सार्वजनिक सौंदर्याच्या विद्रूपीकरणास कारणीभूत ठरणारे डिजिटल फलक तातडीने काढून टाकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सुरुवातीला थंड असलेले सोलापूर महापालिकेचे प्रशासन अखेर जागे झाले. शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमणे करून लावण्यात आलेले डिजिटल फलक काढून टाकण्याची कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा ते रात्रीपर्यंत हाती घेण्यात आलेल्या या कारवाईत जेमतेम ३७ डिजिटल फलक काढून टाकण्यात आले. मात्र या कारवाईत लगेचच शिथिलता आल्याने अद्याप बरेच फलक ‘जैसे थे’ आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या व खासगी जागेत अधिकृत परवाने घेऊन व्यावसायिक जाहिराती करणाऱ्या होर्डिग्सवर अतिक्रमणे करून त्या ठिकाणी डिजिटल फलक लावण्याचे पेव फुटले आहे. त्यास पालिका प्रशासन धक्का लावण्यास तयार नसल्याचे दिसून येते. यासंदर्भात जाहिरातदार मंडळींनी एकत्र येऊन पालिका आयुक्त अजय सावरीकर यांना भेटून निवेदन सादर केले. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहिरातदार मंडळींनी आपल्या अधिकृत होर्डिग्जवर परस्पर अतिक्रमणे करून डिजिटल फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई म्हणून महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले होते. परंतु त्याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही. आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने डिजिटल फलक तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिल्याच्या पाश्र्वभूमीवर या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
सोलापूर हे उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. विविध उत्सवाबरोबर विविध राजकीय नेते व गावगन्ना पुढाऱ्यांच्या वाढदिवसाचे कारण पुढे करून रस्त्यांवर व चौकांमध्ये अतिक्रमण करून डिजिटल फलक उभारले जातात. रस्ता दुभाजकामध्येही डिजिटल फलक झळकावले जातात. त्यामुळे सोलापूर व डिजिटल फलक असे जणू समीकरण तयार झाले आहे. या डिजिटल फलकांच्या माध्यमातून काही वेळा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचे प्रकार घडतात. गुन्हेगारी जगतातील मंडळी स्वत:च्या उदात्तीकरणासाठी व प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी अशा प्रकारे डिजिटल फलकांचा आधार घेतात. त्यामुळे अर्थातच शहराचे सार्वजनिक सौंदर्य विद्रूप होते. त्याकडे लक्ष वेधून देखील पालिका प्रशासन ढिम्मच असल्यामुळे डिजिटल फलकांचे अक्षरश: पेव फुटले आहे. सात रस्ता, पार्क चौक, पांजरापोळ चौक, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, डफरीन चौक, टिळक चौक, बाळी वेस, पूर्व भाग आदी भागात डिजिटल फलकांची नेहमीच गर्दी असते. बहुसंख्य डिजिटल फलकांवर गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीची मंडळींच्या छबी पाहावयास मिळतात. यातील काही जण हद्दपार किंवा एमपीडीएसारखी स्थानबद्धतेची कारवाई झालेले महाभाग आहेत. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त उभारण्यात येणाऱ्या डिजिटल फलकांवर थोर पुरुषांपेक्षा स्थानिक तथाकथित समाजसेवक व पुढाऱ्यांच्या छबी आकाराने मोठय़ा असतात. त्यात पुन्हा अशा मंडळींवर विशेष गुणगाण नमूद केले असते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ‘काका ग्रुप’ नावाच्या संघटनेच्या एका तथाकथित नेत्याच्या वाढदिवसानिमित्त उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकावर ‘काका’ म्हणजे सरकारपेक्षा जास्त ताकदवान असल्याचा दावा करणारा ‘काका खडे तो सरकारसे भी बडे’ असा मजकूर वाचून नागरिकांचे मनोरंजन झाले आणि त्रागाही झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला अद्याप महिन्याचा अवकाश आहे. परंतु जयंतीनिमित्त शुभेच्छापर डिजिटल फलक झळकले आहेत. गेल्या महिन्यात शिवजयंतीनिमित्त मोठय़ा प्रमाणात डिजिटल फलकांनी गर्दी केली होती. या पाश्र्वभूमीवर यंदा आंबेडकर जयंतीनिमित्त तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात डिजिटल फलक उभारले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एक महिना अगोदरपासून डिजिटल फलकांची उभारण्याची ही नांदी असल्याचे मानले जात आहे.