पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या खुनाचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या विभागाची चार पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. तर या प्रकरणामध्ये गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना महाडिक काका-पुतण्या हे राजकारणासाठी गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करीत युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.     
अशोक पाटील यांचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आलेच्या घटनेला दोन दिवस उलटलेआहेत. अद्यापही पोलिसांना हल्लेखोरांचा शोध घेण्यात यश आले नाही. पोलिसांच्या तपासाबद्दल संशय व्यक्त केल्याने आणि हल्लेखोरांच्या मागे गृहराज्यमंत्री पाटील आहेत, असा आरोप करीत अशोक पाटील यांच्या समर्थकांनी या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत आता हा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या विभागाचे अधिकारी एस.बी.शेलार व सहकारी तपासासाठी शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी खुना संदर्भातील कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. खुनाचे धागेदोरे शोधण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.    
दरम्यान अशोक पाटील खून प्रकरणात गृहराज्यमंत्री पाटील यांचा संबंध नसतांना विरोधक त्यांना मुद्दाम यामध्ये गुंतवत आहेत, असा आरोप करीत कोल्हापूर दक्षिण विधान सभा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर येथे निदर्शने केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शना वेळी महाडिक यांचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी युवक, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. मंत्री पाटील हे सर्वाना विश्वासात घेऊन विकासाभिमुख कार्य करीत आहेत. उलट सार्वत्रिक निवडणुकीत नाकारलेल्या महाडिक काका-पुतण्याच्या डोक्यात यश खुपत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार आहे. तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी दिलीप पाटील यांनी केली.