केंद्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने छोटय़ा-छोटय़ा राज्यांची निर्मिती सुरू केली आहे. मात्र, देशाचे विभाजन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. आगामी निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळेच काँग्रेसने स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती करुन आंध्र प्रदेशात वणवा पेटविण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
िहगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना बुथप्रमुखांचा मेळावा हदगाव येथे खासदार सुभाष वानखेडे यांनी आयोजित केला होता. मेळाव्यास मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. अखंड िहदुस्थानचे तुकडे पाडून काँग्रेस केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. सरकारने ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करुन मोठा भ्रष्टाचार केला. स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. महाराष्ट्राचे तुकडे शिवसेना होऊ देणार नाही. छोटय़ा राज्यांची निर्मिती करुन देशात अराजकता माजविण्याचे पाप काँग्रेस करीत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त िहदुस्थान करण्याचा संकल्प शिवसेना-भाजपा युतीने सोडला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करताना राज्यातील आघाडी सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवली. राज्यातील आघाडी सरकार अपशकुनी आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे मुंबईतील खड्डा न खड्डा दररोज टीव्हीवर दाखवून आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. महागाईचा आगडोंब पसरविणाऱ्या दळभद्री काँग्रेसची राजवट संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.