जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन मखमलाबाद येथील दत्तात्रय पिंगळे यांच्या संकल्पनेतून शरद पिंगळे विचार मंचने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जमा केलेल्या धान्याचे नांदगाव तालुक्यात वाटप करण्यात आले.
आयुष्यभर काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकविणारा शेतकरी सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत हतबल झाला आहे. त्यांना मदतीची गरज असल्याने शरद पिंगळे विचार मंचने धान्य संकलनाचा अनोखा उपक्रम हाती घेतला. तीन महिन्यांपासून मंचने मखमलाबाद, मातोरी, म्हसरुळ, नाशिक तसेच पुणे शहरात घरोघरी जाऊन दुष्काळग्रस्तांच्या व्यथा नागरिकांना समजावून सांगितल्या. नागरिक जे धान्य देतील ते जमा करण्यात आले. काही जणांनी अगदी मूठभर धान्य दिले तर काहींनी किलोंमध्ये धान्यदान करून या उपक्रमास प्रतिसाद दिला. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, मसूर दान करण्यात आले. नागरिकांकडून ‘तुम्ही चांगले काम करत आहात’ असे प्रोत्साहन मिळत गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मेअखेरीस दोन गाडय़ा धान्य जमा झाले.
या धान्याचे नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त जतदरा, हिंगणेवाडी, अस्वलदरा या गावांमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन वाटप केले. जिल्हाधिकाऱ्यांपासून नांदगाव तहसील धान्यपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वितरणासाठी विशेष सहकार्य केले. या उपक्रमासाठी मंचचे दत्तात्रय पिंगळे, संतोष पिंगळे, प्रताप पिंगळे, संजय पगारे आदींनी परिश्रम घेतले.