News Flash

एसटीच्या गाडय़ा स्टेपनी अभावी रखडल्या

‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन,’ असा हट्ट धरणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना एसटी महामंडळ वेगळ्याच अडचणीत सापडले आहे.

| December 3, 2013 06:26 am

‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन,’ असा हट्ट धरणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना एसटी महामंडळ वेगळ्याच अडचणीत सापडले आहे. एसटीच्या प्रवासी भारमानाने ५४ टक्के असा नीचांक गाठला असताना एसटीसमोर स्टेपनी टायर्सचा तुटवडा असल्याची नवी समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान गाडीचे चाक पंक्चर झाल्यास एसटीची ‘पिकअप’ येऊन चाक बदलेपर्यंत किंवा दुसरी गाडी येईपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबणे अशा त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. भरीत भर म्हणजे एसटीने घेतलेले नवीन टायर्स कुचकामी असल्याचा आरोप ‘एसटी कामगार संघटने’चे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी केला आहे.
एसटीच्या राज्यभरातील विविध विभागांत स्टेपनी टायर्सची कमतरता आहे. अमरावतीसारख्या विभागांत ७० टक्के गाडय़ांना स्टेपनी टायर्स नाहीत. त्यामुळे प्रवासात गाडीचे एखादे चाक पंक्चर झाले, तर प्रवाशांना एसटीची पिकअप गाडी येईपर्यंत रस्त्यातच थांबावे लागते. ही गाडी येण्यास वेळ लागत असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होतो. एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवण्याच्या अनेक कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण असल्याचे चव्हाण म्हणाले.
एसटीने नवीन घेतलेले टायर्स २५ हजार किलोमीटर धावल्यानंतर बाद होतात. वास्तविक टायर्स किमान ३५ हजार किलोमीटपर्यंत टिकणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे खराब झालेल्या टायर्सला ‘पॅच’ लावण्यासाठी वापरण्यात येणारे व्हॅसलिनही निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक टायर्स बाद ठरवले जात आहेत. त्यामुळे एसटीला स्टेपनी टायर्सचा तुटवडा भासत आहे. एसटीचे प्रवासी भारमान ५४ टक्के एवढे खालावले आहे. एसटीच्या इतिहासातील हा नीचांक आहे. इंधन दरवाढ, अपुरे प्रवासी अशा अनेक कारणांमुळे एसटीचा संचित तोटाही १५०० कोटींच्या आसपास आहे. प्रवाशांना आकर्षित करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी एसटीने आपल्या समस्यांकडे आधी लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. याबाबत एसटी प्रशासनाकडे विचारणा केली असता, स्टेपनी टायर्सची कमतरता आहे, या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. मात्र त्यामुळे एकही गाडी उभी नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. स्टेपनी टायर असला, तरी एसटीचे अख्खे चाक बदलणे हे चालक आणि वाहक या दोघांनाच शक्य होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही दुसरी गाडी पाठवून प्रवाशांची सोय करतो. तुटवडा दूर करण्यासाठी विभागीय कार्यशाळांमध्ये टायर दुरुस्तीचे काम अधिक जोमाने सुरू असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 6:26 am

Web Title: 70 percent st buses are not having the stepney tires
टॅग : Transport
Next Stories
1 ‘बेस्ट’च्या दिरंगाईचा ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप
2 रात्रशाळांच्या समस्यांविरोधात शिक्षकांचे धरणे आंदोलन
3 सार्वत्रिक छळवाद