पश्चिम महाराष्ट्रातील बांधकामविषयक प्रदर्शन ‘दालन २०१३’चे आयोजन १८ ते २१ जानेवारी या कालावधीत शाहूपुरी जिमखाना येथे करण्यात आले आहे. क्रिडाई कोल्हापूर या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचे औचित्य ठेवून आठवे दालन भरविले जात आहे, अशी माहिती क्रिडाईचे सभापती सूरज होसमनीव समन्वयक महेश यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
१८ जानेवारी रोजी सायंकाळी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कामगारमंत्री हसन मुश्रीफ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हय़ातील चार आमदार व महापौर जयश्री सोनवणे यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होणार आहे. या वेळी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 
१९ जानेवारीला ‘घर करारे प्रसन्न’ या विषयावर डॉ. संजीव उपाध्ये यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. २० जानेवारी रोजी होणाऱ्या तांत्रिक चर्चासत्रात प्रशांत त्रिवेदी व अध्यापक यांची व्याख्याने होणार आहेत. २१ जानेवारीला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच कोल्हापुरात ३५ मीटर (११ मजली) इमारत बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्याचा उपयोग क्रिडाईच्या सदस्यांना होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वेळच्या दालनमध्ये ५७ बिल्डर्सने सहभाग नोंदविला आहे. एकूण १६० स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये गृह, वित्त, सिमेंट, स्टील, इतर बांधकाम साहित्य, इंटिरिअर साहित्य आदींचा समावेश असणार आहे.
दालन २०१३ मध्ये जे लोक फ्लॅट बुक करणार आहेत, त्यांच्यासाठी लकी ड्रॉची योजना केली असून भरघोस बक्षिसे ठेवली आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षांतील या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्रिडाई ५५ सभासद आपले १००हून अधिक प्रकल्प सादर करणार असल्याने ग्राहकांना स्पर्धात्मक व परिपूर्ण गृहप्रकल्पाचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. प्रदर्शनाची उभारणी अंतिम टप्प्यात असून नेटके नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.    पत्रकार परिषदेस क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राम पुरोहित, क्रिडाई कोल्हापूचे अध्यक्ष राजीव परिख, उपाध्यक्ष अभिजित मगदूम, सचिव उत्तम फराकटे व सदस्य उपस्थित होते.