वर्गणीचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून धनकवडी येथील उघडा मारुती मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सोमनाथ कांबळे (वय ३५, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून दीपक लक्ष्मण कांबळे, अविनाश घोडके, सोमनाथ भोसले आणि नीलेश तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सतोष कांबळे हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
आरोपी अविनाश घोडके हा सध्या मंडळाचा अध्यक्ष आहे. इतर आरोपीही मंडळाशी संबंधित आहेत. मंडळाच्या वर्गणीचा हिशेब कांबळे यांनी घोडके याच्याकडे मागितला होता. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. शुक्रवारी रात्री  कांबळे घराकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या हातावर, डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले हे तपास करत आहेत.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त वसंत सोनवणे यांनी सांगितले की, आरोपी व मयत हे एकाच मंडळाशी निगडित असून वर्गणीच्या हिशोबावरून हा खून झाला आहे. याप्रकरणी दीपक लक्ष्मण कांबळे याला अटक करण्यात आली आहे.