scorecardresearch

Premium

फुडी आत्मा: माझी खाद्यजत्रा!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे नम्रता संभेराव. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नम्रताच्या मते खाण्यात मैफिलीसारखा आनंद असतो.

The program maharashtrachi hasyajatra Namrata Sambherao Comedy food ideas
फुडी आत्मा: माझी खाद्यजत्रा!

मितेश जोशी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे नम्रता संभेराव. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नम्रताच्या मते खाण्यात मैफिलीसारखा आनंद असतो. तिच्या खाद्यकल्पना वाचू या आजच्या फुडी आत्मामध्ये.

prabhakar devdhar
इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष देवधर यांचे निधन; ‘अ‍ॅप्लॅब इंडिया’चे संस्थापकप्रवर्तक
Justice done to Maratha community on Anand Dighes birth anniversary says cm Eknath Shinde
आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Ajit Pawar on Amol Kolhe
“अजित पवार शिरुरमध्ये आहेत याकडे आव्हान म्हणून पाहण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचं सूचक विधान
traders making meal and breakfast arrangement maratha activists in apmc premises
चटणी भाकर प्रेमाची ….मराठा समाजाच्या भवितव्यची

भारतीय आणि चहा हे समीकरण जगात प्रसिद्ध आहे. भारतात चहा बनवण्याच्या शेकडो पद्धती आणि चहा पिणाऱ्यांच्या कोटय़वधी तऱ्हा आहेत. काहींना झोपेतून उठताच चहा समोर हवा असतो, काहींना ऑफिसच्या प्रत्येक मीटिंगनंतर डोकं शांत करायला चहा हवा असतो, काहींना दुपारी लागणाऱ्या डुलक्या टाळायला चहा लागतो, काहींना रोमान्ससाठी चहा लागतो तर काहींना राग व्यक्त करायलाही चहाच हवा असतो. मसाला चाय कटिंगपासून ते हाय टीसारख्या फॅन्सी प्रकारात मिळणाऱ्या या चहाचं व्यसन असंख्य भारतीयांना आहे. नम्रतासुद्धा चहाप्रेमी आहे. सकाळी चहा प्यायला नाही तर दिवभरात काही तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत असल्याने नम्रताच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. दिवसाला पूर्णत्व हवं असेल तर तुम्हीही माझ्यासारखा वाफाळता चहा रोज सकाळी प्या, असा सल्ला नम्रता तिच्या चाहत्यांना देते. सकाळच्या न्याहारीला पोहे, उपमा यांसारखे पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ तिला स्वत:ला बनवायला आवडतात. चहा-नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळय़ा नम्रता स्वत: करते. नम्रताला किचनमध्ये ओटय़ाजवळ रमायला फार आवडतं. ती आणि तिच्या सासूबाई दोघी मिळून रोजचा स्वयंपाक करतात. घरात भाताचे चाहते नसल्याने अगदी मोजकाच भात बनवला जातो, असं ती म्हणते. सायंकाळची भूक चिवडा, चकलीसारख्या कुरकुरीत पदार्थानी भागवण्याचा तिचा प्रयत्न असतो. परत त्यासोबत चहा हवाच! रात्री चित्रीकरण संपवून पुन्हा घरी येऊन जेवणाचं ताट तिची वाट बघत असतंच.       

भाज्यांचा राजा हा किताब जर कोणाला द्यायचा झाला तर तो निश्चितच ‘बटाटय़ा’ला द्यावा लागेल, कारण सर्व देशांमध्ये भाजी म्हणून बटाटय़ाचा जितका उपयोग केला जातो, तितका दुसऱ्या कुठल्याच भाजीचा उपयोग केला जात नाही. नम्रताला बटाटा खूप आवडतो. त्याविषयी ती म्हणते, ‘माझी सकाळची शाळा होती. बटाटय़ावर माझं लहानपणापासूनच प्रेम आहे, त्यामुळे माझी आई मला डब्यात बटाटय़ाची भाजी आणि पोळी द्यायची. बटाटय़ाच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार खायला मला खूप आवडतात. त्यातल्या त्यात बटाटय़ाच्या काचऱ्या म्हणजे माझ्या बटाटय़ावरच्या प्रेमाचा आकर्षणिबदूच! शाळेत असताना माझी एक मैत्रीण ब्रेडरोल डब्यात आणायची. त्यातही पिवळय़ा बटाटय़ाच्या भाजीचं मिश्रण ब्रेडला आतमध्ये लावलेल असायचं. आजपर्यंत आपण बटाटय़ापासून बनवले जाणारे चिप्स खाल्ले, पण आपण फेकून देत असलेल्या बटाटय़ाच्या सालींपासूनही चिप्स बनवता येतात. याचे प्रात्यक्षिक मध्यंतरी मी यूटय़ूबवर पाहिले होते. एका कुकिंग स्पर्धेत मुलाने ही रेसिपी बनवली होती व ख्यातनाम शेफ रणवीर ब्रार यांना ही डिश खाऊ घातली होती. खाल्ल्यानंतर त्यांनी त्या मुलाचे तोंड भरून कौतुक केले.’ हा किस्सा सांगतानाच नम्रताने त्याची पाककृतीही सांगून टाकली. ‘सर्वप्रथम बटाटय़ाच्या साली एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच्या. साली थोडय़ा कोरडय़ा झाल्यावर त्यावर ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घालून ओव्हनमध्ये क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत बेक करा. यानंतर लाल तिखट, मीठ, जिरेपूड यात बेक केलेल्या बटाटय़ांच्या साली एकजीव करा. या मिश्रणात बटाटय़ाच्या साली चांगल्या मिक्स झाल्यानंतर त्यावर १ चमचा लिंबाचा रस टाका आणि हिरव्या चटणीसह खाण्यासाठी सव्‍‌र्ह करा. बटाटय़ात जसे अनेक गुणधर्म आहेत, तसेच त्याच्या सालींमध्येही अनेक पोषक घटक आढळतात,’ असं नम्रता सांगते.

आईच्या हातचं भरलं वांगं मला खूप आवडतं, असं सांगणारी नम्रता पुढे आई आणि सासूबाईंच्या हातचे आवडते पदार्थ सांगू लागली. ‘लग्नाच्या आधी नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने मी दहा-बारा दिवस घरापासून लांब असायचे. शेवटच्या दिवशी मी आईला खास फोन करून सांगायचे की मला भरलं वांगं आणि बाजरीची भाकरी बनवून ठेव. असंच मी आता माझ्या सासूबाईंना सांगते, ‘आई मला भाकरी आणि मेथीची भाजी बनवून ठेवा’, हे सांगतानाच  त्यांच्या हातची मेथीची भाजी आपल्याला खूप आवडत असल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘मी माझ्या आईला स्वयंपाकघरात काम करताना बघत असे. लसूण सोलणं, दाणे भाजणं, भाज्या निवडणं, चिरणं, कुटणं, वाटणं, परतणं.. यांसारख्या असंख्य कौशल्यपूर्ण क्रियांच्या वेळखाऊ साखळीतून जे एक वेळचं जेवण बनतं, त्यामागचे आपल्या आईचे श्रम, वेळ, कौशल्य आपण प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवेत. एखाद्या दिवशी भाजी जमली नाही, आमटीमध्ये मीठ जास्त झालं, तर किती सहजपणे आपण पदार्थाना नावं ठेवून मोकळे होतो. जोपर्यंत आपण स्वत: जेवण बनवायला ओटय़ाजवळ उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला जेवण ही सोपीच गोष्ट वाटते. एकंदरीत स्वयंपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असली तरी ती कला प्रत्येकानेच जोपासावी. तर त्या कलाकाराची आणि कलेची किंमत राहील. आज प्रत्येक बाबतीत बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे असं म्हंटलं जातं, पण स्वयंपाकघरात बाईच्या खांद्याला खांदा लावून पुरुष उभा आहे हे चित्र दिसण्यासाठी आता आमच्याच पिढीला प्रयत्न करावे लागणार आहेत’ असं मत नम्रताने व्यक्त केलं.

‘माझ्या बाबांनी मला भाकरी थापायला शिकवली’ असं म्हणत तिने बाबांची आठवण सांगितली. ‘एकदा माझी आई कामानिमित्ताने बाहेरगावी गेली होती. तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन माझ्या बाबांनी मला भाकरी थापायला शिकवली. ज्या दिवशी त्यांनी मला भाकरी करायला शिकवली त्या दिवशीचं त्यांचं रूप काही वेगळंच होतं. त्यांच्या हाताला भाकरीचं पीठ मळण्यापासूनच एक फार छान लय होती. हालचालींमध्ये सुसंगतता होती. एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर कुठल्याशा रंगात बुडवून ब्रश टेकवला आणि एक नागमोडी, गोलाई असलेला आकार तो ब्रश न उचलता हात काढतच गेला तर त्या हाताला जी गोलाईयुक्त सुसंगतता असेल तशी काहीशी बाबांच्या पीठ मळण्याला आली होती. म्हणजे त्यांनी पाण्यात बुडवायला हात उचलला तरी उचललाच नाहीये असं वाटलं. भाकरी तव्याइतकी मोठी आणि गोल. बाबांचा हात आणि भाकरी यांचा हा संवाद प्रेमळ ओलावा ते खटय़ाळपणा या वेगवेगळय़ा भावनांमधून जातो आहे असं वाटतं होतं. आधी बाबांचा ओला हात प्रेमानं फिरतो तिच्यावरून.. पण ती टम्म फुगताच बाबा तिला टपल्या मारल्यासारखं करतात आणि तिच्यातून फुस्सकन् वाफ बाहेर येते तेव्हा ती भाकरी फिस्कन हसल्यासारखी वाटली. हा प्रसंग डोळय़ात साठवून मीसुद्धा पुढे सरसावले व चुकत चुकत का होईना भाकरी थापायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस चुकले, पण अखेर जमले’ असं नम्रता सांगते.

माणूस शेवटी खाण्यासाठी जगतो, हे उच्च शिक्षण मला नशिबाने लवकर कळून चुकलं. रूप-रस-गंधाने अन्न अधिक आकर्षक करणं, ते रांधून प्रेमाने खाऊ घालणं या सगळय़ात एखाद्या जमून आलेल्या मैफिलीसारखा अपूर्व आनंद असतो, असं सांगणाऱ्या नम्रताची खाद्यजत्रा किती आनंदाची आहे हे लक्षात येतं.

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The program maharashtrachi hasyajatra namrata sambherao comedy food ideas amy

First published on: 01-12-2023 at 06:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×