स्वप्निल घंगाळे

पॉण्डिचेरी म्हटल्यावर सर्वात आधी आठवतो तो समुद्र आणि समुद्रकिनारे. पॉण्डिचेरीची दुसरी ओळख म्हणजे फ्रेंच वसाहत. मात्र या दोन्ही तोंडओळखींचा ठसा पॉण्डिचेरीमधील खाद्यसंस्कृतीवर दिसून येतो. ऑरोविलसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आश्रम आणि छोटे आकारमान असल्याने पॉण्डिचेरीमध्ये अनेक खाद्यसंस्कृती एकत्र आलेल्या दिसतात. म्हणजेच या छोटय़ाशा केंद्रशासित प्रदेशात दुनियाभरच्या खाण्याच्या गोष्टी मिळतात असे म्हटले तरी हरकत नाही.

Worlds smallest escalator in Japan unic escalators video goes viral
जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे? भारतीय तरुणीचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

पॉण्डिचेरीमधील सर्वात सहज उपलब्ध होणारे पदार्थ म्हणजे इडली, डोसा आणि मेदूवडा. पण येथे मिळणाऱ्या या टिपिकल दाक्षिणात्य पदार्थामध्ये काही ट्वीस्ट आहेत. म्हणजे येथील काही हॉटेलमध्ये अगदी इडली एका मोठय़ा वाटीमधील सांबारमध्ये बुडवून दिली जाते, मात्र त्या इडलीवर कांदा टाकून दिला जातो. तर काही हॉटेलमध्ये तुम्ही डोशाबरोबर अनेक पर्याय ट्राय करून पाहू शकता. म्हणजे काही हॉटेल्स तुम्हाला डोशाबरोबर कोंबडीचा रस्सा किंवा कुर्मा भाजीचा पर्याय देतात. म्हणजे चपातीऐवजी फक्त डोसा. एकंदरीत या डिशमध्ये डोशाबरोबर खोबऱ्याची आणि लाल रंगाची आंबट-गोड अशा दोन चटण्या, सांबर आणि चिकनचा रस्सा किंवा कुर्मा दिला जातो. स्ट्रीट फूडमध्ये सांगायचे झाल्यास येथे जागोजागी नारळ पाण्याच्या गाडय़ा दिसून येतात. त्याचप्रमाणे आपल्या इथे खारे शेंगदाणे-चणे विकणारे असतात तसे तिथे उकडलेले शेंगदाणे आणि पिवळे वाटाणे हातगाडीवर विकले जातात. पंधरा रुपयाला एक प्लेटभर दाणे-वाटाणे त्यावर चिमूटभर लाल मसाला, कांदा, कापलेली कैरी अगदी भन्नाट चव लागते याची.

येथे स्थानिक पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटकांचीही मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते, त्यामुळेच हॉटेल्स किंवा फूड जॉइण्ट्सचे वेगवेगळे प्रकार येथे आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास व्हाइट टाऊन भागातील सर्व हॉटेल्समध्ये परदेशी पदार्थ उपलब्ध असतात तर जसे तुम्ही उत्तरेकडे सरकाल त्याप्रमाणे साधे फूड जॉइण्ट्स पोटाची भूक भागवतात. अगदी बर्गर्स, पिझ्झा, पास्तापासून ते चेट्टीनाड चिकन-मटण प्रकाराचे खाणेही पॉण्डिचेरीमध्ये सहज उपलब्ध आहे. शहरात खाऊगल्ली वगैरे प्रकार अस्तित्वात नसला तरी केंद्रशासित प्रदेश असल्याने मर्यादित भूभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियंत्रणामुळे हॉटेल, फूड जॉइण्ट्स स्वच्छ, बऱ्यापैकी जागा असणारे आहेत.

रॉक बीचवरील गांधीजींच्या पुतळ्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर असणारे ‘ले कॅ फे’ हे २४ तास सुरू असते. यामागील मुख्य कारण म्हणजे हे कॅ फे चक्क सरकारच्या मालकीचे आहे. म्हणजेच तुम्हाला पॉण्डिचेरीमध्ये कधीही खादाडी करावीशी वाटली तर ‘ले कॅफे’चे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतात. म्हणूनच अगदी रात्री दोन वाजताही येथे टेबलसाठी वेटिंग असते. खिशाला परवडतील असे पदार्थ समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत रात्रभर गप्पांचा फड रंगवत खाता येतात. अगदी दक्षिणेतल्या ‘काफी’पासून ते पास्तापर्यंत पन्नासहून अधिक पदार्थ येथे मिळतात. खासकरून येथील कोल्ड कॉफी, निरवाना ब्राऊनी नक्कीच चाखण्यासारखी आहे.

पॉण्डिचेरीमध्ये खास दाक्षिणात्य स्टाइलची काफी अनेक जागी अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. मात्र तुम्ही ‘चहाटळ’ असाल तर पॉण्डिचेरीमध्ये तुमची थोडी निराशा होऊ  शकते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही जागी पितळ्याच्या पेल्यात आणि ग्लासमध्ये कॉफी दिली जाते. त्यामुळे टेस्टबरोबर दिसायलाही ‘कडक’ दिसते.

पॉण्डिचेरीत नाश्त्याला जितक्या प्रेमाने इडली, डोसा, मेदूवडा खाल्ला जातो तितक्याच प्रेमाने क्रोसेन्टोस आणि कॉफी हाही अनेकांचा नाश्ता असतो. मग हे क्रोसेन्टोस अगदी २५ रुपयांपासून उपलब्ध आहेत. फ्रेंच प्रभाव तेथील डेझर्ट्स म्हणजेच गोड पदार्थ आणि बेकरी पदार्थावर अधिक दिसतो. क्रोसेन्टोसपासून ते फ्रेंच पेस्ट्रिजची चव जिभेवर रेंगाळत राहते. येथे प्रत्येक रेंजनुसार बेकरी उपलब्ध आहेत. त्यामुळे खिसा किती खाली करायचा यावर तुम्ही काय आणि कुठे खायचे हे ठरवू शकता.

नारळाची आमटी, तंदुरी बटाटा, सोया डोसा, पापयसम या दाक्षिणात्य पदार्थाची बहुधा सर्वच स्थानिक हॉटेलमध्ये चव घेता येते. याशिवाय असद (आपल्याकडच्या कालवणाला किंवा आमटीला तिकडचे नाव), कदूगू येरा (नारळाचे दूध आणि वाटलेल्या मोहरीचा रस्सा) मध्ये भाज्यांपासून अंडय़ांपर्यंत आणि चिकनपासून ते माशांपर्यंत अनेक पदार्थ टाकून भाताबरोबर खाल्ले जाते. येथील सर्वच पदार्थामध्ये मिरपूड वापरण्याचे प्रमाण थोडे जास्त वाटते; कारण त्याची चव जिभेला लगेच जाणवते. एकंदरीतच काय तर फ्रेंच आणि दाक्षिणात्य खाद्य संस्कृतीचा उत्तम मेळ साधण्याचे दक्षिणेतील एकमेव ठिकाण म्हणजे पॉण्डिचेरी! काय मग कधी जाताय या देशी ठिकाणावरील देश-विदेशातील पदार्थाची चव चाखायला?

viva@expressindia.com