पूर्वी बॅकपॅक म्हटलं की स्वत:चं सामानसुमान बांधून जिथे मन सांगेल तिथे निघायचं असा अंदाज होता. हल्ली मात्र इथेही वेगळ्या अर्थाने ‘कंपनी’ शोधली जाते. त्यामुळे जेव्हा बॅकपॅकची किंवा ट्रेकची तयारी सुरू होते तेव्हा अनेकांच्याच डोक्यात पहिला विचार येत असेल तर ते म्हणजे जिथे आपण जात आहोत तिथे युथ हॉस्टेल्स आहेत का..

फिरस्तीवर निघालेल्या मंडळींसाठी रस्ता म्हणजे एक प्रकारची कधीही न संपणारी ‘प्ले लिस्ट’ असते. आपल्या मोबाइलमध्ये ज्याप्रमाणे एखादं गाणं संपण्यापूर्वी त्या पुढचं गाणं कोणतं असणार याचा आपल्याला साधारण अंदाज असतो किंवा ते गाणं लावण्याच्या तयारीतच आपण असतो, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक वाटसरू, फिरस्त्या वर्गातील प्रत्येक जण एक प्रवास झाल्यानंतर यापुढील प्रवास नेमका कुठे आणि कसा असणार आहे, याविषयीची आखणी करत असतो. सध्या तरुणाईमध्ये अशी फिरस्ती करण्याऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं असून त्यासाठी काही ठरावीक गोष्टींना अनेकांची पसंती असते. पूर्वी बॅकपॅक म्हटलं की स्वत:चं सामानसुमान बांधून जिथे मन सांगेल तिथे निघायचं असा अंदाज होता. हल्ली मात्र इथेही वेगळ्या अर्थाने ‘कंपनी’ शोधली जाते. त्यामुळे जेव्हा बॅकपॅकची किंवा ट्रेकची तयारी सुरू होते तेव्हा अनेकांच्याच डोक्यात पहिला विचार येत असेल तर ते म्हणजे जिथे आपण जात आहोत तिथे युथ हॉस्टेल्स आहेत का..  ‘युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची एक चेनच या बॅकपॅकर्ससाठी सध्या वेगवेगळ्या पर्यटनस्थळी उभी राहिली आहे..

खिशाला अजिबात चटका न लावता निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण व्यतीत करण्याची संधी युथ हॉस्टेलमुळे मिळते. फिरायचं तर सगळ्यांनाच असतं पण बजेटची चिंता ही या आवडीवर कित्येकदा मात करते. म्हणून मग आपली आवड आणि खिशाला परवडेल अशी निवड करायची तर सध्या युथ हॉस्टेल्सची बऱ्यापैकी तरुणाईला मदत होते आहे. ट्रेकिंग असेल किंवा नुसतंच भटकायचे बेत असतील तर नेहमी गरज असते ती कार्यक्षम आणि कोणत्याही क्षणी मोठय़ा उत्साहात आणि जबाबदारीने सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची किंवा मार्गदर्शकांची. नवख्या ट्रेकरपासून ते अगदी ट्रेकिंगच्या वाटा कोळून प्यालेल्या एखाद्या अनुभवी ट्रेकपर्यंत सर्वाचं प्राधान्य युथ हॉस्टेल्सच्याच ट्रेकला असतं. कधी कधी तर या संस्थेचं अप्रूपच वाटतं. इतक्या कमी दरात विविध ठिकाणी ट्रेक, फॅमिली कॅम्पिंग आयोजित करण्यापासून अनेक कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून यशस्वीरीत्या पार पाडण्यात युथ हॉस्टेल्स अग्रेसर ठरली आहेत. तरुण बॅकपॅकर्स आणि युथ हॉस्टेल्सच्या या दिवसेंदिवस घट्ट होत चाललेल्या भावनिक बंधांचा उलगडा ‘युथ हॉस्टेल्स’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हृषिकेश यादव यांनी केला.

सरकारच्या पंचवार्षिक योजनेपासून सध्याच्या घडीला देशभरात पसरलेल्या युथ हॉस्टेल्सचा पाया घातला गेला होता. या योजनेचा देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या युथ हॉस्टेल्सना बराच फायदा झाला. मुख्य म्हणजे हॉस्टेल्सबरोबरच काही स्थानिक हॉटेल्सशीही हातमिळवणी केली गेली. त्यामुळे अनेक ठिकाणी अशी हॉटेल्सही युथ हॉस्टेलचा भाग झाली. जेणेकरून त्या हॉटेल्सचीही जागतिक पातळीवर प्रसिद्धीही झाली आणि बॅकपॅकर्ससाठी युथ हॉस्टेलच्या माध्यमातून देशातल्या विविध भागांमध्ये राहण्यासाठी उत्तम पर्यायही उपलब्ध झाले. फिरस्त्यांसाठी लॉज, कमी बजेटमधील हॉटेल्स असताना त्यांचा युथ हॉस्टेल्सवरचा विश्वास का वाढतोय? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. युथ हॉस्टेल्स ज्या हॉटेल्सशी जोडलं जातं त्या ठिकाणी आधी संस्थेचे स्वयंसेवक सर्व तपासणी करतात. तिथे उपलब्ध सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था, या सर्व गोष्टींच्या आधारेच या हॉटेल्सची निवड करण्यात येते. स्वयंसेवकांनी या हॉटेल्सना हिरवा कंदील दाखवल्यानंतरच पुढे ‘युथ हॉस्टेल्स असोसिएशन’ त्या हॉटेल्सना आपल्यात सहभागी करून घेतं. आणि कुठल्याही नव्या ठिकाणी भ्रमंतीसाठी निघताना तिथली राहण्याची जागा, स्वच्छता आणि खाण्याच्या सोई या सगळ्या गोष्टी पर्यटकांकडून तपासल्या जातातच. त्याची हमी आधीच युथ हॉस्टेल्सकडून मिळत असल्याने बिनधास्तपणे त्यांच्यावर विश्वास टाकला जातो. आतापर्यंत नवी दिल्ली, म्हैसूर, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या आणि अशा विविध ठिकाणी युथ हॉस्टेल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांत भटकंतीसाठी येणाऱ्यांसाठी हॉस्टेल हा परवलीचा शब्द झाला आहे.

बॅकपॅकर्ससाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे दर्जात कुठलीही तडजोड न करता त्यांच्यासाठी फिरण्याच्या जागांची माहिती, तिथे जाण्याची व्यवस्था करून देणं, शिवाय ट्रेकिंगबरोबरच फॅ मिली कॅम्पिंगचा  प्रकारही भलताच लोकप्रिय असल्याने ते कोणी आयोजन करून देत असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात सुखावणारी गोष्ट असते. एकटय़ा युथ हॉस्टेलमध्ये वर्षभरात साधारणपणे १५०००च्या जवळपास ट्रेकर्स सहभागी होतात. हॉस्टेलच्या वतीने दरवर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर विविध ट्रेक्सचं आयोजन करण्यात येतं. त्यातही या ट्रेक्सचे आयोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाही यासाठी कोणाला मानधन देऊन नेमलं जात नाही.  तर दरवेळी स्वखुशीने यात भाग घेणारे स्वयंसेवक असतात. ते कुठलाही आर्थिक मोबदला न घेता आवडीने हे करत असल्याने साहजिकच इथे तयार होणारे वातावरण हे अधिक मनमोकळे आणि केवळ भटकण्याच्या ओढीने एकत्रित आलेल्यांचे असते. यामुळे ट्रेकचा माणशी खर्च कमी होतो हा झाला यातला आर्थिक व्यवहारांचा भाग पण इथे आल्यानंतरचा एकत्रितपणाचा भावनिक भाग अनेकदा यात मोलाची भूमिका बजावतो. त्यामुळे याबाबतीत युथ हॉस्टेल्सना इतर खासगी हॉटेल्स किंवा संस्थांकडून स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी तरु ण फिरस्त्यांनी त्यांची साथ सोडलेली नाही. उलट तरुणाईचे त्यांच्याबरोबरचे भावबंध अधिकच दृढ होत चालले असल्याची प्रचीती प्रत्यक्ष तिथे काम करणाऱ्यांनाही येते आहे.

नफा मिळवणं हा या हॉस्टेल्सचा प्राथमिक उद्देश नव्हताच. केवळ भ्रमंती तेही ज्यांनी युथ हॉस्टेल्सच्या ट्रेक्सला दोनदा हजेरी लावली असेल तेही त्यांच्या पुढच्या ट्रेक्सचे किंवा मुशाफिरीच्या कार्यक्रमांचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे अनेक तरुण विशेषत: २० ते ३५ वयोगटांतील मंडळी युथ हॉस्टेलकडे ओढली गेलेली पाहायला मिळतात. लहान मुलांना निसर्गाचं महत्त्व पटवून देण्यापासून मोठय़ांनाही या मनसोक्त मुशाफिरीत कसं सहभागी क रून घेता येईल यावर स्वत: फिरस्ते असलेले अनेक जण स्वयंसेवकाच्या भूमिकेतून काम करतात. फिरायला निघाल्यानंतर दैनंदिन जीवनातील तणावाच्या सगळ्या गोष्टी, सुखसोयी मागे सारून निसर्गात रमण्याचा, समोर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेत मुशाफिरीचा अनुभव आयुष्याशी जोडून घेण्याचा युथ हॉस्टेल्सचा फंडा तरुणाईला त्यांच्याशी जोडून घेतो आहे.

एक फिरस्ता दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी अशी जोडत गेलेली ही भटकंतीची नाळ युथ हॉस्टेलच्या माध्यमातून देशभरात सर्वदूर पसरली आहे. महाराष्ट्रातही गावखेडय़ातील पायवाटा हॉस्टेलच्या माध्यमातून अनेकांनी पिंजून काढल्या आहेत. तुम्हाला अमुक एका ठिकाणी भटकंतीला निघायचंय हे ठरायचा अवकाश.. तुम्हाला तिथल्या सगळ्या पायवाटा, मुक्कामासह सगळ्या गोष्टी सुकर वाटतील अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतात. चंद्रखानी ट्रेकपासून ते अगदी महाराष्ट्रातील असंख्य पायवाटांच्या मार्गावरून या युथ हॉस्टेल्सचे ट्रेकर्स गेले आहेत. सायकलिंगला भारतात इतक्या मोठय़ा पातळीवर समोर आणण्यातही या संस्थेचा मोठा वाटा आहे. आज बऱ्याच संस्था, तरुणांचे ग्रुप्स युथ हॉस्टेल्सच्या पावलावर पाऊ ल ठेवत या अनोख्या दुनियेत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचंही विशेष वाटतं असं हृषिकेश यादव यांनी सांगितलं. मात्र काहीही झालं, कितीही स्पर्धा निर्माण झाली तरी युथ हॉस्टेल्स व्यावसायिकीकरणाच्या जवळपासही फिरकरणार नाहीत असं त्यांनी निर्धारानं सांगितलं. फिरणं आणि फिरायला शिकवणं हा या हॉस्टेल्सचा खरा मंत्र आहे, उद्देश आहे, ‘युथ हॉस्टेल्स’ ही खरंतर एक परंपरा आहे. आणि या भावबंधात एकदा अडकलेली व्यक्ती इथे पुन:पुन्हा येत राहते. तुम्हालाही या अनोख्या प्रवासाचा भाग व्हायचं असेल तर, ‘जनाब आपकी मंझिल बस दो ट्रेक दूर हैं..’

सायली पाटील  viva@expressindia.com