांनी त्या तंदुरीचा पुरेपूर आस्वाद घेतला. शेवटचा घास झाल्यानंतर दोघांनी अक्षरश: बोटंही चाटून पुसून साफ केली.
एवढी लाजवाब डिश खाल्ल्यानंतर खाबू आणि बाबूला वास्तविक बिलाची चिंता भेडसावली होती. कारण या वेळी पहिल्यांदाच दोघांनी मेन्युकार्डमधल्या उजव्या बाजूकडे दुर्लक्ष करत थेट ऑर्डर केली होती. पण दोन्ही डिशचं बिल मिळून फक्त ४९० रुपये एवढंच आलं. यातील हाफ चिकन लेमन तंदुरी ही डिश १९० रुपयाला असून हाफ चिकन शेजवान तंदुरी २०० रुपयांना मिळते. पण यातील एक डिश पूर्ण खाल्ली तरी पोट भरतं, हे वेगळं सांगायलाच नको!
लहानपणापासून चिकन तंदुरीचे लचके तोडणाऱ्या खाबू मोशायला अनेक वर्षांनंतर वेगळ्या प्रकारचं तंदुरी चिकन खायला मिळालं आणि खाबूचा श्रावण सार्थकी लागला..
कुठे : हॉटेल स्कायवे
कसे जाल : जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद रोडवर आल्यावर शीतल स्वीट्स नावाचं प्रसिद्ध दुकान आहे. या दुकानाच्या रांगेतच स्कायवे आहे. त्याशिवाय गोरेगावहून अंधेरीच्या दिशेने जाताना बेहरामबाग रोडची पाटी गेल्यावर उजवीकडे एक पेट्रोलपंप लागतो. त्या पेट्रोलपंपासमोरच स्कायवे हे हॉटेल दिसेल. जोगेश्वरी स्टेशनवरून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरच हे हॉटेल आहे.

Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार
mumbai, Two Workers Die, One Critical, Falling into Toilet Tank, malad, pimpripada, Construction Site, marathi news, malad news, mumbai news, workers fell tank in malad
मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये