सोलापूरजवळ नान्नजजवळ अकोलेकाटी ते कारंबा परिसरात माळढोक अभयारण्यात अचानकपणे आग लागली. यात सहा हेक्टर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाले. या अभयारण्यात आगी लागण्याचे प्रकार अधूनमधून घडतात. एकीकडे अभयारण्याचे क्षेत्र कमी करावे म्हणून स्थानिक शेतकरी व विविध राजकीय संघटना आग्रही असताना दुसरीकडे अभयारण्यात आगी लागण्याचे प्रकार घडत असल्यामुळे दुर्मिळ माळढोक पक्ष्याचे अस्तित्व आणखी धोक्यात आले आहे.
अकोलेकाटी ते कारंबा परिसरात सकाळी थंडीच्या मोसमात कोणीतरी व्यक्तीने जाणीवपूर्वक अभयारण्याला आग लावल्याचे दिसून आले. वन्यपशू संरक्षण विभागाच्या यंत्रणेने ही आग रात्रीपर्यंत प्रयत्न करून आटोक्यात आणली. अभयारण्याच्या क्षेत्रात आगीचे प्रकार अधूनमधून घडत असल्यामुळे वन विभागाने सकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत अभयारण्यात वनपालांना गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे.