कष्टाची पुंजी एकत्रित करून मोठय़ा मुश्किलीने खरेदी केलेले घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट होताच धास्तावलेल्या डोंबिवलीतील ३८८ कुटुंबे दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली आहेत. डोंबिवली पश्चिमेतील २४ बेकायदा बांधकामांवर महापालिकेने उशिरा का होईना कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गावगुंड, भूमाफिया, महापालिकेतील काही ठराविक अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या संगनमताने उभे राहिलेले २४ बांधकामांचे हे इमले येत्या काही दिवसांत जमीनदोस्त करण्याची कारवाई पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहाणारे रहिवाशी बेघर होणार असून दाद मागायची तरी कुठे, असा सवाल या कुटुंबांना पडला आहे.
महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या आदेशावरून डोंबिवली पश्चिमेतील २४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या नव्या आदेशानुसार या बांधकामांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. भूमाफियांशी मैत्री करून अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देणारे काही अधिकारी या कारवाईमुळे अडचणीत आले आहेत. महापालिकेतील नगरसेविका मनीषा धात्रक गेल्या दोन वर्षांपासून या बांधकामांविरोधात आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याकडे सातत्याने तक्रारी करीत होत्या. मात्र आयुक्त कार्यालयातून या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. या २४ मोठय़ा बांधकामांमध्ये १३ अनधिकृत इमारती आणि ९९ खोल्यांच्या ११ चाळींचा समावेश आहे. ‘आरसीसी’ पद्धतीच्या चार माळ्यांच्या इमारती महापालिकेच्या परवानगीशिवाय उभारण्यात आल्या आहेत. ही बांधकामे उभी राहिली तेव्हा महापालिकेच्या संबंधित प्रभाग कार्यालयात रेखा शिर्के, सुनील भावसार, रवींद्र गायकवाड हे प्रभाग अधिकारी कार्यरत होते. तसेच बबन बरफ, मुराई, राजेश वसईकर हे अभियंते कार्यरत होते. प्रभारी आयुक्त संजय घरत यांनी दोन वर्षांपूर्वी रेखा शिर्के यांना तडकाफडकी निलंबित केले होते. त्याच शिर्के यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याच्या तक्रारी आहेत.
आयुक्तांची फुकाची बडबड
आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कारकीर्दीत ही सर्व अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांवर वेळीच कारवाई झाली असती तर ही कुटुंबे उघडय़ावर आली नसती. मात्र वारंवार तक्रारी प्राप्त होऊनही या बांधकामांकडे डोळेझाक करण्यात आली. शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईचा धडाका लावला जाईल, अशी घोषणा यापूर्वीही आयुक्तांनी केली आहे. प्रत्यक्षात कारवाई होत नाही, असेच चित्र आहे. रामनाथ सोनावणे यांच्या प्रशासनाने डोंबिवली पश्चिमेतील या बांधकामांवर वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ ओढवली नसती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
बांधकाम करणाऱ्यांची नावे..
* अमित भोईर (शास्त्रीनगर) चार मजली इमारत, १० रहिवासी.
* विनोद सुखदेव भोईर(टेल्कोसवाडी), तीन मजली इमारत, ३० रहिवासी.
* जतिन भोईर(गरिबाचा वाडा), चाळ, १३ रहिवासी.
* राजा जोशी (गणेशनगर), आरसीसी बांधकाम, ४ रहिवासी.
* विजय भोईर (गरिबाचा वाडा), चार चाळी, ३७ रहिवासी.
* भगवान काठे(गणेशनगर), २ मजली इमारत, १४ रहिवासी.
* रामचंद्र शंकर भोईर(वेलंकणी शाळेसमोर), तीन मजले, ३४ रहिवासी.
* सुरेश जोशी, चार मजली इमारत, ३१ रहिवासी.
* अरुण जोशी(गणेशनगर), दोन मजली इमारत, १७ रहिवासी.
* अशोक लक्ष्मण भोईर(टेल्कोसवाडी), चार माळे, २२ रहिवासी.
* करण व बंडू म्हात्रे(गरिबाचा वाडा), चाळ, ५ रहिवासी.
* हरेश सुखदेव म्हात्रे (कुंभारखाण पाडा), तीन चाळी, २८ रहिवासी.
* जयसिंग केशव पाटील, चार माळे, ८ रहिवासी.
* मोहन लक्ष्मण पाटील, चार माळे, २० रहिवासी.
* जगदीश म्हात्रे (गरिबाचा वाडा), चाळ, ४६ रहिवासी.
* सोमनाथ म्हात्रे (गरिबाचा वाडा), चाळ, १२ रहिवासी.
* कृष्णा लक्ष्मण भोईर (टेल्कोसवाडी), चार माळे, ११ रहिवासी.
* कृष्णा भोईर, चार माळे, ३३ रहिवासी.